top of page
Search

असे ही एक सीमोल्लंघन

Writer: Nitin Kulkarni
Nitin Kulkarni
Aug 22, 2020
10 min read

शीरीनचे दवाखान्यातील गेले दोन आठवडे खूपच तणावात गेले होते. स्वतः च्या जिवापेक्षा छोट्या कांचनच्या तब्येतीची काळजी तिला बेचैन करत होती. चार वर्षाची कांचन आय.सी.यू. मधे आई शिवाय कशी रहात असेल? ती जेवली असेल का, रडत तर नसेल ना? ह्या प्रश्नांच्या मूळे तिच्या जीवाची उलघाल होत होती. काही बरे वाईट झाले तर परमजीतला कसे सामोरे जाणार, हा विचार तिला कासावीस करीत होता. समाधान फक्त इतकेच होते की आज तिचे कोरोना परीक्षण नकारात्मक आले होते, त्यामुळे ती आता कांचनला भेटू शकत होती. प्रतीक्षा कक्षात ती ह्या विवंचनेत बसली असता समोरून येणाऱ्या परमजीतला पाहून उत्तेजित होत, विद्युत गतीने धावत जाऊन त्याला बिलगली. आश्चर्य व आनंदाचा संमिश्र भाव तिच्या चेहऱ्यावर दिसत होता, आत्तापर्यंत दाबून धरलेला धीर सर्व बांध फोडून डोळ्यावाटे पाझरू लागला. परमजीतने अंगातील सर्व त्राण एकवटून तिला कडकडून मिठी मारली, नकळतच त्याचे ओठ शिरीनच्या कपाळावर टेकले, त्यात प्रणयातूरते पेक्षा भेटीच्या समाधानाचे भाव स्पष्ट दिसत होते. काही क्षण तसेच गेल्यावर, भानावर येत, थोडे बाजूला सरकत शिरीनने त्याच्यावर प्रश्नाची सरबत्ती सुरु केली. तू आलास कसा? वाणिज्य दूतावास सुरु झाला का? डिसेम्बर २०२० पर्यंत एच.वन. वीझा स्टॅम्पिंग बंद करण्याचा अमेरिकन सरकार चा नियम अजून बदललेला नाही, मग तुझे वीझा स्टॅम्पिंग कसे झाले? एका श्वासाचीही उसंत न घेता तिने ह्या सर्व प्रश्नांची तोफ त्याच्यावर डागली होती पण तो मात्र शांत पणे स्मित करत तिच्या कडे बघत होता. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे घरी गेल्यावर निवांत पणे देईन असे म्हणत, त्याच्या लाडक्या कांचनची चौकशी केली आणि तिला आय.सी.यू. च्या काचेतुनच पाहिले. अनपेक्षितपणे समोर आलेल्या बाबाला पहिले आणि कांचन एकदम प्रफुल्लित झाली, दोघांच्या मधे असलेल्या काचेच्या पार्टीशनलाच बिलगली. दोन्हीकडे अश्रुंचे पूर वाहू लागले होते, काचेच्या पलीकडून हाताला हात, गालाला गाल लावून भेटीचा त्यांचा प्रयत्न दवाखान्याचा सगळा स्टाफ डोळे रोखून पाहत होता. डॉक्टरांनी सांगितले की तिच्या तब्येतीत खूप सुधारणा आहे, उद्या रक्त तपासणीचा निकाल नकारात्मक आल्यास दोन दिवसात तुम्ही तिला घरी घेऊन जाऊ शकाल. त्याच्या कानात उतरणारे डॉक्टरांचे हे शब्द अमृतासम भासले.

आज कांचन घरी येणार म्हणून दोघेही खूप खुश होते. पहाटेच उठून त्याने फुगे व फुलांनी घर संपूर्ण सजवले. त्याचे कांचन वरील प्रेम तसेच त्याची कलात्मकता सजावटीत झळकत होती. परमजीतचा हाच स्वभाव, हाच उत्साह तर शिरीनला भावला होता. परमजीतची ती लगबग पाहून तिला हार्वर्ड मधील ते दिवस आठवू लागले, परमजीतचा थट्टा विनोद करण्याचा स्वभाव, त्याची हुशारी, धाडसीवृत्ती, त्याच्या स्वभावातील सचोटी पाहूनच तर ती त्याच्यावर भाळली होती. तो पंजाबी, ती रत्नागिरीची मराठे कुटुंबातील. रूपा बरोबर सरस्वतीचे ही वरदान दोघांना प्राप्त होतेच.

कांचन आज बाबाच्या बरोबर घरी जायचे म्हणून खूप आनंदात होती. घरात शिरल्या बरोबर केलेली सजावट पाहून कांचन आनंदाने बेभान झाली. तिघांनीही मिळून तो दिवस खूप आनंदात साजरा केला.

दुसरा दिवस उजाडला, शिरीन खूप आनंदात होती पण परमजीत जरा गंभीरच होता. कांचन अजून झोपली होती. परमजीतने शिरीनला समोर बसवले आणि थोड्या गंभीर पण निश्चयी स्वरात सांगू लागला की, “मी अनैतिक मार्गाने अमेरिकेत प्रवेश केला आहे. नियमबाह्य वागणे हा माझा स्वभाव नाही, तेव्हा मी आज, नाही आत्ताच, शक्यतो कांचन उठायच्या आत, पोलीस ठाण्यात जाऊन आत्म समर्पण करणार आहे”. हे वाक्य म्हणत तो हात जोडून माफी मागत, शिरीनच्या समोर केविलवाणा चेहरा करून बसला. शिरीनलाही गहिवरून आले, त्याला जवळ घेत खंबीर पणे म्हणाली की, “माझा परमजीत असा खचून गेलेला मला आवडणारच नाही, तुझा निर्णय योग्य आहे आणि मी तुझ्या निर्णयात, त्याच्या परिणामात, दुष्परिणामात, कायम तुझ्या सोबतच आहे ही खात्री बाळग”. परमजीत पूर्ण आत्मविश्वासानी उठला देवाला नमस्कार केला. शिरीनने देवा पुढे दिवा लावला व हसतमुखाने त्याला शुभेच्छांसह निरोप दिला.

आज परमजीतची न्यायालयात पेशी होती, त्याचे सहकर्मी व अन्य बरेच मित्र उपस्थित होते. शिरीन कांचनला जवळ घेऊन पहिल्या बाकावर बसली होती. न्यायालयातील सोपस्कार झाल्यावर परमजीतने बोलायला सुरुवात केली. “होय न्यायाधीश साहेब, मी अनैतिक मार्गाने अमेरिकेत प्रवेश केला आहे, मला माझा गुन्हा मान्य आहे”. तो पुढे सांगू लागला की, “माझी पत्नी व चार वर्षाची मुलगी, दोघींना कोरोनाची लागण झाल्याने दवाखान्यात दाखल झाल्याचे मला कळले आणि मी अमेरिकन वाणिज्य दूतावासात धाव घेतली. त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली व माझे यू.एस. ला जाणे किती गरजेचे आहे हेही सांगितले, पण त्यांनी सरकारी नियम दाखवून ‘सॉरी’ ह्या त्यांच्या एका शब्दाने माझ्यावर वज्राघात केला आणि माझ्या सर्व आशा धुळीला मिळवल्या. मी क्षणभर खचून गेलो होतो, पण मला माझ्या ह्या चिमुकलीचा हसरा चेहरा सतत डोळ्यापुढे दिसू लागला. सर्व नियम अनुकूल होऊन व विझा स्टॅम्पिंग होऊन मी यू.एस. मधे जाई पर्यंत खूप उशीर तर नाही होणार ना? म्हणतात ना ‘मन चिंती ते वैरी न चिंती’, तशी माझी अवस्था झाली होती. न्यायाधीश साहेब, आम्ही भारतीय लग्नाच्या वेळेस अग्निच्या साक्षीने शपथ घेतो की आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात साथ देऊ. आज शिरीनला निश्चितच माझ्या साहाय्याची गरज असणार, माझे कर्तव्य मला स्वस्थ बसू देत नव्हते. शिरीनने कांचनला सांगितलेली हिरकणीची गोष्ट आठवली, लेकराच्या ओढीपायी आपल्या जिवाचीही तमा न बाळगता तिने उंच कड्यावरून स्वतःला खाली झोकून दिले होते. तोही एक अनैतिक मार्गच होता, त्या उंच कड्यावरून उडी मारल्यावर जगली वाचली असती तरीही नियम मोडला म्हणून तोफेच्या तोंडीही दिले जाऊ शकते, ह्याची तिला कल्पना असणारच, तरीही तिने तो मार्ग स्वीकारला होता, माझे लेकीवरचे प्रेम काही त्या हिरकणी पेक्षा कमी नव्हते. पूर्ण विचारांती मी निर्णय घेतला कि आता दुसरा पर्याय नसेल तर त्या अनैतिक मार्गाचा पर्यायच स्वीकारायचा. तो मार्ग खूप कष्टप्रद, बरेच लोकं प्राण ही गमावतात, मला हेही मंजूर होते, कारण मला त्यांच्या भेटी शिवाय राहणे आता शक्य नव्हते”.

परमजीत पुढे सांगू लागला की, “मित्राच्या मध्यस्थीने त्या एजंट कडे पैसे भरले व दुसऱ्याच दिवशी इक्वेडोर च्या विमानात बसलो, कारण त्या देशात भारतीयांना वीझा लागत नाही. आमचा एकूण वीस भारतीयांचा समूह, इक्वेडोरहून बसने टूलकानला व पुढे टूर्बोला गेला. इथपर्यंत चा प्रवास ठीक झाला होता. सुरुवाती पासूनच एक लुईझ नावाचा एजंटचा माणूस आमच्या बरोबर होता. पुढचा प्रवास क्रूझने होणार हे कळले होते. क्रूझ कसली एक लहानशी होडी व त्यात खचाखच लोकं भरलेली होती, लुईझ ओरडून सांगत होता की, हलू नका, कालच एक नाव बुडाली व त्यातील सर्वांना जलसमाधी झाली आहे. सगळेच घाबरलेले होते, त्यामुळे एकदम गप्प बसले. आमची नाव हेलकावे खात, कशी तरी उराबा ची खाडी पार करून कपूरगनाला पोहचली. सगळ्यांनी रोखून धरलेला श्वास सोडला. सगळ्यांचे हात पाय आखडले होते. रात्रीचे बारा वाजून गेले होते, एका टपरी मधे आम्ही रात्र काढली. सकाळी लुईझ सांगू लागला की पुढचा प्रवास जरा कठीणच आहे, आपल्याला एका निबिड अरण्यातून चालत जावे लागणार आहे, इथे लुटालूट होऊ शकते, असे म्हणत त्या लुईझ ने आमचे पारपत्र, जास्तीचे पैसे, फोन सर्व मागून घेतले व जंगलाच्या बाहेर पडलो की देतो म्हणून सांगितले. वाटेत चोरांनी किंवा पोलिसांनी अडवलेच तर चाळीस डॉलर दिल्यावर सुटका होईल. त्यांच्याशी हुज्जत घालू नये असेही बजावले”.

“आता आमचा हा अवघड प्रवास सुरु झाला. मला ह्या प्रवासाची माहिती असल्याने त्यातील भयतेची थोडी कल्पना होती. पहाटेचे सहा वाजले होते, सगळ्यांनी एकत्र राहायचे असे ठरवत त्या जंगलात चालायला सुरुवात केली. जंगल इतके घनदाट की दिवस आहे का रात्र हे कळणे देखील कठीण होते. खाली साठलेल्या चिखलात, झाडांच्या फांद्या वेली चुकवत, कुठे खरचटत, ठेचकळत असा आमचा प्रवास चालू होता. एखादी उन्हाची तिरीप चुकून आलीच तर वेळेचा अंदाज येत होता. खरं तर सगळ्यांना खूप भूक लागली होती, लुईझ ने प्रत्येकाला काही बिस्किटाचे पुडे व तत्सम खाण्याचे पदार्थ दिले होते, ते यू.एस. पर्यंत पुरवायचे होते. चालता चालता आम्ही बिस्किटं खायला सुरवात केली. अविश्रांत चालणे चालू होते. घटकाभर विश्रांती घ्यावी हा विचार सुद्धा मनात येत नव्हता, दमलोय ही जाणीव देखील पाप वाटेल अशी स्थिती होती. बहुदा एव्हाना रात्र झाली असावी, आता जरा जास्त संभाळून रहायला पाहिजे हा विचार मनात येत असतानाच काही गणवेशधारी पोलिसांनी आम्हाला गराडले. दर डोई चाळीस डॉलरची त्यांनी जणू लाचच घेतली. एव्हाना तो लुईझ कुठे दिसेनासा झाला होता, त्याच्या कडे मोठ्या विश्वासाने आम्ही सर्व जोखमीचे सामान दिले होते. मध्यरात्रीचा सुमार असावा, हिंस्त्र श्वापदांचे ओरडणे ऐकू येत होते. सहप्रवाश्यांना धीर देण्याइतकी देखील हिम्मत कोणाकडे शिल्लक नव्हती. आमच्या पैकी एकजण दोनच मिनिटे विसावण्या साठी एका दगडावर बसला व मागून त्याच्या दुर्दैवानेच, एका मोठ्या अजगराच्या रूपात त्याच्यावर झडप घातली व सर्वांच्या समोर त्याला जिवंत गिळला. हे दृश्य इतके भयावह होते की बहुतेकांना दरदरून घाम फुटला, काहींना भोवळ आली, तर काहींच्या विजारी ओल्या झाल्या, आता सगळे दुप्पट वेगाने चालू लागले. आता कितीही दमले तरी हे जंगल पार होईपर्यंत कोणी खाली बसेल ह्याची तिळमात्रही शक्यता नव्हती. अविरत चालणे चालूच होते, एव्हढयात मला ठेच लागली म्हणून खाली लक्ष गेले तर ते एक प्रेत होते, आमच्या आधीच्या एखाद्या प्रवाश्याचे असणार. मी मागच्यांना खुण केली व ते हे प्रेत चुकवून येऊ लागले. पुढे थोड्या थोड्या अंतरावर मृत व्यक्तींचे देह, काही नुसतेच अवयव, कोणाचे फक्त धडच तर कुठे फक्त हात पायांचे तुकडे पडलेले होते. त्याचा पसरणारा दुर्गंध आमचे डोके उठवत होता. ह्या भयानक दृश्याचे काय गौडबंगाल असावे ह्या विचारात असतानाच एकदम गलका ऐकू आला, काही उमजायच्या आतच लक्षात आले की आम्ही परत गराडले गेलो आहोत, पण हे पोलीस नव्हते. उंच धिप्पाड शस्त्रधारी अशा पंचवीस तीस लोकांनी आम्हाला धरले. हातातील सुरे, जांबिये, पिस्तुली, बंदुका नाचवित, नुसता आरडा ओरडा, झोंबा झोंबी चालू होती. ते काय बोलत होते ते इतर कोणाला काहीच समजत नव्हते, मला थोडेफार स्पॅनिश समजत असल्या मुळे मी त्यांना आमच्या वास्तविक परिस्थितीची कल्पना दिली, एजन्ट आमचे पैसे, फ़ोन व दागिने घेऊन पसार झाल्याचे सांगितले. थोडे पैसे शिल्लक होते ते पोलिसांनी घेतले, पण ते ऐकायला तयारच नव्हते. त्यांचे म्हणणे न ऐकलेल्यांची प्रेतं वाटेत पाहिली असतील हे त्यांनी सांगितल्यावर मात्र सगळ्यांचे धाबे दणाणले, पाय लटपटायला लागले”. न्यायालयात जमलेले सगळे अवाक होऊन हे सर्व ऐकत होते. परमजीत पुढे सांगू लागला की, “स्पॅनिश येत असल्या मुळे मी मध्यस्थी करत, दर डोई पन्नास डॉलर पर्यंत दर खाली आणला, आणि आम्ही ठरलेले डॉलर देऊन पुढे जाऊ लागलो. बहुतांश लोकं निघाले पण थोडे पुढे गेल्यानंतर काही किंकाळ्या ऐकू आल्या, बहुदा त्यांची जास्त हुशारी त्यांना नडली असावी. मागच्या ताफ्यातील प्रवाश्यांना तीन चार प्रेतं जास्त आडवी येतील. ‘सर सलामत’ म्हणत आम्ही जीव मुठीत धरून, देवाचे उपकार मानीत धावू लागलो. आपण एवढ्या मोठ्या संकटातून सहीसलामत सुटलो ह्या आनंदात सगळे असतानाच नवीन संकट आ वासून आमची वाट पहात होते. काही अंतर पुढे जाताच मोठी डरकाळी ऐकू आली. डरकाळ्यांचे आवाज जवळ सरकू लागले होते. आमच्या पैकी किती तरी प्रवासी एकमेकांना घट्ट धरून येऊ घातलेल्या संकटा पासून सोडवण्या साठी आपल्या इष्टाचा धावा करू लागले. भीतीने सर्वजण त्राण एकवटून धावत सुटले. बरेच अंतर धावल्या नंतर जरा कानोसा घेतला व डरकाळ्यांचा आवाज येत नाही हा अंदाज घेऊन निश्वास सोडला खरा पण आमच्या पैकी दोन जणं साथ सोडून गेले आहेत ह्या जाणीवेने जीवाचा थरकाप उडाला. संभवतया म्हणूनच त्या सिंव्हांनी आमचा पाठलाग केला नसावा. वीस पैकी आता आम्ही फक्त पंधरा जणच शिल्लक राहिलो होतो. उरलेल्यांचा प्रवास पुढे सुरु झाला. आता प्रत्येकाचीच हिम्मत पस्त झालेली होती, पायच काय पण सारे अंगच ठणकू लागले होते. झालेली दमछाक व अनावर झालेली झोप यानी आता आमच्या झोकांड्या जाऊ लागल्या होत्या. ह्या जंगलात शिरल्या पासून दोन दिवस उलटून तिसरा दिवस उजाडला होता, काही क्षणाचा विसावा मिळावा असे मनोमन वाटत होते पण डोळ्यासमोर तो अजगर दिसू लागे. आता मेघगर्जना ऐकू येऊ लागल्या होत्या, विजांचा कडकडाट उरी भय भरीत होते. मुसळधार पावसाला सुरुवात झाली, वरून पाऊस तर खाली पाण्याचे पाट वाहू लागले, आम्ही चिंब ओले झालो होतो. वारुळात पाणी शिरले की साप बाहेर येण्याची शक्यता होती, ह्या जंगलात अत्यंत विषारी नाग आढळतात हे माझ्या वाचनात आले होते. सर्वांना सावध रहाण्याचा इशारा केला व झपझप पाऊले टाकीत अंतर कापू लागलो. आता जंगलही जरा विरळ होऊ लागले होते, पावसाचा वेग ही कमी झाला होता, समोर मोकळे मैदान दिसले आणि आमचा जीव भांड्यात पडला, पण आता पुढे काय हा प्रश्न भेडसावू लागला होता. त्या लुईझचा तर पत्ताच नव्हता, आमच्या कडे पैसेही नव्हते, पुढच्या प्रवासाची दिशा कळत नव्हती, साधन माहित नव्हते, कुठला देश आहे ह्याचाही अंदाज येत नव्हता, फक्त त्या भयानक जंगलातून सहीसलामत सुटका झाल्याचे समाधान होते.

ह्या पनामा देशातील नवीन वाटाड्यानेच आम्हाला गाठले, एका आठ सीटच्या जुनाट वाहनात आम्हा पंधरा जणांना कोंबले. आम्ही इतके दमलेलो होतो की ही कोंबलेली अवस्था पण आम्हाला सुखावह वाटत होती. इथून आज रात्रीतून आम्हाला कोस्टारिका, निकारागुवा, होंडुरास, ग्वाटेमाला ओलांडत मॅक्सिकोत पोहचायचे होते. गेल्या साठ तासांच्या अविश्रांत प्रवासामुळे वाहन सुटताच येणाऱ्या पहिल्या गार वाऱ्याच्या झुळुकी बरोबरच सगळे गाढ झोपले होते. थोड्या वेळाने ते वाहन कुठेतरी आडवाटेला जाऊन थांबले, वाटाड्याने आम्हाला उठवले व ती देशाची सीमा अंधारातच लपत छपत चालत पार करायला सांगितली. आता हे नकोसे झाले होते, पण ‘आलिया भोगासी असावे सादर’ म्हणत आम्ही हे दिव्यही केले. तो परत म्हणाला की मॅक्सिको ला जाईपर्यंत प्रत्येक देशाच्या सीमेवर हे असेच करावे लागणार. आता मात्र स्वतःचाच राग येऊ लागला होता, पण पर्याय नव्हता. अशी मजल दरमजल करीत आम्ही मॅक्सिकोत येऊन पोहचलो. काल रात्रीच्या प्रवासात एक जण पकडला गेला होता. उरलेल्या आम्ही चौदा जणांनी आडबाजूच्या एका झोपडीवजा टपरीत रात्र काढली. सकाळी त्याने काही पर्याय सांगितले. बसच्या सामानाच्या डिक्कीत लपून बसायचे. इथे तपास यंत्रणा खूप प्रभावी आहेत, व पकडले जाताच डीपोर्ट. दुसरा पर्याय म्हणजे रणरणत्या उन्हात बसच्या टपावर झोपून जायचे, ह्यात अंग भाजून निघते. सर्वात अवघड मार्ग मी निवडला, कारण ह्यात पकडले जाण्याची शक्यता सर्वात कमी. दुग्धजन्य पदार्थ वाहून नेणाऱ्या डिपफ्रीझर मधे लपून जायचे. शून्यापेक्षा सुमारे चार ते पाच अंश कमी तापमान असणार. तापमानाच्या अंतरामुळे आत गेल्यावर हायपोथर्मिया ह्या आजारामुळे हातपाय अखडणे, ताप येणे, शुद्ध हरपणे किंवा हृदय क्रिया थांबून मृत्यू देखील संभव आहे.

मी एकट्यानेच हा पर्याय निवडला कारण मला कांचनचा चेहरा दिसत होता, तिच्या भेटीची इच्छा आता अनावर झाली होती. आमचा प्रवास सुरु झाला. थोड्या वेळाने आमच्या वाहन चालकालाच माझी दया आली व त्याने त्याचेच एक ब्लॅंकेट मला दिले, त्यामुळे पुढचा प्रवास माझा थोडा तरी सुखाचा झाला. परत अमेरिकेच्या सीमे जवळ मला उतरवले. आता हायपरथर्मियाची भीती बाळगत हा वाळवंटाचा भाग दुपारच्या रणरणत्या उन्हात सुमारे दहा मैल लपत छपत पार केला. मला जवळच ऑस्टिनला जायचे असल्या कारणाने त्याच वाहनचालकाने मला ऑस्टिन शहरातच उतरवले. त्याचे शतशः आभार मानून मी दवाखान्याकडे धाव घेतली. न्यायाधीश महोदय, ह्या दोघींना बघितले आणि माझा सर्व शीण लगेच उतरला. दोन दिवसानंतर कांचनचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तिला घरी आणले व दुसऱ्याच दिवशी पोलिसांकडे आत्मसमर्पण केले.

न्यायाधीशांचा हा प्रश्न स्वाभाविकच होता की, "अमेरिकेत तुमच्याकडे चांगली नोकरी असल्यामुळे तुम्हाला इथे रहाण्यात काहीच अडचण आली नसती, तरी तुम्ही इतक्या घाईने पोलिसांच्या हवाली का झालात?"

आता परमजीतच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसली, तो ताठ मानेने सांगू लागला की, “मी सच्चा हिंदुस्थानी आहे, असे वाम मार्गाने प्रवेश करणे मला कदापि मंजूर झाले नसते पण परिस्थितीने मला हे करायला भाग पाडले. मी पोलिसांकडे जाउन स्वतः कबूली दिली नसती तर मी आत्मग्लानीने ग्रसित झालो असतो. मी स्वतःच्याच नजरेत पडलो असतो. माझी ही अशी छवी मी माझ्या मुलीपुढे ठेऊ इच्छित नव्हतो. शिवाय उद्या माझ्या अशा वर्तनाने माझ्या देशाच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, मला ते सहनच झाले नसते.

आणखीनही एक तितकेच महत्वाचे कारण म्हणजे, मला अमेरिके बद्दलही तितकाच आदर आहे. ह्या देशातील हार्वर्ड सारख्या प्रख्यात विश्वविद्यालयाने मला उच्चविद्याविभूषित केले, इथेच मला माझी प्रिय पत्नी भेटली व माझ्या प्राणांपेक्षाही प्रिय अशी कन्या प्राप्त झाली. ह्याच देशातील मायक्रोसॉफ्ट सारख्या मोठ्या कंपनीने मला नोकरी दिली, पदोन्नतीही दिली, खूप सवलती व चांगला पगारही दिला. मला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली, सुख, समृद्धी, आनंद, समाधानही तर अमेरिकेनेच दिले आहे, अशा देशाशी मी प्रतारणा करणे स्वप्नात देखील शक्य नाही. न्यायाधीश साहेब, म्हणून मी आत्मसमर्पण केले”.

“मला माहित आहे की ह्या माझ्या गुन्ह्यांची शिक्षा म्हणून मला डिपोर्ट करून, नेहमीसाठी अमेरिकेत प्रवेश नाकारला जाऊ शकतो, माइक्रोसोफ्टची नोकरीही जाईल. हे सर्व मला मान्य आहे पण कायम खाली मान घालून चोरा सारखे आत्मग्लानीत जगणे मंजूर नाही. आपण द्याल ती शिक्षा मी आनंदाने स्वीकारीन.

परमजीतची कैफियत ऐकुन लोकांनी त्याच्या खरेपणाचे टाळ्या वाजवून स्वागत केले. न्यायालयातील सर्व भारतीयांची अभिमानाने छाती फुगली. पहिल्या रांगेत बसलेल्या शिरीनच्या डोळ्यातून कौतुक ओसंडून वाहू लागले. दहा वर्षांपूर्वी तिने केलेल्या परमजीतच्या निवडीचा आज अभिमान वाटला.

एरवी निर्विकार असणाऱ्या न्यायाधीशांच्या चेहऱ्यावरील भाव आता बदलले होते. “आरोपीने त्याचा गुन्हा मान्य केला आहे, त्याला शिक्षेची कल्पना देखील आहे. त्याचा हा अपराध अमेरिकेच्या नियमानुसार अक्षम्य आहे. तरी पण प्राप्त परिस्थिती, त्याचे त्याच्या मुलीवरील उत्कट प्रेम, त्याची सचोटी, मायदेशा बद्दलचा अभिमान, तसेच युनाइटेड स्टेट्स बद्दल असलेले प्रेम, कृतज्ञता पाहता जुन्या सर्व निकालांचा संदर्भ न घेता, अपवादस्वरूप, न भूतो न भविष्यति, असा हा निर्णय जाहीर करत आहे. मी आरोपी परमजीतची, त्याने केलेल्या गुन्ह्यातून निर्दोष सुटका करीत आहे. त्याच्या सारख्या हुशार व प्रामाणिक माणसाची अमेरिकेला कदर आहे हे दाखवत त्याला सल्ला देतो की त्याने ह्यापुढेही इमाने इतबारे अमेरिकेच्या प्रगतीस हातभार लावावा, आणि त्याने असा द्राविडी मार्ग स्वीकारण्या चे धारिष्ट परत कधी करू नये”.

ह्या अनपेक्षित निकालाने आश्चर्यचकित झालेल्या प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात न्यायालय दणाणून सोडले.





 
 
 

Recent Posts

See All
विजय विश्वासाचा

ही कथा आहे स्वातंत्रपूर्व काळातील, म्हणजे १९४५ सालातील. भांबुरड्याच्या एका शाळेतील मैदानावर गेले काही दिवस आंतरशालेय क्रिकेटच्या स्पर्धा सुरू होत्या, अटीतटीचे सामने सुरू होते. आज अंतिम स्पर्धा खूप चुर

 
 
 
शापित डायरी

लेखक : नितीन कुलकर्णी अकरावीतील अनिकेत, बाल साहित्याचा लेखक म्हणून बराच नावाजला होता. कालच त्याने शाळेच्या नोटीस बोर्ड वर, आंतरशालेय राज्यस्तरीय कथा स्पर्धे विषयी वाचले आणि त्याच्यात नवा उत्साह संचारल

 
 
 
विरहाग्नीतील होरपळ

रिक्षा स्टँडवर मदन मिश्राची रिक्षा आली की सगळे रिक्षा वाले खुश व्हायचे, मदनचा आनंदी स्वभाव व सगळ्यांना मदत करण्याची वृत्ती, त्यामुळे...

 
 
 

1 Comment


Amey Kulkarni
Amey Kulkarni
Aug 23, 2020

अप्रतिम


कथावस्तू आकर्षक आहे, पात्रनिर्मिती विलोभनीय आहे....मनाची प्रगाढ खोली, नेत्रदीपक, अल्हादकारक.... वगेरे वगेरे....

Like

Nitin's Blog

Contact

Ask me anything

Thanks for submitting!

bottom of page