top of page
Search

शापित डायरी

Writer: Nitin Kulkarni
Nitin Kulkarni
Nov 22, 2025
4 min read

लेखक : नितीन कुलकर्णी


अकरावीतील अनिकेत, बाल साहित्याचा लेखक म्हणून बराच नावाजला होता. कालच त्याने शाळेच्या नोटीस बोर्ड वर, आंतरशालेय राज्यस्तरीय कथा स्पर्धे विषयी वाचले आणि त्याच्यात नवा उत्साह संचारला. वेगळाच विषय असावा असे त्याला मनोमन वाटत होते. 

तीन चार दिवस झाले पण त्याला चांगला विषयच सुचत नव्हता त्यामुळे अनिकेत जरा बेचैनच होता. 

थोडा बदल म्हणून तो मित्रांच्या सोबत सहलीला निघाला. पुण्याजवळच एका सरदारांचा मोठा प्रेक्षणीय वाडा आहे. सकाळी नऊच्या सुमारास ते वाड्यावर पोहोचले, गाईडही घेतला. वाड्यात बरीच दालनं होती, त्या सरदारांनी वापरलेली काही शस्त्र, उंची वस्त्र, काचेच्या पेटीत व्यवस्थित ठेवलेली होती.  दिवाणखान्यात  छान बैठक घातलेली होती,  अनेक वाद्यही मांडलेली होती. नक्कीच इथे पूर्वी संगीत व नृत्याच्या मैफिली होत असणार. गाईडचे वर्णन सुरूच होते. पुढे एक खोली बंद होती, कुतूहल म्हणून त्या खोली बद्दल अनिकेतने विचारले तर गाईडने सांगितले की तिथे जुनी पुस्तकं, पोथ्या आहेत, तिथे सहसा कोणी जात नाही. जुनी पुस्तकं म्हणल्यावर अनिकेतला रहावले नाही व तो त्या गाईडच्या नकळत त्या अंधाऱ्या खोलीत शिरला, त्याने काही पुस्तके चाळली, तेवढ्यात त्याची दृष्टी एका डायरी वर पडली, ती डायरी कोरीच होती पण त्याचे मुखपृष्ठ खूप आकर्षक होते, म्हणून ती डायरी घेऊन अनिकेत त्या खोली बाहेर आला व ती डायरी गाईडला दाखवली. तेथील व्यवस्थापकांनी ती डायरी अनिकेतला भेट म्हणून दिली.

शाळेतून घरी येताच, त्याच्या खोलीत नवी कथा लिहिण्यासाठी म्हणून त्याने त्या डायरीचे पहिले पान उघडले व एक बालकथा लिहिण्यास सुरुवात केली. तो एकचित्त होऊन ती गोष्ट लिहित होता, ती गोष्ट लिहिण्यात तो इतका तल्लिन झाला होता की त्याच्या आईने जेवणासाठी मारलेली हाक सुद्धा त्याला ऐकू गेली नाही.  एका बैठकीत त्याने ही गोष्ट पूर्ण लिहिली होती. लिहून होताच त्याने स्वतः ती कथा वाचली, व आनंदाने तो स्वतःचीच पाठ थोपटू लागला. "अरे तुला किती हाका मारायच्या, जेवायचे नाही का?" म्हणत त्याच्या आईने त्या खोलीत प्रवेश केला व स्वतःचीच पाठ थोपटून घेणाऱ्या अनिकेतला पाहून तिला हसू आले, हे पाहून अनिकेत किंचित लाजला. त्याने आईला कथा छान लिहिली गेल्याचे सांगितले, "राज्यस्तरीय आंतरशालेय स्पर्धे साठी जशी मला हवी होती तशीच कथा जमली" म्हणत तो आई बरोबर स्वयंपाकघरात गेला.

दुसऱ्या दिवशी शाळेत शिक्षकांना ती कथा दाखवली व ती कथा त्यांच्या शाळे मार्फत स्पर्धेसाठी पाठवली.

अनिकेत खूप उत्साहात होता, त्याला रोज नवनवीन कथा सुचत होत्या व कथा लिहिण्याचा त्याने झपाटाच लावला होता, डायरी भरत चालली होती. त्याच्या लिखाणाचा दर्जा बराच सुधारला आहे असे शाळेतील शिक्षकही म्हणू लागले होते.

एक दिवस वर्तमानपत्रात छापून आलेली घटना तंतोतंत त्याच्या कथेशी जुळत होती. हे त्याला व त्याच्या शिक्षकांना थोडे विचित्र वाटले, पण ते निव्वळ योगायोग म्हणून सर्वांनी दुर्लक्षित केले.

त्या डायरीत आधी लिहिलेल्या सर्वच कथांच्या अनुरूप घटना वास्तवात घडत असल्याचे त्याच्या लक्षात येऊ लागले आणि अनिकेत बुचकळ्यात पडला. हे असे काय होते आहे ते त्याला उमजेना. त्याला जाणवले की डायरी उघडली की त्याला त्याच्या कल्पनेच्या पलिकडील विषयातील कथा सुचायच्या व तो प्रत्येक वेळेस एका बैठकीत ती गोष्ट लिहून पूर्ण करायचा. पूर्वी तो वहीत लिहित असताना दोन तीन दिवस सुद्धा एक कथा लिहायला लागायचे, त्यात बरीच खाडाखोडही व्हायची, पण त्या डायरीत लिहायला लागल्या पासून असे काहीच झाले नव्हते. हे निश्चितच विचित्र होते, हा योगायोग नक्कीच नाही, किंवा कथेचा दर्जा अचानक इतका सुधारणे, हे ही त्याला पटत नव्हते. मनातून अनिकेत थोडा घाबरला ही होता, म्हणून आठवडाभर त्याने त्या डायरीला स्पर्श ही केला नव्हता.

आज अनिकेत त्याच्या खोलीत पलंगावर विचार करत पडला होता.  थोड्या वेळाने त्याला जाणवले की टेबलावरील ती डायरी त्याला आकर्षित करत आहे, ह्यापूर्वी कधीही न लिहिलेला विषय त्याच्या मनात घोळू लागला. तो एका अनामिक ओढीने ओढला जाऊन खुर्चीवर बसला, त्याने डायरी उघडली, त्या डायरीचं शेवटचं एकच पान शिल्लक होतं. त्याला कधीनव्हे ती थरार कथा लिहायची इच्छा होऊ लागली, एक भयाण असा विषय मनात घोळू लागला. न राहून त्यानी पेन उचलले व कथा लिहायला सुरुवात केली की, " विपिन नावाचा एक लहान मुलगा एकटाच आपल्या घरात बसला आहे, त्याचे आई, वडील, भाऊ सगळेच थोड्या वेळा साठी बाहेर गेले आहेत.  ह्या पूर्वी ही अनेक वेळा तो घरी एकटा राहिला होता, पण आज कुठल्यातरी अकल्पनीय अशा भीतीने विपिनला ग्रासले होते, दाराला आतून कडी घातलेली आहे हे माहीत असूनही विपिन अनामिक भीतीने घाबरलेला होता." अनिकेत पुढे लिहू लागतो की, "त्या बंद दारा बाहेर हुडी असलेला, काळा ओव्हरकोट घातलेला, एक काळाकभिन्न, बटबटीत डोळे असलेला, राकट चेहऱ्याचा, भयानक माणूस उभा आहे. नक्की माणूस आहे का माणसाच्या आकृतीत काही वेगळच आहे. बाहेरून विपिनला हाक ऐकू येते, त्या हाकेत करडेपणा आहे. विपिन आणखीनच घाबरतो, हात पाय थरथरायला लागतात, घाम फुटतो, भयभीत अवस्थेत डोळ्याच्या कोपऱ्यातून तो हळूच दारा कडे पाहतो. त्याला एक हात लाकडाच्या बंद दारातून आत येत, लांब होत त्याच्या कडे यायला लागल्याचे जाणवते. विपिन किंचाळायचा प्रयत्न करतो पण तोंडातून भीतीपोटी आवाजच निघत नाही." खरं तर हे सर्व आत्ता अनिकेत अनुभवत असतो, तो हात त्याच्या खोलीच्या दारातून आत येत असल्याचे त्याला जाणवते, अनिकेतची बोबडीच वळली, तो घामाने पूर्ण डबडबला, तो हात अनिकेतच्या दिशेने पुढे सरकत होता, अनिकेत खूपच घाबरला होता. तेवढ्यात त्याला सुचते व तो कथेत पुढे भरभर लिहू लागतो की, "तो हात परत दाराबाहेर जातो, ती व्यक्ती का आकृती विपिनला काहीच त्रास न देता कायमची दूर निघून जाते," आणि अनिकेत अनुभवतो की वास्तवात ही तसेच घडले. अनिकेत आता विचार करतो आणि थोडा धीर एकवटून त्या कथेत पुढे लिहितो की,"इथून पुढे ह्या डायरीतील कुठल्याच कथा वास्तवात घडणार नाहीत," इतका वेळ रोखून धरलेला श्वास अनिकेत सोडतो, कपाळा वरचा घाम टिपतो, थोडे पाणी पितो. आता अनिकेतच्या थोडा जीवात जीव आला, तो शांत पणे विचार करतो की ही डायरीच शापित आहे, ही जर अन्य कोणाच्या हाती लागली तर त्यालाही त्रास होऊ शकेल म्हणून तो त्या विपिनच्या कथेतच लिहितो की, "अंततः ही डायरीच उडून लांबवर जाते, तिथे जाऊन स्वतःच पेट घेते व जळून पूर्ण राख होत पंचतत्वात विलीन होते.


नितीन कुलकर्णी,

एल ४०१, साम्राज्य सोसायटी

पौड रोड, कोथरूड,

पुणे ३८

वय ७०वर्ष, सेवानिवृत्त

मोबाईल 8108513300

 
 
 

Recent Posts

See All
विजय विश्वासाचा

ही कथा आहे स्वातंत्रपूर्व काळातील, म्हणजे १९४५ सालातील. भांबुरड्याच्या एका शाळेतील मैदानावर गेले काही दिवस आंतरशालेय क्रिकेटच्या स्पर्धा सुरू होत्या, अटीतटीचे सामने सुरू होते. आज अंतिम स्पर्धा खूप चुर

 
 
 
विरहाग्नीतील होरपळ

रिक्षा स्टँडवर मदन मिश्राची रिक्षा आली की सगळे रिक्षा वाले खुश व्हायचे, मदनचा आनंदी स्वभाव व सगळ्यांना मदत करण्याची वृत्ती, त्यामुळे...

 
 
 
किमेरिझम

उंच, पिळदार शरीरयष्टी असलेला पंचविशीतला एक देखणा तरुण, किती तरी वेळ एकाच चित्रा समोर स्थिरावलेला, एक टक त्या चित्रा कडे बघत असताना एक गोड...

 
 
 

Comments


Nitin's Blog

Contact

Ask me anything

Thanks for submitting!

bottom of page