top of page
Search

विजय विश्वासाचा

Writer: Nitin Kulkarni
Nitin Kulkarni
Nov 22, 2025
3 min read

ही कथा आहे स्वातंत्रपूर्व काळातील, म्हणजे १९४५ सालातील. भांबुरड्याच्या एका शाळेतील मैदानावर गेले काही दिवस आंतरशालेय क्रिकेटच्या स्पर्धा सुरू होत्या, अटीतटीचे सामने सुरू होते. आज अंतिम स्पर्धा खूप चुरशीची नक्कीच होणार होती. पुणे कँपातील गोऱ्या विद्यार्थ्यांची इंग्रजी शाळा आणि भांबुरड्यातील मराठी शाळा, अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. दोन्ही संघ तुल्यबळ होते, पारडं कोणाच्या बाजूने झुकेल हा अंदाज लावणे कठीण होते.

नाणे फेक मराठी शाळेने जिंकली व प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आठ बॉल ची ओवर व पंचवीस ओवरची मॅच, असे ठरले होते. अंपायर इंग्रज होते, साहजिकच त्यांचे झुकते माप गोऱ्यांकडेच होते. मराठी शाळेचे क्षेत्ररक्षण उत्तम होते, जिवाच्या आकांताने धावत होते, एक एक धाव वाचवत होते. फिरकी गोलंदाजाला छान यश मिळाले, पहिल्या पाच षटकात गोऱ्यांचे तीन चांगले फलंदाज बाद झाले त्यामुळे गोऱ्या प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. आता त्यांचा सर्वोत्कृष्ट खेळाडू, जॉन, फलंदाजी करायला आला, त्याच्या फटकेबाजीने गोऱ्या प्रेक्षकात उत्साह संचारला. धो धो येणाऱ्या चौकार षटकारां मुळे फलकावरील धाव संख्या द्रुत गतीने वाढत होती. तेवढ्यात जॉनचा एक षटकार अडवत झेल घेतला, मराठी शाळेतील खेळाडू नाचून आनंद व्यक्त करू लागले पण अंपायरचा एक हात वर जाता जाता दोन्ही हात वर गेले व जॉनला बाद ऐवजी षटकार दिला. वाद घालण्यात काहीच अर्थ नव्हता, गोरे अंपायर गोऱ्यांनाच साथ देणार. अंततः त्यांचे २५ षटकात त्यांच्या १२४ धावा झाल्या. १२५ धावांचे ध्येय समोर ठेऊन मराठी शाळा फलंदाजीला आली. अंपायर चुकीचा निर्णय द्यायला निर्ढावले होतेच, त्यांनी पहिल्या तीन पैकी दोन फलंदाजांना चुकीचे बाद घोषित केले होते. धाव संख्या ही बेताचीच होती. 

अंपायरचा हा खोटारडेपणा पहिल्या इयत्तेतील छोटा दामू पहात होता, गालावरून अश्रू ओघळत होते,  संतापाने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले होते, कानशीलं तापली होती. प्रतिकार करणे तर सोडाच साधा विरोध दर्शवणे सुद्धा इथे योग्य नव्हते.

दामू उठला, मागे वळला व आत्मविश्वासाने पाऊले टाकीत मैदाना बाहेर जाऊ लागला. मैदाना बाहेर थोड्याच अंतरावर एक पार होता, त्यावर शेंदूर फासलेला, उन्ह पाऊस झेलत असलेला मारुती होता. एरवी मुलं चकाट्या पिटायलाच त्या पाराचा उपयोग करायची, हनुमान जयंती वगळता तो मारुती तसा दुर्लक्षितच होता. दामुची मात्र खूप श्रद्धा होती, तो रोज शाळेत जाता येता मारुती पुढे डोकं टेकल्याशिवाय पुढे जात नसे. आईने कधी लाडू किंवा पुरणपोळी डब्यात दिली तर त्यातला एक छोटा तुकडा तरी मारुती समोर ठेवायचा.  दामू रडत रडतच येऊन मारुती समोर बसला, संतापापायी त्याच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते, तो नुसता धूमसत होता, उन्हा मुळे त्याचा चेहरा लाल झाला होता, अश्रुधारा अखंड वाहत होत्या. खोटेपणाचा राग त्याच्या शब्दातून उमटत होता, एखाद्याला खडसावून जाब विचारावे  तसे तो मारुतीशी बोलू लागला. "मैदानावर काय चालले आहे ते तू बघतो आहेस ना, खेळात सुद्धा निव्वळ खोटारडेपणा, ही बेइमानी सहन होते का तुला? परवा तर कथेकरी बुवा सांगत होते की तू चिरंजीव आहेस, आजही तू भक्तांच्या हाकेला धावून जातोस. माझी आजी नेहमी तुझ्या गोष्टी सांगते, ती म्हणते की अंतःकरणा पासून प्रेम, विश्वास असेल, खरी श्रद्धा असली तर तू पावतोस. खेळातले पक्षपाती निर्णय मला बघवेना म्हणून सरळ तुझ्या कडे आलो. अंपायर चेंडूगणीक लबाडी करत आहेत, ज्यांच्यावर दोन्ही संघांनी विश्वास ठेवावा तेच अंपायर विश्र्वासघातकी निघाले. खेळात जिंकल्या हरल्याने काही फार फरक नाही पडत, त्याची* हुकूमत म्हणून त्यांनी सदोदित अन्याय करावा, आणि तो आम्ही मुकाट्याने सहन करावा, हे पटतं कारे तुला? टिळक, सावरकर, राजगुरू, भगतसिंग सगळे इंग्रजांच्या अन्याया विरुद्ध लढले ना? मी छोटा आहे म्हणून तुझी मदत मागायला आलो आहे, करशील नं मला मदत? तू आज जर का मदत नाही केलीस, सत्याच्या बाजूने उभा राहिला नाहीस, तर माझा आणि माझ्या मित्रांचा तुझ्या वर विश्वास बसेल का? तू सीतामाईला शोधायला एका उडीत समुद्र पार केलास, लक्ष्मणा साठी एका रात्रीतून हिमालयात जाऊन आख्खा डोंगर उचलून आणलास. माझे आबा म्हणतात की तुला काहीही सहज शक्य आहे. राम रावण युद्ध, खऱ्याचं खोट्या विरुद्ध, अन्याया विरुद्ध युद्ध होतं नं? राम तर सक्षम होता, तरी तू त्याला मदत केलीस, मी तर किती छोटा आहे अजून ह्या अन्याया विरुद्ध लढायला, म्हणून तुझी इतकी मनधरणी करतोय, पण तुझी काहीच हालचाल नाही. तू आमच्या शाळेला न्याय मिळवून देणार नसशील तर," बोलता बोलता दामूच्या स्वरातील आर्जव कमी होऊन संताप जाणवू लागला होता.  जवळच ठेवलेला नारळ फोडायचा दगड दामूने झटकन उचलला आणि जवळ जवळ धमकवण्याच्या स्वरात तो बोलू लागला, "हे बघ मारुती देवा, आता जरका तू ह्या अन्याया विरुद्ध आमच्या शाळेच्या मदतीला नाही आलास तर, तुझ्याच समोर ह्याच दगडावर मी माझं डोकं फोडून घेईन." परत भाषेत थोडी गोडी, आर्जव आणत दामू मारुतीशी बोलू लागला, "माझ्या आबांनी मला नामदेवांची गोष्ट सांगितली आहे, नाम्याच्या हट्टा समोर साक्षात विठुरायाला देखील मूर्तीतून बाहेर येऊन त्याला नैवेद्य खावा लागला होता. माझी तुझ्या वरील श्रद्धा, भक्ती त्या नामदेवा पेक्षा जराही कमी नाही, तरी सुद्धा तू ह्या अन्यायाविरुद्ध आमच्या शाळेच्या मदतीला येणार नसला तर, हा दगड आणि माझे डोके," असे म्हणत तो दगडावर स्वतःचे डोके आपटणार तेवढ्यात खेळाच्या मैदाना कडून त्याच्या शाळेच्या विजयाचे, हर्षोल्हासाचे स्वर दामूच्या कानी पडले. दामू ने मागे वळून पाहिले, त्याची शाळा जिंकली होती आणि त्या आनंदात त्याचे मित्र आरडा ओरडा करत नाचत होते. दामूने तो दगड खाली ठेवला. त्याच्या डोळ्यातून अखंड आनंदाश्रु वाहू लागले होते. तो खाली वाकला व त्याने मारुतीचे पाय घट्ट धरले व त्यावर डोळ्यातील गंगा यमुनांचा अखंड अभिषेक सुरू झाला.


लेखिका: सौ. सई कुलकर्णी,

१०११३ नॉर्मन काउंटी, 

ऍव ऑफ चॅम्पियन्स,

अरविंग, डॅलस,

टेक्सास. यू.एस. ए 

+९१८०८७३४२७६०

 
 
 

Recent Posts

See All
शापित डायरी

लेखक : नितीन कुलकर्णी अकरावीतील अनिकेत, बाल साहित्याचा लेखक म्हणून बराच नावाजला होता. कालच त्याने शाळेच्या नोटीस बोर्ड वर, आंतरशालेय राज्यस्तरीय कथा स्पर्धे विषयी वाचले आणि त्याच्यात नवा उत्साह संचारल

 
 
 
विरहाग्नीतील होरपळ

रिक्षा स्टँडवर मदन मिश्राची रिक्षा आली की सगळे रिक्षा वाले खुश व्हायचे, मदनचा आनंदी स्वभाव व सगळ्यांना मदत करण्याची वृत्ती, त्यामुळे...

 
 
 
किमेरिझम

उंच, पिळदार शरीरयष्टी असलेला पंचविशीतला एक देखणा तरुण, किती तरी वेळ एकाच चित्रा समोर स्थिरावलेला, एक टक त्या चित्रा कडे बघत असताना एक गोड...

 
 
 

Comments


Nitin's Blog

Contact

Ask me anything

Thanks for submitting!

bottom of page