विरहाग्नीतील होरपळ

रिक्षा स्टँडवर मदन मिश्राची रिक्षा आली की सगळे रिक्षा वाले खुश व्हायचे, मदनचा आनंदी स्वभाव व सगळ्यांना मदत करण्याची वृत्ती, त्यामुळे त्याच्या येण्याने स्टँडवरचे वातावरणच बदलायचे. मदन खूप मेहनती होता, गेल्याच वर्षी त्याने एक खोली भाड्याने घेतली व गावी जाऊन मिनूला आणि त्याच्या लाडक्या लहानग्या पूजाला कल्याणला घेऊन आला होता. पूजा नुकतीच चार वर्षाची झाली होती, मिनू व मदन, ह्या दोघांचीही इच्छा होती की पूजाला खूप शिकवायचे, त्यासाठी लागेल तेवढी मेहनत करण्याची दोघांचीही तयारी होती. मिनू काटकसरीने संसार करत असल्यामुळे मदनकडे थोडे पैसे साठले होते.
पूजा खूप बोलकी, खेळकर व गोड मुलगी होती.
आज ती गल्लीच्या तोंडाशी सर्व मुलां बरोबर खेळत असता तिला वेगाने जाणाऱ्या एका कारचा धक्का लागला. वाहन चालक एक स्त्री होती. "हा झोपडपट्टीचा भाग , इथे थांबले तर नक्कीच मार खावा लागेल," असा विचार करत तिने कारचा वेग वाढवत ती निघून गेली. ती वेगळ्याच रंगाची होंडा कार इतक्या वेगात निघून गेली की कोणी तिचा नंबर टिपू शकले नाही. जवळपासचे दुकानदार लगेच धावून आले, कोणी पूजाला उचलले, कोणी मदनला फोन केला तर एकाने मिनूला बोलावून आणले. मदन येताच पूजाला जवळच्या रुग्णालयात नेले. संयोगाने ते डॉक्टर कर्णिक यांचे ऑर्थोपेडिक रुग्णालय होते. डॉक्टरांनी तपासले, पायाचे हाड मोडले आहे व लगेच शल्यचिकित्सा करावी लागेल असे सांगताच मदनने पैश्याची सोय केली व डॉक्टरांनी पूजाला ऑपरेशन टेबलवर घेतले. दरम्यान मदनने पोलिस चौकीत जाऊन, पूजाला कार ने धक्का दिल्याची तक्रार नोंदवली. "रस्ता ही काय खेळायची जागा आहे का?" म्हणत पोलिस खेकसला व "तपास लागल्यावर कळवू " असे म्हणत हवालदाराने मदनला परत पाठवले. "गरीबांचा कोणी वाली नसतो," म्हणत मदनने रुग्णालय गाठले.
डॉक्टर स्वतः अनुभवी ऑर्थोपेडिक सर्जन होते व त्यांची पत्नीच ऍनेस्थेशिया देणार होती त्यामुळे ऑपरेशनला विलंबाचे काही कारणच नव्हते. मिसेस कर्णिक ऑपरेशन थिएटर मध्ये जाताना थोड्या घाबरलेल्या दिसत होत्या व ऑपरेशन टेबलवर त्याच मुलीला पाहून तर त्यांचे हातपायच लटपटायला लागले, त्यांना घाम फुटला, त्या जवळच असलेल्या स्टूल वर बसल्या, नर्सने त्यांना पाणी दिले. शेकड्यांनी ऑपरेशन केलेल्या डॉक्टर मिसेस कर्णिक यांना त्यांच्या स्टाफने प्रथमच इतके विचलित पाहिले असणार. कुठल्यातरी विचारात हरवून गेल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
डॉक्टर मॅडमच्या मनात त्या क्षणी तुफान घोंगावत असणार. त्या आधीच अपराधभावाच्या खोल गर्ततेत अडकलेल्या, त्या निष्पाप चार वर्षांच्या मुलीला आपल्याच चुकीमुळे गाडीखाली चिरडताना पाहिल्याचा त्रास सतत मन पोखरत असणार. अपघात होताच कारचा वेग वाढवत तिथून पळ काढला हा त्याहून मोठा गुन्हा, त्या चिमुकलीच्या पायावरून चाक जाताना उडालेली रक्ताची चिळकांडी, त्या मुलीचे किंचाळणे, हे दृश्य डोळ्या समोर थैमान घालत होतेच. अशातच ऑपरेशन टेबल वर तीच मुलगी पुन्हा समोर दिसावी, आणि तिलाच ऍनेस्थेशिया द्यायचा आहे, हे कळताच मॅडमच्या हातापायात एकदम बधिरता पसरली, मेंदूला झिणझिण्या आल्या. अपघाताचे ते भीषण दृश्य डोळ्या समोरून हलेना. सिरिंज हातात घेऊन त्या मॅडम किती तरी वेळ शून्यात नजर रोखून तशाच उभ्या होत्या. मॅडमचे हे विचित्र वर्तन स्टाफच्या लक्षात आले होते. डॉक्टर सरांनी,"काही प्रॉब्लेम, तब्बेत ठीक नाही का?" म्हणून विचारताच मॅडम थोड्या सावरल्या व सिरिंज भरायला घेतली पण ती अपघाताची घटना मॅडमच्या मनाचा पिच्छा सोडतच नव्हती. पेशंटचे वय लक्षात न घेता आपल्याच तंद्रीत पूर्ण सिरिंज भरली गेली व त्या छोट्या पेशंटला ऍनेस्थेशिया देत असताना कर्णिक सरांचे सहज लक्ष गेले, "स्टॉप" म्हणून ते ओरडले देखील पण तो पर्यंत पूर्ण सिरिंज पेशंटच्या शरीरात रीती झाली होती. परिणाम व्हायचा तोच झाला, ऑपरेशन सुरू व्हायच्या आधीच पेशंट दगावला. हे पाहताच मॅडमना भोवळ आली, नर्सने त्यांना आधार देत खुर्चीवर बसवले.
डॉक्टर सर व मॅडम खाली मान घालून अस्पष्ट स्वरात "सॉरी" हा शब्द पुटपुटत घाईघाईने निघून गेले. त्या 'सॉरी' ह्या शब्दाने मदन व मिनूचे आयुष्य उध्वस्त केले, त्यांनी पाहिलेल्या स्वप्नांचा चक्काचूर झाला, क्षणात होत्याचे नव्हते झाले. मिनू व मदन ह्या अचानक बसलेल्या धक्क्यातून सावरणे शक्यच नव्हते.
ह्या घटनेला आठवडा उलटून गेला होता पण दोघांच्याही मन:स्थितीत काहीच बदल नव्हता. दोघेही सतत पूजाच्या फोटोकडे पाहत आसवं गाळीत बसून रहायचे, जेवणाची शुद्ध नाही का रिक्षा चालवणे नाही.
त्यांना शेजाऱ्यांनी, मित्रांनी बरेच समजावले पण ते दोघेही पूर्ण खचले होते. मिनू भ्रमिष्टासारखे वागू लागली होती, पूजा गेल्याचे ती मानायला तयारच नव्हती. पूजाच्या वयाची मुलगी दिसली की, "माझी पूजा," म्हणत मिनू तिला जवळ घ्यायची व तिच्यावर मुक्यांचा वर्षाव करायची. जवळपासचे लोकं, ज्यांना मिनूची ही अवस्था माहित होती, ते समजून घ्यायचे.
मिनू पेक्षा मदन आता बराच सावरला होता, रिक्षा पण चालवायला लागला होता.
स्टँडवरच्या मित्रांना तो मिनूची काळजी व्यक्त करीत म्हणाला की, "पूजाला एखादी बहिण असती तर मिनू लवकर सावरली असती असे डॉक्टरांचे म्हणणे होते. "
इतर सगळे रिक्षावाले निघून गेल्यानंतर मदनाचा अगदी खास मित्र दिलीप, मदनच्या जवळ जात त्याच्या कानात कुजबुजला की, त्या डॉक्टर कर्णिकची मुलगी अगदी पूजाच्याच वयाची व अंगकाठीने पण तशीच आहे." "अरे पण तिचा आपल्याला काय उपयोग," असे म्हणत मदनने दिलीपचा तो विचार दुर्लक्षित केला. दिलीप आपले म्हणणे पुढे रेटत म्हणाला की, "डॉक्टर मॅडमच्या कारचा रंग व कंपनी रामलालने सांगितलेल्या वर्णनाशी जुळते आहे, शिवाय ऑपरेशनच्या वेळी हजर असलेली एक नर्स सांगत होती की, ऍनेस्थेशिया जास्त दिल्या मुळे ऑपरेशनच्या आधीच पूजाचा मृत्यू झाला,"
" पोलिसांनी आपल्याला टरकावलेच, कोर्टात गेलो तर डॉक्टर हात सैल सोडतील, मोठा वकील करतील, न्याय गरिबांसाठी नसतो रे" म्हणत मदनने एक मोठा उसासा सोडला आणि त्या चर्चेला तिथेच पूर्णविराम मिळाला.
दिलीपला मदनची काळजी स्वस्थ बसू देत नव्हती, दुसऱ्या दिवशी सायंकाळी दिलीप मदनला शाळेच्या सुनसान कट्ट्यावर घेऊन गेला. दिलीपच्या डोळ्यात एक वेगळीच चमक दिसत होती."कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा नसली तर कायदा आपणच का हाती घेऊ नये." "अरे पण त्या कर्णिक बाईंना शिक्षा झाल्यानी आपली पूजा परत मिळणार आहे का? आणि त्यांना अगदी जेल झाली तरी त्यानी मिनूची तब्बेत सुधारणार आहे का?" असे म्हणत दिलीपचा विचार मदन ने खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
दिलीपच्या मनात मात्र वेगळाच कट शिजत होता, जवळपास कोणी नाही ह्याची खात्री करत दिलीप, त्याचे डोळे विस्फारत, मदनच्या कानात हळूच कुजबुजला की, "आपण डॉक्टरची मुलगी उचलायची, न्याय सरळमार्गी मिळत नसेल तर ओरबाडून घ्यायचा." मदन 'आ' वासून दिलीपचे म्हणणे ऐकतच राहिला.भीतीचे अधिराज्य त्याच्या चेहऱ्यावर स्थापित झाले होते. अंगावरील पाल झटकावी तसा हा विचार मदन ने झटकला. त्याने कपाळावरचा घाम टिपला. हातांनी, चेहऱ्याने, डोळ्यांनी, सर्वांगाने तो नाही म्हणत मटकन खाली कट्ट्यावर बसला. "अरे ही असली कामं आपली नसतात, ती निर्ढावलेली वेगळीच माणसं असतात." अजूनही मदनची मान नकारार्थी हलत होती. "आणि आपले प्रयत्न फसले तर?" हे उच्चारताना एक मोठा प्रश्नचिन्ह मदनाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. "नको नको," म्हणत मदन उठला व दोघेही घरी परतले.
त्या रात्री उशिरा पर्यंत मदन झोपूच शकला नाही, दिलीपचे विचार मदनला झोपू देत नव्हते. त्याचा अत्यंत सरळ स्वभाव व दुसरीकडे मिनूची मानसिक अवस्था त्यामुळे, दिलीपने सुचवलेल्या विचाराचे घड्याळाच्या लोलकाप्रमाणे कधी होकारात तर कधी नकारात दोलन चालू होते.
शेवटी त्याच्या मनातील अंतरद्वंद्व एका निर्णयाला पोहचले होते. त्याचे मिनू वरचे अमाप प्रेम, ह्या अपघातापायी मिनूची झालेली विकल अवस्था, त्याच्या सरळ साधे पणाला डावलून सूडबुद्धीचा उमललेला अंकुर, दिलीपला शोधायला भाग पाडत होता.
दिलीप भेटताच मदन सगळी हिंमत एकवटून बोलू लागला, "चालेल, मिनूच्या तब्बेतीसाठी मी काहीही करायला तयार आहे, काय व कसे करायचे ते सांग." दिलीप त्याचा प्लॅन सांगायला अधीर होताच, "डॉक्टर कर्णिक यांची मुलगी रोज डे केअर मधे जाते, गणपतच्या रिक्षातून तिची ने आण होते, गणपत किती वेंधळा आहे हे जगजाहीर आहेच. ह्या परिस्थितीचा आपण फायदा घेऊ शकतो." दिलीप त्याचा प्लॅन पुढे सांगू लागला की, "पाटण्याच्या रेल्वेची दोन तिकिटे काढायची, मिनू वहिनींनी आधीच स्टेशनवर जाऊन थांबायचे, आपण डॉक्टर कर्णिक यांची मुलगी, शरयूला डे केअर मधून सरळ कल्याण स्टेशन वर न्यायचं, त्याच सुमारास पाटण्याची गाडी आहे." "पण ती मुलगी आरडा ओरडा करेल व सहप्रवाश्यांच्या मनात उगाच शंकेला कारण व्हायचे," ही रास्त शंका मदनने विचारणे स्वभाविकच होते. पण दिलीपचा प्लॅन पूर्ण विचारांती ठरवलेला होता, त्याने मागील पट्टीतील खोलीत राहणाऱ्या नर्सबाईं कडून थोडे क्लोरोफॉर्म मिळवले होते. "तिकीट पाटण्याचे काढायचे व वाटेत तुमच्या गावी उतरायचे, पुढचे तिकीट वाया गेले तरी चालेल, पण शंकेला कारण नको." हा प्लॅन दिलीपने सांगितला.
गावी जायच्या आधी मदन ने त्याची रिक्षा विकली, खोली रिकामी केली. "इथे पूजाची सतत आठवण येत रहाणार, मिनूची तब्बेत अजूनच बिघडेल, त्यापेक्षा गावी गेलेले बरे. तिथे शेतीवाडी आहे त्यात मिनुचे मन रमेल." हा मदनाने सगळ्यांना सांगितलेला विचार सहज पटण्याजोगाच होता.
दिलीपच्या प्लॅन प्रमाणे सर्व व्यवस्थित पार पडले पण गावी जायच्या ऐवजी ते बरेच आधी उतरले व बसने रायपूरला गेले. अगदीच अनोळखी जागा असल्या कारणाने शरयू बद्दल शंकेला जागाच उरली नाही. हळू हळू शरयू त्या गावात रमली व पूजा नावानीच ओळखली जाऊ लागली. शरयू कालांतराने तिचे आधीचे नाव, खरे आई वडील, पूर्वी राहत असलेलं घर सगळं विसरली.
डॉ. कर्णिक यांनी त्यांची तीन वर्षांची मुलगी शरयू हरवल्याची पोलिस स्टेशन मध्ये एफ. आय. आर. नोंदवली होती व आपली प्रतिष्ठा वापरून शक्य तेवढे सर्व प्रयत्न केले होते. पोलिस मदनाच्या गावी व पाटण्याला पण जाऊन चौकशी करून आले, पण निराशाच पदरी पडली होती.
"ह्या सगळ्याला आपणच कारणीभूत आहोत, आपण केलेल्या गुन्ह्यामुळेच हे असे घडले," ह्या विचारांचे ओझे त्यांना सहन झाले नसणार, त्यामुळे का काय, मिसेस कर्णिक यांना अर्धांगवायू झाला. नवरा डॉक्टर असूनही त्या कायमच्या हंथरुणाला खिळल्या.
ह्या सगळ्याचे परिणामस्वरूप डॉ. कर्णिक पण एकलकोंडे झाले, व्यवसायावर देखील खूपच परिणाम झाला.
मध्यंतरी बावीस वर्षांचा काळ लोटला, पूजा आता तरुण झाली होती, रूपने बहरली होती. देवाने तिला बुद्धी व रूप ह्यात झुकतं माप दिलं होतं. यंदाच ती रायपूरच्या मेडिकल कॉलेज मधून एम बी बी एस झाली होती व मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजच्या ऑर्थोपेडिक शाखेत एमएस करण्या साठी तिने प्रवेश घेतला.
आज एक खूप सिनिअर गेस्ट व्याख्याता, डॉ. कर्णिक यांचे लेक्चर होते. पूजा कायम पहिल्या रांगेत बसायची. डॉक्टर कर्णिक यांनी पूजा कडे पहाताच, त्यांना तरुणपणीच्या मिसेस कर्णिक यांच्याशी तिचे साम्य जाणवले, तेच रूप, तीच तडफ, हसून बोलण्याची लकब ही तशीच, हे पाहून आज डॉ. कर्णिक यांचे चित्त विचलित होत होते. त्यांनी कसे तरी लेक्चर उरकले व स्टाफ रुम मधे जाऊन डोळे मिटून शांत बसून राहिले. डॉ. कर्णिक यांनी कॉलेजच्या रेकॉर्ड मधून तिचे पूर्ण नाव, गाव, आधीच्या कॉलेजचे नाव वगैरे माहिती मिळवली, शिवाय त्यांनी नर्स करवी वेगळे कारण सांगून पूजाचा ब्लड व डीएनए रिपोर्ट काढून घेतला.
आजही पूजाने एम एस च्या परीक्षेत टॉप केले होते. कॉलेजने तिचा कौतुक सोहळा आयोजित केला. पुजाने लगेच तिच्या पप्पांना फोन लावला, त्यांना निकाल सांगताच आनंदाश्रू मदनच्या डोळ्यातून वाहू लागले. दोन वर्षांपूर्वी प्रदीर्घ आजारपणात मिनू वारली, तेव्हापासून मदन खूपच हळवा झाला होता. लेकीची प्रशंसा व मिनूची आठवण, त्याच्या गालावरून ओघळणाऱ्या महापुराला थांबूच देत नव्हती. पूजाच्या समजुतीच्या शब्दांनी मदन सावरला. "पप्पा, तुम्ही कॉलेजच्या ह्या सोहळ्याला आलेच पाहिजे, आणि आता ट्रेनने नाही, विमानाने या, मी विमानाचे तिकीट पाठवले आहे. माझी मैत्रीण तुम्हाला विमानतळावर घेऊन जाईल व इथे मुंबईच्या विमानतळावर मी तुमच्या स्वागतासाठी हजर असेनच." लेकीचे एवढे मोठे कौतुक पहायला कोणाला आवडणार नाही पण संकोच व भीती, त्याचे पाय मागे खेचत होते. अर्थात इतक्या समजूतदार लेकीच्या प्रथमच केलेल्या हट्टा पुढे मदनचे काय चालणार होते.
सोहळ्यासाठी म्हणून स्वतः बरोबर पप्पांसाठी पण छान कपडे, बुट घेतले. कार्यक्रमात पूजा तिच्या पप्पांसह पहिल्याच रांगेत बसली होती. मदन आज प्रचंड खुश होता, त्याच्या मेहनतीचे सार्थक झाले होते. तो पापण्यांवर रेंगाळणारे आनंदाश्रु लोकांच्या नजरा चुकवत हळूच टिपत होता. आनंद त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता, तेवढ्यात डॉ. कर्णिक, मिसेस कर्णिक यांची व्हील चेअर ढकलत मदनच्या समोरून जात कोपऱ्यातल्या खुर्चीवर बसले. त्याची नजरानजर झाली, दोघांनी एकमेकांना ओळखलेही. मदनला ओशाळल्या सारखे झाले, मदनाच्या चेहऱ्यावरील आनंद लोप पावला, अपराधभावाने ती जागा बळकावली. मदन आपला चेहरा लपवू लागला, डॉ. कर्णिकांकडे बघण्याची त्याची हिंमतच होईना, उगाच मुंबईत आलो, त्या जुन्या आठवणींमुळे तो आणखीनच खजील झाला.
सोहळा उत्तम पार पडला, पूजा आपल्या मनोगतात पप्पांच्या बद्दल असलेला पराकोटीचा आदरभाव व्यक्त करत होता. ती म्हणाली की, "गरिबी काय असते हे मी खूप जवळून अनुभवली आहे, माझे संपूर्ण शिक्षण रायपूर मध्येच झाले, पप्पांनी दिवसातले पंधरा सोळा तास सायकलरीक्षा चालवून माझ्या मम्मीचे आजारपण व माझ्या शिक्षणाची निकड भागवली. मला माझ्या पप्पांचा अभिमान वाटतो. मी ठरवले आहे की माझ्या शिक्षणाचा फायदा गोरगरिबांना देण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे."
कार्यक्रम संपल्यावर डॉ. कर्णिक यांनी पूजा व तिच्या पप्पांना चहा साठी घरी बोलावले.
मदन डॉ. कर्णिक यांचे घरी जायला आढेवेढे घेऊ लागले, पण पूजाने त्यांना सांगितले की, "डॉ. कर्णिक खूप चांगले सर आहेत, मला त्याचे छान मार्गदर्शन मिळेल."
दुसऱ्या दिवशी निश्चित समयी पूजा व तिचे पप्पा डॉ. कर्णिक यांचे घरी पोहचले. डॉक्टर झटकन दोघांच्या स्वागता साठी पुढे आले व त्यांना पूर्ण आदराने आपल्या प्रशस्त ड्रॉइंग रूम मध्ये घेऊन गेले. चहा घेता घेता एकमेकांची विचारपूस झाली, इतर गप्पा झाल्या. मिसेस कर्णिक बोलल्या नाहीत पण त्यांच्या गालावरून ओघळणाऱ्या अश्रुधारा बरच काही सांगू पाहत होत्या. त्या उभयतांच्या डोळ्यातील स्निग्धतेतून वात्सल्याचा अखंड वर्षाव पूजावर होत होताच.
थोड्या वेळाने डॉ. कर्णिक म्हणाले की, "पूजा, तू जर रागावणार नसलीस तर एक सांगायचे होते." पूजा ने तिच्या चेहऱ्यावरील स्मिताने संमती देताच डॉक्टर वात्सल्यपूर्ण स्वरात म्हणाले की,"पूजा, आम्हा उभयतांना का कोणास ठाऊक पण राहूनराहून असे वाटते की आम्ही तुझे बायोलॉजिकल पेरेंट्स आहोत व तू आमची मुलगी म्हणजे शरयू आहेस, जी सुमारे चोवीस वर्षांपूर्वी हरवली होती."
डॉ. कर्णिक यांचे हे वाक्य घणाचा घाव घातल्या सारखे पूजाच्या मनावर आदळले, तिच्या चेहऱ्यावरील भाव क्षणार्धात बदलले, ती प्रचंड संतापली व तिचे संपूर्ण शरीर थरथर ** कापत होते, तिचे डोळे आग ओकत होते, तिच्या शब्दांना तलवारीची धार आली होती. "हे शक्य नाही, मी लहानपणापासून रायपूर मध्येच वाढले, तिथेच शिकले. हा असा माझा व माझ्या पप्पांचा अपमान करण्या साठी आम्हाला इथे बोलावले आहे का? मला आता एक क्षणही इथे थांबायची इच्छा नाही, केवढा आदर होता तुमच्या बद्दल, तो एका क्षणात तुम्ही धुळीला मिळवलात. चला पप्पा," म्हणत ती पप्पांकडे वळली, तर मदनाची मान खाली व डोळ्यातून अश्रू धारा वाहत होत्या. त्याचे संपूर्ण शरीर थरथरत होते, तोंडातून शब्दही फुटत नव्हते. "मी तुझा गुन्हेगार आहे बेटा, मला माफ कर" कसे तरी मदन हे शब्द पुटपुटत असतानाच दिलीपचा फोन आला. मदन बोलण्याच्या स्थितीतच नसल्या मुळे पूजाने फोन घेतला, खरं तर ती ही बोलण्याच्या स्थितीत नव्हती तरी पण त्रोटक शब्दात ती म्हणाली, "दिलीप काका आम्ही डॉ. कर्णिक यांचे घरी आहोत, ते माझ्यावर भलताच आरोप करत आहेत व त्यामुळे पप्पा खूप विचलित झाले आहेत, तुम्ही जमल्यास इथे या व पप्पांना घेऊन जा." लगेच मागे वळून तिने डॉ. कर्णिक यांची परवानगी मागितली.
मदन सारखा रडतच होता. दरम्यान डॉ. कर्णिक यांनी पूजाचे व आपले डी.एन.ए. रिपोर्ट तिच्या समोर ठेवले. ते पाहून पूजा अजूनच गोंधळली, ते रिपोर्ट डॉ. कर्णिक यांच्या कथनाची पुष्टी करत होते. तिथे असलेले सगळेच विमनस्क अवस्थेतच होते. कोणीच बोलत नव्हते. तेवढ्यात दिलीप आला व सरळ मदन जवळ गेला व त्याच्या पाठीवरून हात फिरवत त्याला धीर देऊ लागला. मदन उठला व ,"मी गुन्हेगार आहे," म्हणत दिलीपच्या मिठीत शिरून ओक्साबोक्सी रडू लागला. मदनला शांत करत दिलीप स्पष्टपणे, शांत स्वरात, पण अत्यंत गंभीरपणे म्हणाला की, "तू एकटाच गुन्हेगार नाहीस, पूजा सोडली तर इथे उपस्थित सगळेच अपराधी आहेत. मिसेस कर्णिक यांनी तुझ्या लहानग्या पूजाला कारने चिरडले, व त्यानंतर स्वतः डॉक्टर असून न थांबता निघून गेल्या. ही केस कोर्टात गेली असती तर ' हिट अँड रन ' हा ही मोठा गुन्हा ठरला असता, पूजाला ऍनेस्थेशियाचा मोठा डोस दिल्या मुळे तिचा मृत्यू झाला होता. त्यावर डॉ. कर्णिक यांनी स्वतःच्या बायकोचा गुन्हा लपवण्या साठी ' नैसर्गिक मृत्यू ' चे सर्टिफिकेट दिले, हा ही गुन्हा छोटा नव्हता. मिनू वहिनींना लहान मुलगी त्यांच्या जवळ असल्यास त्या भ्रमिष्टपणाच्या आजारातून लवकर बऱ्या होतील असे डॉक्टर म्हणाले म्हणून तू हे धाडस केलेस, हा तुझा अपराध, आणि अर्थात हे करायला मी तुला प्रवृत्त केले तो माझा गुन्हा." दिलीप प्रत्येक व्यक्तीचे नाव उच्चारताना त्या व्यक्तीची अपराधभावाने खाली जाणारी मान त्यांच्या गुन्ह्याची कबुली देत होती. सगळेच आपल्या कृत्यामुळे शरमले होते पण पूजा प्रचंड गोंधळून गेली होती. ती दोन्ही हातात आपले डोके घट्ट दाबून खाली कार्पेटवरच बसली होती. सगळ्यांनी आपला स्वार्थ साधला होता.
तेथील वातावरण पूर्ण स्तब्ध झाले होते, जणू कालचक्रच थांबले होते. कोणी कोणाशी एक शब्द देखील बोलत नव्हते, दोन्ही हातात आपला चेहरा लपवून चेहऱ्यावरील आलेला खजील पणाचा भाव कोणाला दिसू नाही असा प्रयत्न सगळेच करत असणार.
त्या शांततेचा भंग करीत पुजा उठत म्हणाली की, "आत्ता माझे डोके खूप भणभणते आहे, आपण दोन दिवसांनी भेटू. "
डॉ. कर्णिक यांनी येथील उपस्थितांना नकळत पोलिसांना चोवीस वर्ष जुनी फाईलची आठवण करून दिली व कर्णिक यांच्या घरातून बाहेर पडत असतानाच मदन व दिलीप यांना पोलिसांनी अटक केली. कर्णिकांच्या ह्या दगाबाजी मुळे दिलीप चिडला व त्याने डॉक्टर कर्णिक द्वयांचे गुन्हे ही पोलिसांना सांगितले, परिणामी कर्णिक द्वय ही पोलिस कस्टडीत गेले. दुसऱ्याच दिवशी त्या चौघांना कोर्टासमोर हजर केले गेले. चौघांनाही कमीतकमी शिक्षा व्हावी म्हणून पूजा मुंबईतले खुप प्रतिष्ठित वकील केले.
दुसऱ्या दिवशी कोर्टात चौघांनीही कुठलेही तर्क वितर्क न करता त्यांच्या गुन्ह्याची स्पष्ट कबुली दिली. कोर्ट त्यांचा निकाल सुनावणार त्या पूर्वी, कोर्टाच्या परवानगीने पूजा विटनेस बॉक्स मधे जाऊन तिचे विचार मांडायला सुरुवात केली. "सगळेच गुन्हे परिस्थितीवश घडले आहेत हे स्पष्ट दिसते, अर्थात त्यामुळे त्यांच्या गुन्ह्याचा दाह कमी होत नाही.
सर्वप्रथम अपराध घडले मिसेस कर्णिक यांच्या हातून, त्या एक स्त्री, एका समवयस्क मुलीची आई, शिवाय एक डॉक्टर, त्यामुळे ह्या अपराधांच्या समयी त्यांचे वर्तन अत्यंत गैर होतेच, ह्यात दुमत नाहीच. पण तेव्हाच कोर्टाने त्यांना जी शिक्षा दिली असती त्या पेक्षा नियतीने त्यांना दिलेली शिक्षा अनेक पटीने जास्त आहे असे मला वाटते. व्हील चेअर व बसलेल्या मिसेस कर्णिक यांनी किंचित मान वर करून पूजा कडे पाहिले, त्यांच्या डोळ्यातून ममतेचा महापूर डोळ्याच्या कडा झुगारून वाहू लागला होता.
डॉ. कर्णिक यांनी बायकोचा गुन्हा झाकण्यासाठी खोटे सर्टिफिकेट देऊन डॉक्टरी पेशाला लाजवणारे वर्तन केले. नियतीने त्यांना एकलकोंडे पणाची शिक्षा दिली व सर्व काळ त्यांना बायकोच्या सेवासुश्रुतेत आपले तारुण्य घालवावे लागले, त्यांचे वैवाहिक जीवन पूर्णपणे उध्वस्त झाले. त्याच्या व्यवसायाचा ग्राफही उत्तुंग शिखरावरुन शून्यावर आला. स्निग्ध डोळ्यांनी डॉक्टरांनी पूजा कडे एक दृष्टी टाकली.
दिलीपकाकाने मित्राच्या व वहिनीच्या काळजी पोटी त्याच्या वैचारिक कुवतीनुसार तो मार्ग त्याने सुचवला, त्याबदल्यात त्याने चार दिवस पोलिस कस्टडी मधील हिसका सहन केला आहेच.
आता माझे पप्पा म्हणजे मदन मिश्रा यांचा अपराध देखील अक्षम्य आहेच, मम्मीची तब्बेत लवकर सुधारावी हा प्रांजळ हेतू होता. आपल्याला हा हेतू हास्यास्पद वाटू शकतो पण ती परिस्थिती व त्यांची वैचारिक क्षमता पाहता, आक्षेपार्ह नाही वाटत. ते अशिक्षित, त्यामुळे त्यांनी अर्थार्जनासाठी सायकलरिक्षा चालवली, लहानपणी माझी कुठलीच इच्छा त्यांनी अपूर्ण राहू दिली नाही, मम्मीचे आजारपण, माझ्या शिक्षणाचा खर्च पूर्ण करण्यासाठी अक्षरशः अंगात ताप असताना सुद्धा त्यांनी ऊन, थंडी, पाऊस ह्याची तमा न बाळगता रिक्षा चालवली, ही आपसुकच झालेली शिक्षा खूपच होती."
थोड्या वेळाची स्तब्धता मोडत पूजा पुढे बोलू लागली, "खरं तर ह्या सगळ्याच्या केंद्रस्थानी मी असून सुद्धा गेल्या दोन दिवसात ह्या केस मधे झालेल्या चर्चेत माझा उल्लेखही झाल्याचे माझ्या स्मरणात नाही." एक मोठा उसासा सोडत पूजा पुढे सांगू लागली की ****, "माझी काहीच चूक नसताना मी खूप भोगले आहे. सोन्याचा चमचा तोंडांत घेऊन जन्माला आलेली मी, संपूर्ण आयुष्य दारिद्र्यात घालवलं, अर्थात ती माझी खंत नाही, कारण त्या परिस्थितीने मला जगण्यासाठी संघर्ष करायला शिकवले, मन खंबीर केले. मी शरयू कर्णिक म्हणून राहिले असते तर मला खूप महागडी खेळणी मिळाली असती, उंची कपडे घालू शकले असते, तारांकित हॉटेलात जाऊन कॉन्टिनेन्टल खाता आले असते, पण मग आभावात जगण्याची शिकवण नसती मिळाली. मला वेगळे बेडरूम, इंपोर्टेड मऊ पांघरुण ही मिळाले असते **, पण मला मम्मीच्या कुशीतली ऊब नसती मिळाली. मला जीवनात खूप भोगायला लागले, त्याचे मला दुःख जरी नसले तरी माझी माननीय कोर्टाला विनंती आहे की मी गेल्या चोवीस वर्षात जेवढे भोगले आहे ते ह्या चौघांच्या शिक्षेत ऍडजस्ट करता आले तर मला आनंदच होईल."
अंतत: कोर्टाने सगळ्यांचे म्हणणे ऐकून चौघांचीही सरसकट तीन महिने जेल मध्ये रवानगी केली.
दुसऱ्याच दिवशी पूजाने वकिलांच्या मार्फत चौघांचाही जामीन मंजूर करून घेतला व स्वतः चौघांनाही जेल मधून सोडवून आणले.
++_+_+_+_+_
Comments