top of page
WhatsApp Image 2020-06-08 at 5.05.05 PM.

नमस्कार , मी नितीन कुलकर्णी 

मी एक सर्व साधारण, मध्यम परिस्थितीतून घोकंम पट्टी करत चार दोन बुकं शिकलेला  माणूस. हे सगळं पाहून विश्व्विद्यालयाने मला नाभिकीय रसायन शास्त्रात स्नातकोत्तराची पदवी बहाल केली म्हणजे शुद्ध मराठीत सांगायचे झाले तर एम. एस. सी. न्यूक्लियर केमिस्ट्री अशी पदवी मिळाली. अर्थात त्या न्यूक्लियर चा मला माझी "न्यूक्लियर  फॅमिली" म्हणण्या पलीकडे काहीच उपयोग झाला नाही. बहुतांश लोकं शिक्षणाचा उपयोग पुढे नोकरी व्यवसायाच्या दृष्टीने करतात पण मी मात्र ह्या विपरीत बँकेत चिकटलो, त्याचा "गम " इतका पक्का होता की साडे सदतीस वर्षं तिथेच रमलो. हो रमलोच, शिक्षणा पासून इतकं भिन्न व एकेअर्थी रुक्ष क्षेत्र असून ही, मी बँकेत रमलो, कारण जिथे जाऊ ते क्षेत्र आपलंसं करून घेण्याचा व त्यात आनंद शोधण्याचा माझा स्वभाव आहे.

 

नोकरीच्या सुरुवातीला ठरवले होते तेवढ्या पदोन्नती ही घेतल्या, अनेक शाखांमधे फिरलो, बऱ्याच चांगल्या वाईट प्रसंगांना सामोरे गेलो, पण प्रत्येक ठिकाणी मला आनंदाचा सूर गवसला.  2015 साली ह्या नोकरी च्या

रहाटगाडग्या तून ईशकृपेनें व सर्व मित्रांच्या सदिच्छेने बेदाग बाहेर पडलो. 

 

माझ्या शिक्षण व नोकरीचा परस्परांशी काही सम्बन्ध नसला तरी त्या मुळे बायको मात्र चांगली मिळाली हे खरे. चार जणांसारखा संसार थाटला,  काड्या कुड्या जमवून एक घरटं बांधलं, दोन तीन वर्षात त्या घरट्यात इवल्या इवल्या दोन पिलांचा चिवचिवाट ऐकू येऊ लागला, मला तर आभाळच ठेंगणं झालं होतं, घरट्याची ओढ वाढू लागली होती. आई, आजोबा, आजी यांच्या संस्कारात पिल्लं मोठी होऊ लागली होती, केव्हा त्यांच्या पंखात इतके बळ आले कळलेच नाही, व बघता बघता एका मागून एकाने उंच आकाशात भरारी घेतली, दोन्ही पिल्ले साता समुद्रा पार येऊनच विसावली. भरारी घेताना, आपले संस्कार व त्यांच्यात पाझरलेली आई ची माया त्यांनी बरोबर घेतली आहे ह्याची मी खात्री केली होती. 
थोरल्या पिलाला एक सुंदर, सुशील,  सुसंस्कारी,  सुखकारिणी,   सहचारिणी लाभली व त्या उभयतांची  संसार वेल  बहरू लागली,  त्यांच्या ह्या वेलीवर एक टप्पोरं फुल देखील उमललं आहे. ह्या गोंडस फुलाच्या आकर्षणाने आम्ही दोघे चिमणा चिमणी आपल्या पंखातील सर्व बळ एकवटून साता समुद्रापार पिलांच्या घरट्यात येऊन सुखावत असतो.

​

2015 साली नोकरीतून सेवा निवृत्त झालो, व पुण्यात घर घेतले व तिथेच स्थाईक झालो. मला ठाऊक होते की मित्रांशिवाय मी जगूच शकत नाही, नशिबाने चांगले जीवाला जीव देणारे काही मित्र ही भेटले, मनं आनंदले. पण नोकरीतल्या चाकोरीबद्ध जीवनातून मुक्त होत हे अत्यंत बंधमुक्त जीवन आपल्याला पेलवेल का ही चिंता सतावू लागली होती,  पुढे काय करायचे हा प्रश्न भेडसावू लागला होता. शेवटी ठरवलं की नोकरीत असताना अनेक इच्छांना मुरड घालावी लागली होती, आता जमतील तशा त्या इच्छा पूर्ण करायच्या. इतके वर्षं टोपली खाली दडपून ठेवलेला कोंबडा आता आरवू लागला होता. तरुणपणी नाटकातून,  एकांकिकेतून हौशी कलाकार म्हणून, थोडे फार स्टेजवर मिरवून घेण्याचा योग आला होता. ती त्या वेळची अपूर्ण इच्छा आता पूर्ण करावी असे वाटू लागले.  पण इतक्या वर्षांनंतर आता जमेल का? आपलं हसू तर होणार नाही ना?  ही भीती होतीच पण सुदैवाने छान योग जुळून आला, सख्खे शेजारी ह्या नाटकात छोटा का होईना पण दोन भिन्न रोल असलेला एक डबलरोल करण्याचा चान्स मिळाला व माझ्या परीने मी जास्तीतजास्त देण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन तीन एकांकिकेत काम करण्याचा योग ही आला. विभिन्न स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज मधे  नियमित सराव व स्पर्धांमधे भाग घेणे ही जमले. कॉलेज च्या काळातील आठवणी ताज्या झाल्या. कॉलेज मधे पेन्टिंग स्पर्धेत बक्षीस मिळवले होते, आता परत मनात किडा वळवळू  लागला होता, पण परत जमेल का ही शंका होतीच. इतक्या वर्षात ब्रश ला हात ही लावला नव्हता पण कोरोना - लॉक डाऊन च्या वेळेचा सदुपयोग करत पेन्टिंग चा ही प्रयत्न करून पाहिला. 
हे सर्व थोडे का होईना, जमते असे वाटल्या मुळे आणखी एक अतृप्त इच्छा स्वस्थ बसू देईना, आपण काहीतरी लिहावे, मनात येणाऱ्या विचारांना शब्दरूप द्यावे ही इच्छा प्रबळ  होऊ लागली आणि खरं तर एवढ्याच साठी हा ब्लॉग प्रपंच.

Nitin's Blog

Contact

Ask me anything

Thanks for submitting!

bottom of page