top of page
Search

किमेरिझम

Writer: Nitin Kulkarni
Nitin Kulkarni
May 7, 2025
21 min read

उंच, पिळदार शरीरयष्टी असलेला पंचविशीतला एक देखणा तरुण, किती तरी वेळ एकाच चित्रा समोर स्थिरावलेला, एक टक त्या चित्रा कडे बघत असताना एक गोड आवाज मागून कुठूनतरी आला, आणि मार्कने पटकन मागे वळून पाहिले, तर एक सुंदर तरुणी आपल्या मधुर स्मितासह त्याच्या कडे येताना त्याला दिसली. जवळ आल्यानंतर परत त्याच गोड आवाजात "हॅलो" म्हणत हस्तांदोलनासाठी हात पुढे करत, "मी जेन, हे चित्र मीच काढले आहे" असे म्हणत जेनने एकदा चित्रा कडे तर किंचित मानेला हळूच झटका देत त्या तरुणाकडे पाहिले. तिची लांबसडक बोटे, गुलाबी नेलपॉलिशने आणखी सुशोभित झालेला मऊ गुलाबी हात, हातात घेत, "मी मार्क, मला वाटलच होतं की इतक्या सुंदर चित्राची चित्रकार देखील तितकीच सुंदर असणार," डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्या कडे पहात  किंचित स्मिताने त्याच्या प्रशंसेला उत्तर देत परत आपल्याच चित्रा कडे बघू लागली. संवादाला पुढे वाचा देण्यासाठी, सहज विचारले की, "तुम्ही पण चित्र काढता का?" तिच्या  ह्या प्रश्नाला, "छे छे हो, तुमच्या त्या कलाकुसरीशी माझा तिळमात्रही संबंध नाही. मी विटा, सिमेंट सारख्या निर्जीव वस्तू हाताळतो, तुमच्या सारखे रंगांच्या सहाय्याने कॅनव्हास वर मला बाग फुलवता येत नाही." त्याच्यात शब्दातून मनं फुलवण्याची कला आहे हे पहिल्याच भेटीत तिच्या लक्षात आले होते. "मी आर्किटेक्टचा अभ्यासक्रम पूर्ण करून, गेली तीन वर्ष डॅलस मधे रिअल्टरचा व्यवसाय करत आहे, जुन्या घरांना डागडुजी करून त्यात थोडी सुबकता आली की मग विकायचे." जेन मधली सेल्सवूमन जागी झाली, "हे पेंटिंग एकटक बराच वेळ बघत होता, मला वाटले त्यातील बारकावे पाहून त्याबद्दल काहीतरी सांगाल." चित्रा वरून नजर हटवत तिच्या कडे एक कटाक्ष टाकत तो म्हणाला की, "चित्रातले बारकावे मला कळत असते तर काय हो, तरी सुद्धा हे चित्र मला आवडले. ह्या चित्रात तुम्ही खिडकीची चौकट काढली आहे व त्यातून बाहेर दिसणारी बाग, त्यातील विविध रंगांची फुलं अगदी जिवंत वाटत आहेत. असे वाटते की खिडकीतून हात बाहेर काढून त्या सुंदर फुलांचा मखमली स्पर्श अनुभवावा." ही जेनच्या चित्राला मिळालेली खरी पोचपावती होती, हा कौतुकाचा वेगळाच प्रकार तिला खूपच भावला होता. त्याने ते चित्र विकत घेतले व, "पुढच्या वेळेस परत असेच एखादे सुंदर चित्र असेल तर ते घ्यायला मला नक्कीच आवडेल," असे म्हणत बाय करत, त्याच्या डौलदार चालीत तो निघून गेला. तो दिसेनासा होईपर्यंत ती त्याच्याच कडे बघत होती.

डॅलस फोर्ट वर्थच्या ह्या प्रदर्शनात तिची बरीच चित्रं तर विकली गेली खरी पण मनही चाळवले गेले.

डॅलसच्या वेगवेगळ्या भागात दर तीन चार आठवड्यांनी प्रदर्शन भरते. तो पर्यंत जेनची दहा बारा तरी नवीन चित्र तयार व्हायची.


ह्या वेळेस साऊथ अरविंग मधे प्रदर्शन भरले होते. इथे बंगल्यांच्या नवीन कम्युनिटी बांधल्या जात होत्या, त्यामुळे ह्या भागात मार्कचे येणेजाणे बरेच वाढले होते.


आज हॉल मधे जेनच्या तेरा चित्रांनी एक कोपरा पूर्ण सुशोभित केला होता. बरेच जण येत होते, पहात होते, प्रशंसा ही भरपूर होत होती, काही चित्रं विकली पण गेली होती, पण डोळ्याच्या एका कोपऱ्यातून जेनचे लक्ष सतत दरवाज्या कडे होते, ती नक्कीच कोणाची तरी वाट पहात होती. तिने मनाला आवर घालण्याचा बराच निष्फळ प्रयत्न केला. आलेल्या दर्शकांना वेळ द्यायचा, चित्रांचे वैशिष्ठ्य समजावून सांगायचे, व जास्तीतजास्त चित्रं कशी विकली जातील हा प्रयत्न करायचा.


तिचे दारा कडे सहज लक्ष गेले व मार्कला येताना पाहून तिच्या चेहऱ्यावर आनंदाची एक लकेर  झळकली. आपले मन का सुखावले ह्या विचारांनी तिची तीच किंचित लाजली. मार्क पण इकडची तिकडची चित्रं न पाहता सरळ जेनच्या चित्रां कडे गेला व चेहऱ्यावर मिश्किल भाव आणत विचारले की, "एका जादुगरणीने कुठे आपले जादूई रंग विखुरले आहेत?" हे विचारत मार्कने जेनशी हस्तांदोलन केले.  "रंगात कसली जादू, खरी जादू तर तुम्ही शब्दातून विखुरता," असे म्हणत तितक्याच मिश्किलपणे मार्क कडे पाहिले. समोरच्याला तितकेच समर्पक उत्तर दिल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर नाचवत तिने मार्कला सहज विचारले की, "गेल्या वेळेला घेतलेले चित्र तुमच्या घरी सगळ्यांना आवडले का?" क्षणाचाही विलंब न करता मार्क उत्तरला की, "हो हो, म्हणजे काय, अगदी सगळ्यांनाच, अर्थात सगळे म्हणजे घरात मी एकटाच. असे म्हणत मार्क नवीन चित्र पाहू लागला. ह्या उत्तराने का कोणास ठाऊक, जेन मनोमन सुखावली होती.


त्याची नजर सूर्योदयाच्या एका चित्रावर स्थिरावली होती. तो विचार करू लागला की,  "उगवत्या सूर्याची नभी पसरलेली  लालिमा, ढगांवर आलेली गुलाबी किनार अधिक मोहक आहे का सागराच्या लाटांवर त्याचं प्रतिबिंब अधिक आकर्षक आहे?"  बराच वेळ ह्या चित्रावर नजर केंद्रित करून उभ्या असलेल्या मार्कला जेनने प्रश्नवाचक भाव चेहऱ्यावर आणत विचारले की, "आवडलं का?" मार्कने, स्वप्नातून जागे होत असल्याचे हावभाव करीत लगेच प्रतिप्रश्न केला की, " काय चित्र की चित्रकार,"  लटिक्या रागाने त्याच्या कडे पहात जेन म्हणाली, "मी चित्रा बद्दल विचारते आहे?" मिश्किलपणे मार्क म्हणाला की, "ओह, फक्त चित्रा बद्दलच विचारता आहात होय?" ह्यावर जेन ने त्याच्या प्रश्नाला लाडीकपणे तोंड वेडावून प्रतिक्रिया दिली. थोडा वेळ अशाच मिश्किल गप्पा झाल्यानंतर तिने बाजूला ठेवलेल्या क्रेट मधून दोन पाण्याच्या बाटल्या काढून, एक मार्कला देत दुसरी स्वतः उघडून पिऊ लागली. मार्कने त्याच्याच शैलीत विचारले की, "तुम्ही ग्राहकाला फक्त पाणीच विचारता का?" ह्या प्रश्नाला समोरून काहीच उत्तर येत नाही असे पाहून मार्कने खूप मृदु शब्दात विचारले की,"पाण्याच्या बदल्यात एखाद ग्राहकाने कॉफी ऑफर केली तर ती तुम्ही स्वीकारता का?" उत्तरादाखल तिने फक्त एक गोड स्मित चेहऱ्यावर आणीत त्याच्या कडे पाहिले. 

प्रदर्शनाची वेळही संपली होती. तिने तिची चित्रं गोळा करायला सुरुवात केलेली पाहताच त्याने सूर्योदयाचे चित्र स्वतः कडे घेत विचारले की,"मी थोडी मदत केली तर तुम्हाला चालेल का?" असे विचारत त्याने तिची चित्र उचलायला सुरुवात केली. "थोडी मदत म्हणजे" असे लाडीकपणे विचारत तिने, तिरकी मान करून डोळ्याच्या कोपऱ्यातून त्याच्या कडे पाहिले. "कारच्या डिक्कीत ठेवायला मदत, तेवढेच एका मोठ्या कलाकाराला मदत केल्याचे समाधान." मार्कचे हे साळसूद पणाचे उत्तर ऐकून जेन म्हणाली की, "मग थोडीच कशाला, थोडी जास्त मदत करा की, म्हणजे घरी ती चित्र उतरवायला देखील मदत करा की, म्हणजे तुमची ती कॉफीची अपेक्षा ही पूर्ण करता येईल. स्टारबक्स मध्ये कॉफी पिण्यापेक्षा घरी निवांत गप्पामारत कॉफी घेता येईल, अर्थात तुम्हाला वेळ असेल व माझ्या हातची कॉफी चालणार असेल तर?" उत्तरादाखल त्याने फक्त खांदे उडवून मधुर हास्याने प्रतिसाद दिला.

तिचे घर म्हणजे एक बेडरूमचा फ्लॅट, हॉलचा निम्मा भाग, त्यात सोफा सेंटर टेबल वगैरे , नीटनेटकेपणाची ग्वाही देत होते तर उरलेला निम्मा हॉल एका चित्रकाराची कार्यशाळा असल्याचे स्पष्ट दर्शवत होते. 


घरात शिरता शिरता ती म्हणाली, "सॉरी, माझं घर खूपच लहान आहे व त्यातही अर्धवट रंगवलेल्या चित्रांचा पसारा. मला एकटीला पुरते एवढी जागा, म्हणून मोठी जागा नाही घेतली." असे म्हणत ती अजून सिंगल असल्याचे बोलण्याच्या ओघात तिने सांगितले. 

मार्कला पाणी देत ती किचन मध्ये कॉफी बनवायला गेली. मार्कने तिच्या परवानगीने स्टँडवरची अर्धवट बनलेली चित्रं पाहिली , "म्हणजे पुढच्या प्रदर्शनात कुठले चित्र घ्यायचे ते आत्ताच ठरवता येईल," असे म्हणत परत सोफ्यावर येऊन बसला. एवढ्यात ती कॉफी व बिस्किटे घेऊन आली. "साखर जास्त नाही ना घातली?  हो, नाही तर, तुमच्या हाताचा गोडवा त्यात उतरला तर गोडमिट्ट व्हायचे, म्हणून सहजच विचारले," म्हणत मार्कने कॉफीचा कप उचलला. कॉफी बरोबर बऱ्याच गप्पा झाल्या, हसतखेळत एकमेकांचे आचार विचार, आशा अपेक्षा, आवडी निवडींचे आदानप्रदान झाले, दोघांचेही चेहरे आनंदाने उजळले, मने सुखावली. "खरं तर उठावसच वाटत नाही, तुझ्यातले चुंबकीय आकर्षण जाऊच देत नाही," असे म्हणत मार्क आनिछेनेच उठला व दाराकडे जाऊ लागला, जेनही इच्छे विरुद्ध उठत त्याच्या पाठोपाठ दारा कडे जाऊ लागली. दारा पाशी जाताच मार्क मागे वळला, जेन त्याच्या इतक्या जवळ होती की त्याने थोडे वाकून डावा हात तिच्या कमरे भोवती घातला व तिला हळूच जवळ ओढले. ह्या अनपेक्षित पण हव्याशा वाटणाऱ्या स्पर्शामुळे जेन थोडी लाजली, तिच्या चेहऱ्यावर ठेवणीतले स्मित होते, चोरट्या नजरेनी त्याच्या कडे वर पाहताच मार्कने तिच्या गुलाबी ओठांवर आपले ओठ टेकवले, तिचाही प्रतिसाद मिळताच त्यांनी दीर्घ चुंबनाचा आस्वाद घेतला. त्या चुंबनात नात्यातील औपचारिकता विरघळून गेली, मना बरोबर देहानेही जवळीकी साधली, दोघांच्याही मुखावर सुखावल्याचा भाव दिसू लागला. 


तो जाऊन कार मध्ये बसला व कार दिसेनाशी होई पर्यंत ती दरात उभी राहून पहात होती. तिच्या गालांवर चढलेली लाली, व मुखावरील बदलत असलेले भाव तिच्या मनातील विचारांना, आठवणींना प्रतिबिंबित करत होते. तिने दार लावले व तडक बेडरूम मध्ये गेली व बेडवर अंग टाकून दिले, उशिला घट्ट कवटाळून, किती तरी वेळ त्या सुखद आठवणींना मनात घोळवत पडून राहिली. मोबाईलच्या रिंगने तिची तंद्री भंग पावली. हवासा वाटणारा आवाज ऐकू आला, "कितीवेळ त्या बिचाऱ्या उशिला कवटाळशील?" "तू काय माझ्या बेडरूम मध्ये स्पाय कॅमेरा लावून गेला आहेस का काय?" म्हणत ती उठून बसली. बराच वेळ फोनवरही गप्पा रंगल्या, मोबाईल बंद करायला मन मानतच नव्हते. 

आता रोज गुडमॉर्निंग त्याच्या फोननेच होऊ लागली व गुडनाईट तर रोजच मध्यरात्र उलटून गेल्यानंतरच होत होती.


फोनवर रोज सकाळ संध्याकाळ तास तास बोलून सुद्धा दोघांचेही मन भरत नव्हते, तृष्णा भागतच नव्हती. फोन वरील गप्पांमध्ये एक आठवडा गेला. हा आठवडा बराच लांबल्या सारखा जाणवला. आज शनिवार उजाडला, प्रत्यक्ष भेटण्याची ओढ दोन्हीकडे सारखीच लागली होती. गुडमॉर्निंग बरोबर तो म्हणाला की, "गेला आठवडा फोन वरील गप्पांनी पोट भरतच नाही, रोज अर्धपोटीच झोपल्या सारखे वाटते," त्याच्या बोलण्यातील चावटपणा तिच्या लक्षात येत होता, त्याच्या बोलण्यातील लकब तीला भावत होती, "आज तरी पोटभर जेवता यावे, त्या साठी एकत्र डिनर घ्यावा ही विनंती करायची होती," जेन ही तितकीच उत्सुक्त होती. संध्याकाळी सातच्या आधीच 'ला मेरिडियन' रेस्टॉरंटच्या बाहेर मार्क हातात टवटवीत लाल गुलाबाचा गुच्छ घेवून उभा होता, बरोबर सात वाजता जेनने कार पार्क केली, मार्कने पुढे होत हळूच कारचे दार उघडले. शरीराचे सगळे कटस् , उभार खुलून दिसतील, इतका घट्ट वनपिस, तोही लाल रंगाचा तिने घातला होता, गळ्यात एक मोठ्या मोत्यांची माळ होती. तिचे हे रूप पाहताच मार्कचे नेत्र विस्फारले, तो तिच्याकडे बघतच राहिला, काही क्षण तिच्या रूपात, पेहरावात हरवूनच गेला. तिने त्याची ही अवस्था पाहून, मिश्किल हसत,"हाय" केले. तो थोडा सावरला पण तिच्या ह्या रूपाच्या मोहिनीतून तो अजूनही बाहेर पडला नव्हता. ती हसत त्याच्या ह्या अवस्थे कडे पाहत, त्याला भानावर आणण्यासाठी त्यानी आणलेल्या गुलाबांच्या सुंदरते विषयी बोलू लागली तेव्हा स्वप्न नगरीतील आपले विचरण थांबवून मार्क वास्तवात परतला व तिला ते पुष्पगुच्छ दिले. तिने ती फुलं छातीशी धरत, मान थोडी कलती करून त्या गुलाबांवर हलकेच आपले ओठ टेकवले. "मला त्या गुलाबाचा हेवा वाटू लागला आहे" मार्कचे हे वाक्य ऐकताच तिला कळले की तो पूर्णपणे नॉर्मल झाला आहे. मार्कने आपला उजवा हात अलगद पुढे केला त्यावर तितक्याच अलगदपणे तिने तिच्या डाव्या हाताची चार बोटं टेकवली. त्याने तिच्या ह्या हातावर हलकेच ओठ टेकवत तिला रेस्टॉरंट मध्ये घेऊन गेला, तिथे कोपऱ्यातले एक टेबल आधीच बुक करून ठेवले होते. छान जेवण झाले. खरं तर जेवणापेक्षा गप्पांमधेच दोघं जास्त रमले होते. तिने सहज विचारले की, "तुझे घर कुठे आहे?" मार्क टेबलावरचा टिश्यू उचलत सांगू लागला की, "इथून जवळच आहे, तुझ्या घराच्या वाटेवरच आहे. वाटल्यास थोडा वेळ तिथे थांबून पुढे जाऊ."


परतताना मार्कची कार एका छानशा बंगल्या समोर थांबली, तो पटकन उतरला व त्याने जेनच्या कारचे दार उघडले, जेन सावकाश उतरली. तिने एकदा मार्क कडे पाहिले व लगेच दृष्टी घरावर टाकली. घरा समोर हिरवेगार लॉन, विभिन्न रंगांची सिझनल फुलझाडं होती. मार्कने दार उघडले व त्याच्या पाठोपाठ तिने ही घरात प्रवेश केला व हॉल मधील सोफ्यावर बसली. दोघांनी फ्रुट ज्यूस घेतला, तो घराचा आराखडा समजावून सांगत होता पण तिची नजर मार्कने प्रदर्शनातून घेतलेल्या तिच्या पेंटिंग वर खिळली  होती. समोरच्या भिंतीवर मधोमध लावलेले ते चित्र लक्ष वेधून घेत होते. मार्क म्हणाला की, "ह्या समोरच्या खिडकी पलिकडे एक सुंदर जादुई बाग आहे." त्याच्या शब्दांना मस्त फिरकी घेत बाहेर पडायची जणू सवयच होती, तो असे काही बोलायला लागला की मंद स्मित करत तिरक्या नजरेनी त्याच्या कडे बघण्याची तिची लकब तितकीच मोहक होती. तो पुढे सांगू लागला की, "ह्या बागेतील फुलं बाराही महिने इतकीच टवटवीत असतात." शब्दांना घोळवत फिरवत प्रशंसा करण्याची त्याची ही पद्धत तिच्या आवडीची झाली होती. आत जाऊन घर, सगळ्या खोल्या नजरे खालून घालाव्या असा विचार तिच्या मनात डोकवायला आणि,  "घरात काय फक्त एवढा हॉलच नाही, माझे ऑफिस, गेस्ट रुम, किचन," आणि एक चावट नजर तिच्या कडे टाकत, "बेडरूम ही आहे," असे म्हणत त्याने तिचा हात हळूच हातात घेतला व तिला घर दाखवायला आत नेऊ लागला. त्याचे प्रशस्त ऑफिस, किचन, दोन गेस्ट रुम, डायनिंग रूम,  काटकोनात असलेला मागचा हॉल पाहिला, त्याच्या तीनही भिंतींना मोठ्या खिडक्या होत्या, त्यामुळे भरपूर हवा, उजेड होता. तिची शोधक नजर इथे स्थिरावली, ह्या घरी  आल्या नंतर, चित्र काढण्या साठी ही जागा तिला भावली. "आणि आता ही बेड रुम," तिच्या पाठीवर उजवा हात ठेवत तिला घेऊन बेड रुम मध्ये प्रवेशला. बेडरूम अत्यंत नीटनेटकी, पूर्वेकडच्या भिंतीवर तिच्याच उगवत्या सूर्याचे चित्र लावलेले होते. मार्क हळूच म्हणाला की, "कधी उठायला उशीर झाला तरी सूर्योदया बरोबर उठल्याचा आभास हे चित्र करून देते." उजव्या बाजूच्या भिंतीवर एक अत्यंत सुबक, सुंदर कोरीवकाम असलेला क्रॉस व त्यापुढे एक कॅंडल स्टँड, त्याची धार्मिक आस्था दर्शवित होते. "तू रागावणार नसलीस तर" हे अर्धवट वाक्य म्हणत त्याने क्रॉस समोर ठेवलेली डबी उचलली व एका गुढग्यावर खाली बसत त्याने डबीतून एक नाजूक हिऱ्याची अंगठी काढली व, "माझ्याशी लग्न करशील, माझी सहचारिणी बनून मला आयुष्यभर साथ देशील?" असे म्हणत मार्कने नजर वर करत तिच्या कडे पाहिले.  तिने लाजतच पुढे केलेल्या हाताच्या अनामिकेत अलगद ती अंगठी सरकवली. तिच्या डोळ्यांच्या कडा आनंदाश्रूंनी ओलावल्या, डोळ्यातून बाहेर पडू पाहणाऱ्या त्या मोत्यांना मार्कने अलगद आपल्या ओठांनी टिपले. तो जणू सांगत होता की, "तुझ्या डोळ्यातील हे मोती माझ्या साठी खूप किंमती आहेत, त्यांना मी कधीच जमिनीवर पडू देणार नाही." त्याच्या नजरेत एक आश्वासक विश्वास होता. जेन खूप सुखावली होती, गेल्या काही दिवसांत तिने पाहिलेली स्वप्नं पूर्ण होताना दिसत होती, तिच्या निवडीवरही ती खूप समाधानी होती.  ह्या हळव्या क्षणी त्याने तिला कवेत घेत तिच्या ओठांवर ओठ टेकवले. त्याच्या शर्टाचे एक बटन काढत अलगद आत शिरलेल्या तिच्या मऊ बोटांचा स्पर्श त्याला आणखी उत्तेजित करत होता. हा संकेत, मिलनाची आस दोन्हीकडे सारखीच लागली आहे, हे दर्शवत होता. त्याने तिच्या ड्रेसची पाठीवरची झिप हळूच थोडी खाली सरकवली व तिच्या पाठीच्या नितळ कांती वर चुंबनाचा वर्षाव केला. 

दीर्घ आलिंगनात गुंतलेले त्यांचे ते क्षण पाहण्या जणू काळ स्तब्ध होत त्या मिलन क्रीडेचा साक्षीदार झाला होता. त्या निःशब्द जवळिकीने त्यांच्या मनात आणि शरीरात नवे भाव उमटत होते. हळूहळू, त्या स्पर्शांच्या उबेतून एक गूढ ओढ निर्माण झाली, जिचं उत्तर त्यांनी एकमेकांच्या विश्वासात, प्रेमात आणि आपुलकीत शोधलं. त्या रात्री त्यांनी एक नवा अध्याय लिहिला, जिथे शरीरांचीच नव्हे तर आत्म्यांचीही जवळीक साधली गेली होती.


दोन्ही कडून मिलनाची ओढ वाढली होती आणि एके दिवशी मिस जेन चर्च मधील फादरच्या साक्षीने मिसेस मार्क झाली.


लग्नानंतरचे दिवस जेन आणि मार्कसाठी एखाद्या सुंदर स्वप्नासारखे होते. ती पहिली पाच वर्षं म्हणजे जणू जेन आणि मार्क एकमेकांच्या प्रेमात पूर्ण बुडून गेले होते. हा जणू पाचवा प्रणय ऋतूच होता. त्यांच्या घरात रोज काहीसं खट्याळ, हसरं वातावरण असायचं. मार्क कामावर जाताना किंवा बाहेरून घरात शिरताना, जेनच्या नाजूक गुलाबी ओठांनी मार्कच्या ओठांवर शिक्कामोर्तब केले नाही असे कधी झालेच नाही.

रात्री उशिरा, दोघं एकमेकांच्या मिठीत गुरफटून दिवस संपवायचे. बऱ्याचदा रात्री उशिरा जेवण व्हायचं, कारण ते दोघं वेळ विसरून एकमेकांतच गुंतून गेलेले असायचे. जेनच्या डोळ्यांतली चमक आणि मार्कच्या स्पर्शातली जादू या दोघांमधली केमिस्ट्री अजून जिवंत ठेवत होती.


जेनचे मन खूप प्रफुल्लित होते, जणू सातव्या आसमानावर विचरण करत होते, तिच्या मनी फुललेले रंग तिच्या पेंटिंग्ज मध्ये उतरत होते आणि त्यांना वेगळीच उंची देत होते.


लग्नाला पाच वर्षे होत आली तसा त्यांनी चान्स घेण्याचे ठरवले, दोघांनाही घरात आता चिल्ल्या पिल्ल्यांचा किलबिलाट हवा होता.


आज जेनला, एका दुकानात एक आफ्रिकन आई व तिच्या तान्हुल्याचे एक पोस्टर  खूपच आवडले. जेनला सहा महिने उलटून गेले होते, तिला आता पूर्वी सारखे तासनतास उभे राहून चित्र रंगवणे कठीण जात होते. तरी पण जेन ने ते आफ्रिकन माता व ती पाजत असलेल्या तिच्या बाळाचे चित्र काढायला घेतले. ह्या काळातील नैसर्गिक रीत्या तिच्या मनांत उचंबळून येणारे वात्सल्याचे भाव कुंचल्यातून त्या चित्रातील आईच्या डोळ्यात, चेहऱ्यावर पुरेपूर उतरत होते. त्या चित्रातील बाळाच्या मुखावरील निरागसता, समाधान ओसंडून वाहत होते. 

तिच्या अवघडलेल्या अवस्थे मुळे हे चित्र पूर्ण व्हायला बरेच दिवस लागले. तरी ते चित्र अजून झाकूनच ठेवलेले होते, कारण तिच्या लेखी त्या मातेच्या चेहऱ्यावर अजून वात्सल्याचे भाव व बळाच्या मुखी सुख समाधानाचे भाव रंगांमधून अजून ओतावे असे तिला वाटत होते. म्हणून ते चित्र अजूनही झाकलेलेच होते, तरी घरात एकटी असताना ती ते चित्र एकटक पहात बसायची.


दोघेही आतुरतेने वाट पहात असलेली ती वेळ आता अगदी जवळ आली होती. जेन ओ.टी. मधे कळा देत होती आणि बाहेर मार्क येरझाऱ्या घालत होता, त्याची अस्वस्थता, बेचैनी, अधीरता त्याचा येरझाऱ्यातून स्पष्ट दिसत होती. आतून बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि त्याची उत्सुक्तता शिगेला पोहचली, लक्ष ओ. टी. च्या दारावर केंद्रित झाले. नर्स दुपट्यात गुंडाळलेले एक चिमुकले बाळ घेऊन येताना दिसताच मार्कने पावलांना गती देत तिकडे जात बाळाला हातात घेतले, छातीशी हळूच कवटाळले, कपाळाचे, गालाचे पटापट मुके घेतले. नर्स ने "बेबी गर्ल" म्हणून सांगितले. "माझी सेरा" म्हणत मार्कने तिला आपल्या हातात घेतले, तोच गौर वर्ण, सरळ धारदार नाक, घारे निळे डोळे, तोच चेहरा, सगळं जेन सारखं, जणू तिचीच प्रतिकृती. मार्कला आभाळ ठेंगणं झाल्या सारखं वाटलं, जणू आयुष्याचं सार्थक झालं. त्याने परत एकदा सेराचा मुका घेत तो पुटपुटला की जेनच्या व माझ्या अतूट प्रेमाचे तू प्रतीक आहेस. जवळच उभी नर्स हे सर्व कौतुकाने पहात होती, सेराला त्याच्या हातातून घेत असता मार्कच्या डबडबलेल्या डोळ्यातून वात्सल्याचा एक मोती त्याचीच नजर चुकवून बाळाच्या गालावर पडला. नर्स सेराला घेऊन आत जात असता त्याची नजर तिचा पाठलाग करत होती. तेवढ्यात दुसरी नर्स दुसऱ्या बाळाला घेऊन आली व, "बेबी बॉय" म्हणत नेथनला मार्कच्या हाती देत आत निघून गेली.  मार्कने नेथनला छातीशी धरले व त्याच्या गालावर अलगद ओठ टेकवले. शर्टा च्या बाहीने डबडबलेले डोळे पुसले व निरखून बाळाकडे पाहिले व बाळाला जरा लांब करत नर्सला हाक मारली. "काही तरी गोंधळ झालेला दिसतो आहे, हा माझा नेथन नाही,  हे बाळ आफ्रिकन रूपरंगाचे, ह्याचा शामवर्ण आम्हा दोघांपेक्षा भिन्न आहे, बहुदा बाळांची अदलाबदल झाली असावी," असे म्हणत मार्कने बाळ नर्सच्या हाती परत देत तिला पडताळायला सांगितले. नर्स आत जाऊन त्याच बाळाला घेऊन लगेचच बाहेर आली व म्हणाली की, "काहीच चूकभूल झाली नाही, हा तुमचाच नेथन आहे, कारण आज दिवसभरात एवढी एकच डिलिवरी झाली आहे."


हे ऐकून आश्चर्याने मार्कचे डोळे विस्फारले, तोंडाचा आ वासला. नको नको ते विचार मार्कच्या मनात पिंगा घालू लागले, त्याचे मन हे वास्तव स्वीकारायला तयारच नव्हते. "हे कसं शक्य आहे? आम्हाला आफ्रिकन रंगारूपाचे मूल कसे शक्य आहे?" तो स्वतःशीच हातवारे करत पुटपुटत होता. "म्हणजे ह्या मुलांचा बाप कोणीतरी वेगळाच, मी नाही, ही मुलं माझी नाहीत, म्हणजे, तिने माझ्याशी प्रतारणा केली, पण का? मी तिला प्रेम द्यायला कमी पडलो का? खरं तर तिचे ही माझ्यावर खूप प्रेम होतेच, का तो दिखावा होता? माझा स्वतःपेक्षा तिच्यावर जास्त विश्वास होता. तिने असा विश्वासघात करायला नको होता, माझ्या भावनांशी खेळायचा अधिकार तिला कोणी दिला." सतत ह्या विचारांचा भुंगा त्याच्या मनात घोंगावत होता, डोकं फुटेल का काय, असे त्याला वाटू लागले, पण मनात येणारे विचार थांबवणार तरी कसे. नर्सने सांगताच तो आत जेनला भेटायला गेला, त्याच्या चालण्यात तो उत्साह नव्हता, चेहऱ्यावर आनंदाचा अभावच होता, मनातील खंत चेहऱ्यावर प्रतिबिंबित होत होती. जेनच्या समोर जाताना त्याने चेहऱ्यावरील व्यथेचे भाव लपवण्याचा निष्फळ प्रयत्न केला. त्रोटक शब्दात जेनच्या तब्बेतीची चौकशी केली, पण मुलांच्या बद्दल अवाक्षरही न काढता मार्कने तिथून काढतापाय घेतला व सरळ घर गाठले.


मार्कच्या ह्या अशा वागण्याने जेन अचंभित झाली. त्याचे ते तडफदार चालणे, सतत मिश्किल बोलणे, तो उत्साह, त्याच्या चेहऱ्यावर कायम असलेला आनंद देखील आज हरवला होता. "त्याची तब्बेत ठीक नसेल का? तरी पण तो असा विचित्र वागला नसता, नक्की काही तरी वेगळेच घडले असणार," जेनच्या मनात पिंगा घालणारे हे विचार थांबायचं नावंच घेत नव्हते.

दुसऱ्या दिवशी जेन सह सेरा आणि नेथनला मार्क घरी घेऊन आला, पण तो अजूनही अबोलच होता. शेवटी न राहवून जेननेच विचारले, "काही टेन्शन, तू कुठल्या ताण तणावा खाली आहेस का? तुझ्या व्यवसायात काही समस्या?" थोड्या रुक्ष स्वरात, "नाही" म्हणत मार्क हॉल मध्ये जाऊन टी. व्ही. चालू करून सोफ्यावर बसला. डिनर च्या वेळी पण तो गप्पच होता, त्याचे काय बिनसले आहे हे तिला उमजत नव्हते. रात्री देखील तो बेडरूम मध्ये आला नाही. पहाटे जेनला जाग आली व बाहेर येऊन पाहते तर, टी. व्ही. चालूच होता व मार्क तसाच सोफ्यावर झोपला होता. "त्याचे काही तरी नक्कीच बिनसले असणार" असा विचार करत तीने टी व्ही बंद केला व परत बेडरूम मध्ये जाऊन झोपली.


सकाळी ब्रेकफास्ट देखील त्याने मूकपणे, शून्यात पहात केला, ऑफिस रुम मधे पण त्याचे वागणे भ्रमिष्टा सारखेच होते. इतक्या आनंदाच्या प्रसंगी मार्कचे हे असे विचित्र वागणे पाहून ती गोंधळूनच गेली होती. मार्क लगेचच बाहेर गेला, लंचला देखील घरी आला नाही, रात्री देखील उशिराच, उदासवाण्या चेहऱ्याने घरात आला व सोफ्यावर अंग टाकून तसाच बसून राहिला. त्याच्या मनात हजारो विचारांची गर्दी झाली होती. प्रत्येक विचार आपापल्या दिशेने ओढत होता. डोळे मिटले तरी प्रश्न मिटत नव्हते, "ही माझीच मुलं आहेत का?" हा एकच प्रश्न त्याच्या मेंदूवर ठाण मांडून बसला होता. तिच्यावर असलेलं प्रेम, विश्वास, आणि आता निर्माण झालेली शंका, या तिन्हींची अंतर्गत झुंज त्याला आतून पोखरत होती.  

"ह्या मुलांचा बाप कोण?" असा सरळ प्रश्न तिला जाऊन विचारावा, असे अनेक वेळा त्याच्या मनात आले, "पण माझे जेनवर मनापासून प्रेम होते, आजही आहेच. तिने जे काही केले ते तिचे पाप, मी अंतःकरणा पासून प्रेम केले, ते त्या निरागस जेन वर. तिला तिच्या ह्या कृत्याबद्दल जाब विचारण्याला मन धजावतच नाही, तिचा प्रेमळ, निर्मळ, निरागस चेहरा डोळ्या समोर येतो. माझा स्वतःपेक्षा तिच्या वर जास्त विश्वास होता, त्यामुळेच प्रत्यक्ष प्रमाण समोर दिसत असताना सुद्धा माझे मन तिचाच बचाव करत होते." ह्या विचारांचा ऊहापोह सतत त्याच्या मनांत  चालू होता, पण डोळ्यांनी पाहिलेलं वास्तव, त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात खोल गाठ मारून गेलं होतं. तो एका जागी बसून होता, पण त्याचं मन उधळलेल्या वारु सारखं इकडून तिकडे धावत होतं. विचारांचं काहूर माजलं होतं. मध्यरात्र उलटून गेली होती, आता इथे, ह्या घरात राहणे त्याला अशक्य झाले होते. तो निर्धाराने उठला, त्याने ऑफिस मधून सगळे महत्वाचे कागद, दस्तावेज, सर्व आवश्यक सामान, कपडे घेतले. त्याने दरवाजा उघडला, आणि मागे वळूनही न पाहता घराच्या उंबऱ्याबाहेर पाऊल ठेवलं. त्या प्रत्येक पावलात दु:ख, चिड, आणि अपरिहार्यता मिसळलेली होती. घर सोडायच्या आधी त्याने त्याच्या विचारांना, भावनांना शब्दरूप देत एक चिठ्ठी सेंटर टेबलवर ठेवली होती.


प्रिय जेन,


माझ्या मनात विचारांचे काहूर माजले आहे, ते विचार मनाची कोंडी फोडून बाहेर पडू पाहत आहेत, पण शब्द थिजलेत.

तुझ्या चेहऱ्या वरील निर्मळ , निष्पाप भाव आणि माझा तुझ्या वरील इतके वर्ष असलेला विश्वास, तुला प्रत्यक्ष काही विचारायची हिंमतच देत नाही.


माझं मन प्रचंड आहत झालं आहे. माझं हसणं, तो उत्साह, सतत सुरू असलेली थट्टा मस्करी हरवली आहे, झोपेनी पण पाठ फिरवली आहे. असा मार्क तुला बघवणार नाही,  आणि ते विचार मला शांत पणे जगू देणार नाहीत, म्हणून मी हे घर सोडून जात आहे.


अर्थात मला तुझ्याकडून कसलीच उत्तरं नकोत, स्पष्टीकरण नको,  कारण प्रश्नच आता माझे सोबती  झाले आहेत.


मला कल्पना आहे की ह्या दोन मुलांचे संगोपन तुला एकटीला करणे जड जाईल, पण मला खात्री आहे, तू सक्षम आहेस.


तू जे काही केलेस ते तुझे तुझ्या पाशी, माझं प्रेम मात्र चोवीस कॅरेट सोन्या इतकं खरं होतं, हे तुला एक दिवस नक्की जाणवेल.


मला फोन करू नकोस, तुझा फोन न उचलण्याचा असभ्यपणा, ते पाप माझ्या हातून घडू नये ही इच्छा आहे.


इथून जाताना गेल्या पाच वर्षातील मधुर स्मृती घेऊन जात आहे, त्या इथून पुढे माझ्या जगण्याचा आधार असतील.


– कायम तुझाच मार्क"


तो दिवस तिच्या आयुष्यातला अत्याधिक भयाण दिवस होता. आज सुद्धा सकाळी जाग आली तेव्हा मार्क बेडरूम मध्ये नव्हता. तिने दोन्ही बाळांची कंफर्टर नीट केली व मार्कला पहायला बाहेर हॉल मधे आली. तिने हॉल, व सर्व खोल्या पाहिल्या पण मार्क कुठेच नव्हता. गराज मधे त्याची कारही नव्हती. इतक्या सकाळी तो कुठे गेला असेल ह्या विचारात ती असताना, तिच्या लक्षात आले की त्याचे ऑफिस मधील लॅपटॉप, नित्य लागणारे सामान, कागद नव्हते, त्याचे कपडे व बॅग ही नव्हती. म्हणजे? अशा वेळी नेमके नको असलेलेच विचार तिच्या मनात थैमान घालू लागले होते. सेंटर टेबलवर ठेवलेल्या चिठ्ठी कडे तिची नजर गेली व सर्व उलगडा झाला. ती चिठ्ठी तिने अधाशा सारखी दोन तीन वेळा वाचली व धपकन सोफ्यावर बसली. "कसली उत्तरं, कोणते प्रश्न, तुझा तूच विचार केलास व तू एकट्यानेच निर्णय घेतलास, माझा विचार घ्यावासा सुद्धा तुला वाटला नाही. इतके का आपले संबंध उथळ होते? एखाद्याची दृष्ट लागावी असा गेल्या पाच वर्षातील आपला सहवास होता आणि इतके तडकाफडकी एका क्षणात तू सगळे उध्वस्त करून निघून गेलास. आईबाप होण्याचा निर्णय आपण दोघांनी एकत्र घेतला होता नं? ह्या इतक्या लहान मुलांचा सांभाळ मी एकटी कसे करणार हा साधा विचार देखील तुझ्या मनात नाही आला. ऐन जबाबदारीच्या वेळी तू पळ काढशील अशी पुसटशी शंका सुद्धा माझ्या मनी कधी आली नव्हती." 

मार्कच्या असे न सांगता निघून जाण्यामुळे जेनच्या मनात भीती, क्रोध आणि दु:खाचा एक अविरत प्रवाह सुरू झाला. पूर्वी जीवनात प्रचंड उत्साह होता, जीवन समाधानी होते, आता तिच्या मनात फक्त वेदना आणि संताप भरला होता. "असा काय गुन्हा घडला माझ्या हातून की ज्याची एवढी भयंकर शिक्षा त्याने मला द्यावी," ह्या विचारांचा पिंगा तिच्या मनात सतत सुरू होता.

बाळाच्या रडण्याचा आवाज आला व ती आत बेडरूम कडे  धावली,"मी आई आहे, मी माझी जबाबदारी झुगारूच शकत नाही."


दुसऱ्या दिवशी सेरा  व नेथनला चेक अप साठी दवाखान्यात नेले असता नर्सने सहज विचारले की, "बाळाच्या वडिलांचे शंकानिरसन झाले नं?" जेनने कान टवकारले, "कसली शंका?" तेव्हा घडला प्रकार नर्सने सांगितला की, "एक मूल आफ्रिकन रूप रंगाचे कसे होऊ शकते? बाळ चुकून बदलले गेले असावे, ही शंका होती." 

आता मार्कच्या ह्या विचित्र अनपेक्षित वागण्याचा अर्थ तिला उमजला. आता पर्यंत तिच्या डोळ्यांवर मातेच्या ममतेची जाड झापडं चढली होती त्यामुळे हा वर्ण भेद तिला जाणवलाच नव्हता.


ड्राईव्ह करून घरी येत असताना सुद्धा तिच्या मनात विचारांचा भुंगा सतत घोंगावत होता. तिला त्या चिठ्ठीतील 'उत्तर नको' हे शब्द आठवले, "म्हणजे तू सरळ माझ्या चारित्र्यावर शंका घेतलीस, हेच का तू मला ओळखलेस? शी, असा किळसवाणा आरोप तू माझ्यावर करू तरी कसा शकतोस? तसे असते तर माझ्या प्रेमाची उब कमी झाल्याची तुला जाणवली नसती का? का तू मला निर्ढावलेली व्यभिचारिणी समजलास? आपलं प्रेम, आपले संबंध स्वच्छ, पूर्ण पारदर्शी होते तरी तुझ्या मनात माझ्या बद्दल ही शंका यावी? माझ्या बद्दल, शंका ही  तुझीच, निर्णय ही तुझाच, ते पण माझ्याशी चकार शब्दही न बोलता.


आतून आलेल्या रडण्याच्या आवाजाने ती क्षणभर तरी विचारांच्या गुंत्यातून बाहेर आली व लेकीची भूक भागवली. थोड्या वेळाने दुसऱ्याने टाहो फोडला, जेन तिथेच बसलेली होती पण, "रड आता किती रडायचे ते, माझ्या आनंदी आयुष्यात बिब्बा घातलास, तुझ्या मुळे मला चरित्रहीन ठरवले गेले, कुठल्या जन्माचा सूड घेतलास?" नेथनच्या रडण्याचे सूर उंचावत गेले, सेराने देखील भावाच्या सुरात सूर मिसळले. शेवटी आईचीच माया, जेन ने नेथनला उचलून जवळ घेतले, "तुझा काय दोष, तुला का उपाशी ठेवायचे, आणि खरं तर माझा तरी काय दोष होता? पण हे सिद्ध करणार कसे."


"मार्क ने पळ काढला, जगाची कुजबुज कानी येऊ लागली होतीच, पण मला निर्धाराने उभे रहावेच लागेल, हे आव्हान मला एकटीलाच स्वीकारावे लागेल,  ह्या दोन चिमुकल्या जीवांसाठी." 


नवीन विकसित होणाऱ्या सेलिना हा भागात मार्क राहू लागला. ज्या विचारांपासून तो दूर पळण्याचा प्रयत्न करत होता ते प्रश्न इथेही त्याचा पिच्छा सोडत नव्हतेच. तो भावनिकदृष्ट्या ढासळलेला होता, आतून तुटलेला होता. एकटेपण त्याला भयाण वाटत होते, घराच्या भिंती अंगावर येत होत्या. तो सोफ्यावर बसला पण समोरच्या भिंतीवर जेन चे खिडकी व त्यातून दिसणाऱ्या बागेचे चित्र बघण्याची सवय त्याला आता नडत होती. 

रात्रीचा अंधार त्याचं मन कवेत घेत होता, आणि तो विचारांच्या गर्तेत खोल खोल जात होता. कधी ती आठवायची, तिचं हास्य, तिचं प्रेम, तिचं 'आपलंसं' असणं, नित्य प्रणयाला असणारा तिचा उत्स्फुर्त प्रतिसाद आणि लगेच त्यावर शंकेचं काळं सावट पसरायचं, "जर हे खरं नसेल तर? पण जर ती मला फसवत असेल तर?" या द्वंद्वाने त्याचं अंतरंग पोखरलं जात होतं.


ह्या भंडावणाऱ्या विचारांपासून अलिप्त होण्या साठी त्याने स्वतःला व्यवसायाच्या कामात झोकून दिलं, न खाण्याची शुद्ध न झोपेची वेळ. तसेही त्याची अन्नावरची वासनाच उडाली होती. झोप तर लागतच नव्हती आणि चुकून लागलीच तर नको त्या भयाण स्वप्नांनी जाग यायची. वर्षभरात तो खूप अशक्त झाला होता, गाल बसले होते, बोलण्या चालण्यातला उत्साहच संपला होता. थट्टा मस्करी करत बोलण्याची त्याची खास लकब तर तो विसरलाच होता. पैसा खूप साठला होता पण मनःशांती हरवली होती.


आयुष्याचा पुढील मार्ग किती कठीण आहे हे तिला पदोपदी जाणवत होते. निद्राहीन झालेल्या रात्री, दोघांचं करण्यात दिवसभर होणारी धावपळ, येणारा थकवा, पूर्वी कायम चेहऱ्यावर असणारे हसूच आता हरवले होते, रंग-रेषांशी नातं तुटत चाललं होतं, मन ओथंबलेलं असूनही कॅनव्हास कोरडेच राहत होते. अर्थार्जनाचे एकमेव साधन म्हणजे पेंटिंग्ज, पण एकचित्त होऊन चित्र रंगवायला तिला पुरेसा वेळच मिळत नव्हता. खिसा मोकळा, मन गहिवरलेले, समाजाच्या नजरेत जाणवणारा तिरस्कार. ह्या सर्व विपरीत परिस्थितीशी एकटीने लढा देण्यासाठी जेन निर्धाराने, खंबीरपणे उभी होती.


त्या विचारांपासून परावृत्त व्हायचे असेल तर तिला चित्रकारितेतच मन रामवावे लागेल, हे ही तिला पटत होते. पण विस्कटलेले मन व थकलेले शरीर किती साथ देणार? पूर्वी प्रत्येक प्रदर्शनात तिची बारा तेरा तरी नवीन चित्र असायची, आता जेमतेम तीन चार नवीन चित्र असतात त्यामुळे दैनंदिन गरजा भागणं कठीण झालं होतं. पूर्वी काढलेली चित्र संपत आली होती, त्यामानाने नवीन बनत नव्हती, ही चिंता तिला भेडसावत होती. 


दरम्यान पंधरा महिन्यांचा काळ उलटून गेला होता,  मुलांच्या घरभर दुडूदुडू धावण्याने व बोबड्या बोलांनी घरात परत चैतन्य आलं होतं. रात्रीची झोप थोडी तरी मिळू लागली होती पण दिवसा मुलांच्या मागे करावी लागणारी धावधाव तिला दमवत होती.


ती खूप अशक्त तर झाली होतीच पण चेहरा देखील मलूल, खेचल्यागत झाला होता, वया पेक्षा दहा वर्ष जास्त वयस्कर दिसू  लागली होती.

उद्याच्या प्रदर्शनात तिची फक्त तीनच चित्र तयार होती व जुन्या पैकी फक्त एकच चित्र शिल्लक होतं. गरोदरपणात, त्या अवघडलेल्या अवस्थेत शेवटच्या तीन महिन्यात तिने रोज थोडे थोडे करून काढलेले आफ्रिकन मायलेकाचे चित्र. हे चित्र तिला स्वतःलाच खूप आवडायचे, त्या चित्रात आईच्या डोळ्यातील व चेहऱ्यावरील ओथंबून वाहणारे वात्सल्याचे भाव व त्या तान्हुल्याच्या मुखावरील समाधान, आनंद, कायम तिचे चित्त वेधून घ्यायचे. तिला तिचे हे सर्वोत्कृष्ट चित्र वाटायचे, म्हणून आजपर्यंत कधी प्रदर्शनात विकायला ठेवले नव्हते. आज नाईलाज झाला होता, फक्त तीनच चित्र तयार होती, ती तिन्ही चित्र विकली गेली असती तरी महिन्याचा खर्च भागला नसता. मायलेकांच्या ह्या चित्राची किंमत मात्र तिने खूप जास्त ठेवली होती, ह्या कलेतला खरा दर्दी कोणी असेल तरच तो हे चित्र विकत घेईल.


गेल्या पंधरा महिन्यात मार्क एकदाही प्रदर्शनात आला नव्हता, पण एक व्यक्ती नित्यनेमाने प्रदर्शनात यायची व किमान चार चित्र तरी विकत घ्यायची, तिची महिनाभराची सोय व्हायची. आजही तो अगदी सुरवातीलाच आला व नेहमीचा कोपरा बराच रिकामा पाहून त्याने एक फोन केला व म्हणाला की, "आज फक्त चारच चित्र आहेत, त्यात एक आफ्रिकन आई व बाळाचे चित्र खूपच महाग आहे, अर्थात ते चित्र खूप सुंदर आहे, त्या आईचे डोळे अत्यंत बोलके आहेत व ते बाळ तर इतकं मोहक आहे की जाऊन त्या बाळाला उचलून घ्यावेसे वाटते. एका शब्दात सांगायचं तर त्या चित्रातील व्यक्ती चित्रकाराने जिवंत केल्या आहेत." जेनला त्या चित्राचे झालेले कौतुक ऐकून खूप समाधान वाटले, अर्थात ते चित्र विकले जाणार व आता कधीच दृष्टीस पडणार नाही ह्याची खंत ही तिला वाटत होतीच.

त्या व्यक्तीने,"मी जो," म्हणून स्वतःचा परिचय करून दिला, व जेनशी बोलताना ह्या चित्राचे विशेष कौतुक केले. "चित्र खूपच बोलके आहे, असे ही चित्र काढायला खूप एकाग्रता लागत असेल नं? ह्या दोन बाळांच्या दंगा मस्तीत कसा वेळ काढता आला तुम्हाला? जेन किंचित हसली, "हे जुने चित्र आहे, गरोदर असताना शेवटच्या दोन तीन महिन्यात रोज थोडे थोडे करून काढलेले चित्र आहे. मला स्वतःला हे चित्र खूप आवडायचे म्हणून इतके महिने हे चित्र इथे आणलेच नव्हते, पण आता इतर चित्र कमी असल्यामुळे नाईलाजास्तव हे चित्र विक्रीला लावावे लागले." जेनने त्या 'जो' ची चौकशी केली, व "दर महिन्याला तुम्ही माझी तीन चार चित्र तरी घेता, त्या बद्दल तुमचे आभार, पण इतक्या चित्रांचे तुम्ही करता काय?" "माझा एक मित्र आहे त्याला सुंदर चित्र संकलित करायची आवड आहे, त्याला व्यस्ततेपाई इथे यायला जमत नाही म्हणून त्याच्या वतीने मी ही चित्र घेत असतो."  थोड्या गप्पा झाल्यानंतर त्याने विनंती केली की, "ह्या चित्राबरोबर तुमचा फोटो काढला तर चालेल का? म्हणजे इतक्या सुंदर चित्राची चित्रकार कोण हे स्मरणात राहील." जेन काही आढे वेढे न घेता स्ट्रोलर दूर सारत फोटो साठी उभी राहू लागली तेव्हा जो म्हणाला की, "स्ट्रोलर पण जवळ असू द्या नं, म्हणजे उद्याच्या होणाऱ्या मोठ्या कलाकारांचे बालपणीचा फोटो माझ्या कडे आहे हे मला अभिमानाने सांगता येईल," जोच्या बोलण्याच्या पद्धतीवर आपसुकच तिला हसू आले व ते हसू जो ने एका फोटोत टिपले.


जो ने आणून दिलेली ती चित्रं, व त्याच बरोबर जेनचा व मुलांचा फोटो मार्कने पहाला आणि त्याचं मन हेलावून गेलं, तिची झालेली अवस्था पाहून त्याच्या मनांत प्रचंड कालवा कालव झाली, तो आतून पूर्णपणे तुटला होता. त्याच्या मनातील अंतरद्वंद्व  शमले व तो अपराधिक भावाने ग्रासला गेला. तिच्या त्या अवस्थेला तो सर्वस्वी स्वतःला जबाबदार मानू लागला होता. जो ने काढलेल्या फोटोत त्या चिल्ल्या पिल्ल्यांचे निरागस हसणे पाहून त्याचे मन क्षोभलेल्या समुद्रा प्रमाणे वरून शांत, पण आतून असंख्य लाटांनी ढवळून निघाले होते. मनातल्या विचारांचे थैमान इतकं, की छातीत एक अदृश्य घुसमट सतत ऐकू येत होती. भेटीची ओढ अनावर होत होती, पण तिच्याकडून तिरस्काराचे भय ही होतेच.

मनाच्या दोन किनाऱ्यांमध्ये झुलणारा मार्क, वेदनेच्या वाळवंटात वाट हरवला होता. एका मनात तिच्या विश्वासघाताची कटू सावली, तर दुसऱ्या मनात अजूनही तिच्या डोळ्यात पाहिलेली निरागसता सळसळली.

त्याच्या एका मित्राने काही भारतीय पौराणिक कथांचा हवाला देत सांगितले की, "गरोदरपणात ऐकलेले किंवा वारंवार पाहिलेल्या चित्रांचा गर्भावर परिणाम होऊ शकतो अशी मान्यता आहे."  जेन ने गरोदरपणात काढलेले त्या आफ्रिकन बाळाचे चित्र व जो ने काढलेल्या फोटोतील त्या बाळात साम्याला हे कारण तर नसेल? ह्या विचारांचा भुंगा त्याच्या मनांत पिंगा घालू लागला होता.

काही दिवसांपूर्वी त्याच्या डॉक्टर मित्राने 'किमेरीझम' ह्या तत्वा बद्दल सांगितले होते की,  "चार पाच पिढ्या आधी जर कोणी शामवर्णी पूर्वज असेल तर त्याच्या जीन्स चार पाच पिढ्यांच्या नंतर देखील उद्भवू शकतात व त्यामुळे अर्भकाला ते विशिष्ठ रूपरंग देऊ शकतात." मार्कच्या मनात उफाळलेल्या समुद्राच्या उसळणाऱ्या लाटांप्रमाणे हे असे विचार उसळून  वर येत होते व त्याची बेचैनी वाढवत होते. एक अश्वेत आफ्रिकन व्यक्ती जेनच्या पाच सहा पिढ्यां आधी त्यांच्या कुटुंबाचा भाग असल्याचा उल्लेख जेनच्या तोंडी त्यानी ऐकल्याचे पुसटसे मार्कला आठवू लागले होते.


 त्या दिवशी, फोटोच्या एका कोपऱ्यात धूसर झालेला जेनचा चेहरा, तिची थकलेली निस्तेज नजर, तिच्या अंगावरील जीर्ण शाल, आणि त्या छोट्या बाळासाठी ती करत असलेल्या धावपळीचा जेनवर झालेला परिणाम पाहिल्यावर, क्षणात त्याचं अंतर्मन हेलावलं. आपसुकच त्याची पाऊले कार कडे वळली व कार जेनच्या घराच्या दिशेने धावू लागली. मनात विचार सतत सुरू होतेच, "खरं खोटं शोधताना मी तुलाच गमावून बसलो, माझ्या मनातील शंका कुशंकांनाच सत्य मानून बसलो, आणि तुझं मन मात्र समजूनच घेतलं नाही."


तिच्या घरची बेल वाजवताना त्याचे हात थरथरत होते, पण नजर मात्र अधाशी झाली होती, पंधरा महिन्यांनी तो तिला पहाणार होता.

दार उघडले गेले, तिने एक पाऊल मागे सरकून मार्कला आत येण्यासाठी वाट मोकळी केली. तो थिजलेल्या डोळ्यांनी तिच्या कडे पहातच राहिला. तिचा चेहरा म्हणजे, खत पाण्या अभावी अकाली कोमेजू लागलेल्या फुला सारखा जाणवत होता. तिची ही अवस्था पाहून मार्कच्या डोळ्यांत पश्चात्तापाचं मौन ओथंबलेलं होतं. तो दारातच तिच्या समोर दोन्ही गुडघे टेकून बसला, तिचा उजवा हात हातात घेतला, त्यावर कपाळ टेकवले, व इतका वेळ कसा तरी घट्ट धरून ठेवलेला बांध फुटला, त्याच्या अश्रूंच्या ओलाव्याने तिच्या तळहातावर पश्चात्तापाची साक्ष उमटली. रडवेल्या स्वरात मार्क मनात साठलेलं बोलू लागला, "काय अवस्था करून घेतली आहेस तुझी, अर्थात ह्याला कारण मीच आहे. मी तुझा आणि आपल्या बाळांचा अपराधी आहे. माझ्या अविश्वासाच्या ठिणग्यांमुळे तुम्हाला  दुःखाचा दाह सहन करावा लागला, आणि ते सर्व तुझ्या चेहऱ्यावर  प्रतिबिंबीत झाल्याचे दिसते आहे. माझा गुन्हा इतका मोठा आहे की  त्यासाठी तुझी क्षमा मागायची पण मला लाज वाटते. तरी न राहवून मी इथे आलो, माझ्या अपराधाला क्षमा करायची का नाही हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल आणि तो मला मान्य असेल." 

इतका वेळ जेनचा चेहरा निर्विकार होता. मार्कचे असे अचानक येणे अनपेक्षितच होते.  इतक्या दिवसांच्या विरहाच्या वेदना तसेच अनपेक्षितपणे मार्क भेटल्याचा आनंद, हे दोन्ही भाव  तिच्या चेहऱ्याला स्पर्शू पण शकले नव्हते. तिचे शब्दच काय तर तिचे नेत्र ही अबोल झाले होते. मार्क मोठ्या आशेने तिच्या कडे पाहत होता. तिचे मूक भाव त्याच्या मनी नैराश्यच पेरीत होते. त्याने मान वर करून एक दयनीय नजर तिच्या कडे टाकली. त्या क्षणी फक्त वाऱ्याची हळुवार सळसळ ऐकू आली व तिच्या डोळ्यांतून एक थेंब त्याच्या हातावर गळला. हा सकारात्मक संकेत मानून लांब उभे राहून हा अनाकलनीय प्रकार पाहून गोंधळलेल्या बाळांना मार्कने जवळ येण्याची खूण केली, जेन ने पापण्या लवून मौन स्वीकृती दर्शवली व, "तुमचे डॅडी" हा त्रोटक परिचय करून देत एक पाऊल मागे सरकत भिंतीला टेकून निस्तब्ध उभी राहिली व गेल्या अनेक दिवसांपासून पापण्यांच्या आत बंदिस्त करून ठेवलेल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

              ********************

 
 
 

Recent Posts

See All
विजय विश्वासाचा

ही कथा आहे स्वातंत्रपूर्व काळातील, म्हणजे १९४५ सालातील. भांबुरड्याच्या एका शाळेतील मैदानावर गेले काही दिवस आंतरशालेय क्रिकेटच्या स्पर्धा सुरू होत्या, अटीतटीचे सामने सुरू होते. आज अंतिम स्पर्धा खूप चुर

 
 
 
शापित डायरी

लेखक : नितीन कुलकर्णी अकरावीतील अनिकेत, बाल साहित्याचा लेखक म्हणून बराच नावाजला होता. कालच त्याने शाळेच्या नोटीस बोर्ड वर, आंतरशालेय राज्यस्तरीय कथा स्पर्धे विषयी वाचले आणि त्याच्यात नवा उत्साह संचारल

 
 
 
विरहाग्नीतील होरपळ

रिक्षा स्टँडवर मदन मिश्राची रिक्षा आली की सगळे रिक्षा वाले खुश व्हायचे, मदनचा आनंदी स्वभाव व सगळ्यांना मदत करण्याची वृत्ती, त्यामुळे...

 
 
 

Comments


Nitin's Blog

Contact

Ask me anything

Thanks for submitting!

bottom of page