
सार्को

Updated: Jan 28, 2025
प्रस्तावना :
प्रस्तुत आहे एक कथा , त्यापेक्षा, खरं तर एका ज्येष्ठ दाम्पत्याची मनोव्यथाच. तारुण्याच्या गुर्मीत असता हा विचार मिथ्या वाटेल ही, अतिशयोक्तीपूर्ण ही वाटेल, पण आयुष्याच्या उतरणीला लागलेल्या, जरावस्थेमुळे जर्जर होऊ घातलेले देह व कुठल्याशा अनामिक भयाने ग्रस्त मनातील ते विचार वाढत्या वयाबरोबर जवळचे ही वाटू लागतील, आपल्याच मनात कुठेतरी खोलवर दडलेले ते विचार आपल्याला गवसतीलही.
हे विचार तुम्हाला पटले का नाही ते तुमच्या विस्तृत अभिप्रायतून कळवावे, एवढी तसदी जरूर घ्याल ही खात्री आहेच.
कथा "सार्को"
बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स मधील एका उच्चभ्रू लोकांच्या सोसायटीत एका छोट्या टुमदार बंगल्यात, इनामदार दांपत्ती गेली अनेक वर्ष वास्तव्यास आहे. 'सरस्वती विला' हे नाव ह्या बंगल्याला नक्कीच शोभणारे आहे कारण ह्या बंगल्यात राहणारे पती-पत्नी सरस्वतीचेच उपासक, ज्ञानाराधन हाच आयुष्याचा मूळ मंत्र घेऊन जगले. पण त्या उभयतांच्या वाढत्या वया बरोबर जसजशी दुर्भाग्याची छाया ह्या घरा वर पडू लागली तशी ह्या बंगल्याची रयाच गेली. बागेतील फुलझाडांनी केव्हाच माना टाकल्या होत्या, बॅक यार्ड मधील गवताने तर गुढग्याच्या वर उंची गाठली होती. मागील एका कोपऱ्यात मुंग्यांचे वारूळ देखील वर येऊ लागले होते. बऱ्याच ठिकाणी कोळ्यांनी आपले साम्राज्य स्थापित केले होते. दारा बाहेरील नाम फलकाला अनेक दिवसात डस्टरचा स्पर्श झाला नसावा हे त्यावर साठलेली धुळच बोलत होती. अक्षत इनामदार, मार्गारेट इनामदार ह्या दोन नाम फलकांच्या खाली एका बाजूचा खिळा निखळल्यामुळे किमान गेले वर्ष भर तरी, शर्ली इनामदारच्या नावाची पाटी एकाच खिळ्यावर आधारलेली, घड्याळातल्या लोलका प्रमाणे वाऱ्याच्या प्रत्येक झुळुकी बरोबर डोलत होती.
संध्याकाळचे सव्वा आठ वाजले होते, अक्षतने टी.व्ही. ऑन केला व हातात रिमोट घेऊन मार्गारेटच्या म्हणजे मॅगीच्या जवळच पलंगावर बसला. पलंगावर मॅगीच्या आवडीचे फिक्या गुलाबी रंगाचे बेड कव्हर घातले होते. घरात नीटनेटकी तेवढी हीच खोली होती. अक्षत एकदा, टिव्हीकडे तर एकदा घड्याळाकडे पाहत होता. त्याची ही अधीरता पाहून मॅगीच्या चेहऱ्यावर स्मित रेंगाळले. अक्षतचे त्याकडे लक्षच नव्हते, तो आपल्याच विचारात मग्न होता.
गेले अनेक दिवस ते दोघेही ह्या टी व्ही वरील कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत होते. स्वित्झर्लंडच्या एक्झिट इंटर नॅशनल ह्या संस्थेतील एका प्रख्यात डॉक्टरच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. निवेदकाने डॉक्टरांचे स्वागत केले व मुलाखतीची भूमिका बांधायला सुरुवात केली. निवेदक सांगू लागला की ही एक फारच आगळी वेगळी मुलाखत असणार आहे कारण डॉक्टरच्या मूळ भूमिकेशी फारकत घेणारी ह्यांची कार्यशैली असली तरी, पेशंट्सच्या लेखी त्यांना साक्षात देवदूताचाच मान आहे. अशी थोडी बुचकळ्यातच टाकणारी सुरुवात करत निवेदकाने मुख्य विषयाला हात घातला.
अक्षत ने रायटिंग पॅड हाती घेतले व पेन सरसावून तो बरेच काही टिपून घेऊ लागला होता. आज त्याच्यात तरुणपणीचा विद्यार्थी दशेतला अक्षत संचारला होता, तीच एकाग्रता आज त्याच्या चित्ती जाणवत होती. तो डॉक्टरांच्या प्रत्येक शब्दाचा वेध घेत होता, वाक्य न वाक्य पॅड वर टिपून घेत होता. मॅगी सुद्धा एकचित्त होऊन ती मुलाखत ऐकत होती पण डोळ्याच्या एका कोपऱ्यातून तिचे अक्षत कडे ही लक्ष होतेच. मुलाखत संपताच अक्षतने काढलेल्या चार पाच पानी नोट्स पाहून मॅगीला हसू अनावर झाले, "ह्या विषयाची परीक्षा झाल्यास तू नक्की टॉप करशील" म्हणत मॅगी शक्य तितक्या खळखळून हसू लागली. नोट्स काढायच्या आपल्या जुन्या सवयी मुळे तो किंचित शरमला, पण तिच्या हास्यात हसू मिसळत किचन मधे जायला उठला.
भोजनोपरांत त्याने मेलचा मसुदा बनवण्यास हाती घेतला, मॅगी जागीच होती, मेल लिहून पूर्ण होताच तिला वाचून दाखवण्यास सुरुवात केली.
अक्षतने एक्झीट इंटरनॅशनलचे डायरेक्टर यांना पाठवलेल्या मेल मधे त्यांच्या उभयतांच्या सद्य परिस्थितीचे संपूर्ण विवरण दिले होते. का त्यांना हा कठीण निर्णय घ्यावा लागला ह्याची तर्कशुद्ध कारण मीमांसा केली होती.
कुठलाही आडपडदा न ठेवता त्यांने लिहिले होते की, "मी अक्षत इनामदार, वय वर्ष ८० व माझी पत्नी मार्गारेट इनामदार वय ७९वर्ष. मी भारतात जन्मलेलो व माझी पत्नी मूलत: ब्रिटिश, आम्ही दोघेही अमेरिकेतील हार्वर्ड विश्व विद्यालयात अर्थशास्त्राचे शिक्षण घेऊन विवाहोपरांत बेल्जियम मधे स्थायिक झालो, तेथील नागरिकत्व आम्ही उभयतांनी स्वीकारले आहे. आम्ही दोघेही येथील एका नामांकित विश्वविद्यालयात अर्थशास्त्र ह्या विषयात अध्यापनाचे कार्य करीत होतो. सुमारे दहा वर्षांपूर्वी आम्ही दोघांनीही सेवानिवृत्ती घेतली.
अंदाजे आठ वर्षांपूर्वी मॅगीला म्हणजे माझ्या पत्नीला, पार्किन्सन ह्या दुर्धर आजाराची लक्षणे जाणवू लागली तेव्हा येथील निष्णात डॉक्टरांचे औषधोपचार लगेच सुरूही केले पण दिवसागणिक तिची तब्बेत खालावतच गेली. ह्या आजारावर उपाय अजूनतरी आपल्या वैद्यकीय शास्त्राला गवसला नाही असे सर्व डॉक्टरांचे म्हणणे होते. हळू हळू तिच्या सर्व कृतींचा वेग मंदावत गेला. सद्य परिस्थितीत ती तिच्या हाताने जेऊ शकत नाही किंवा पाणी देखील पिऊ शकत नाही, म्हणजे तिला क्षणभर ही एकटं सोडून मी कुठे जाऊ शकत नाही.
आमच्या वरील नियतीचा निष्ठुरपणा इथेच थांबला नाही. दोन वर्षांपूर्वी एक खूपच काळीज पिळवटून टाकणारी, हृदय विदारक घटना घडली होती. आमची एकुलतीएक मुलगी, जावई व दोन्ही नातवंडं, एका कार अपघातात जागीच गेले. ती असे पर्यंत तिचा रोज फोन यायचा, ती जाऊन येऊन असायची, आम्हाला त्या सगळ्यांचा खूप मोठा आधार होता. ह्या एका दुर्दैवी घटने मुळे आम्ही सर्वस्वी निराधार झालो. त्याचा परिणाम मार्गारेट वर प्रचंड प्रमाणात झाला, ती मनाने खचली, शरीराने अधिकच खंगली, तिचा आजार औषधांना दुर्लक्षित करून वेगाने डोके वर काढू लागला.
ह्या दुर्दैवी घटनेमुळे माझ्यावर झालेल्या मानसिक आघाताचा दुष्परिणाम म्हणा किंवा आमचे प्रारब्ध म्हणा, चार महिन्यांपूर्वी मला एक कमी तीव्रतेचा हृदय विकाराचा पहिला झटका येऊन गेला.
ह्या घटनेने आम्ही दोघेही फारच हादरून गेलो. परिणामी आम्हा उभयतांची जिजीविषाच संपली, आता कसलीच उमेद राहिली नाही, जगण्याची इच्छाच मेली.
मोठ्या आशेने आपल्या कडे हा अर्ज करीत आहे त्याचा स्वीकार व्हावा ही विनंती. आमच्या वरील प्रक्रिये पूर्वी काही औपचारिकता पूर्ण करायच्या असतील तर तसे कळवावे मुलाखतीच्या वेळी आवश्यक ते दाखले दाखवूच."
तो मेल स्वित्झर्लंडच्या दिशेने पाठवला जाताच गेल्या काही दिवसांतील त्या उभयतांच्या मनातील उठणारे विचारांचे वादळ तात्पुरते शमले. दोघांची चित्ते थोडी तरी शांत झाली, मनावरचा ताण तणाव शिथिल झाला, थोड्या दिवसांपूर्वी असलेली मनाची व्याकुळता आता बऱ्याच अंशी कमी झाली होती, कुठलेच कासावीस करणारे विचार मनी डोकावत नव्हते किंवा कसलेच अतिरेकी विचार मना जवळ फिरकत ही नव्हते, त्यांच्या चेहऱ्यावर शांत सौम्य भाव पूर्ववत दिसू लागले होते.
दहा दिवसांनीच एक्झिट इंटर नॅशनलच्या डायरेक्टरचा बहुप्रतिक्षित मेल आला आणि इनामदार द्वयांच्या मनात खोलवर जाऊन काही दिवस विसावलेले विचार पुन्हा उचंबळून वर आले. पाणी ढवळले गेल्यावर तळाशी जाऊन बसलेला कचरा वर येत सगळे पाणी गढूळ करून टाकतो तशी त्या दोघांच्या मनाची अवस्था झाली होती.
अक्षत चातका सारखा उत्तराची वाट पाहत होताच, मेल वाचायला खूप अधीर होता, त्यांचे उत्तर जाणून घेण्या साठी उत्सुक होता, अर्थात उत्तर होकारार्थी असावे ही त्याची आपेक्षा होतीच. मॅगी ने नजरेने खुणावताच अक्षत ने मेल मधील मजकूर मोठ्याने वाचायला सुरुवात केली.
प्रिय श्री अक्षत इनामदार,
माफ करा तुम्हाला उत्तर पाठवायला विलंब झाला. तुमची परिस्थिती थोडी वेगळी असल्या मुळे आम्हाला आमच्या डायरेक्टर्स ची तातडीने एक मीटिंग बोलावून काही वेगळे निर्णय घ्यावे लागले, काही वेगळ्या तरतुदी कराव्या लागल्या. तुमच्या पत्नी श्रीमती मार्गारेट यांच्या साठी आम्ही दोन मानसशास्त्रज्ञ नियुक्त केले आहेत जे बोलताना त्यांच्या चेहऱ्यावरील बदलते हावभाव टिपून तसेच त्यांच्या शारीरिक हालचालींचा अव्यक्त अर्थ आम्हा पर्यंत पोहचवू शकतील, त्या शिवाय एक लिप मूव्हमेंट रीडर ही नियुक्त केला आहे तो मार्गारेट यांच्या ओठांच्या होणाऱ्या अत्यल्प हालचालीतून त्यांचे अस्पष्ट उमटणारे शब्द आम्हाला स्पष्ट करून सांगू शकेल.
अक्षतची अधीरता इतकी शिगेला पोहचली होती की त्याने त्या मेल मधील बराच मजकूर, ज्यात संस्थेचे नियम, कार्यपद्धती व त्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या काही वेगळ्या शब्दावली, त्यांचे प्रचलित अर्थ, वगळत त्याची नजर निर्णयाचा उल्लेख असलेल्या शेवटच्या ओळींकडे धावली, व तो पुढे वाचू लागला की, आमच्या संस्थेच्या कार्यपद्धतीनुसार आम्ही इच्छुक व्यक्तीची मुलाखत घेतो, त्याच्याशी मोकळे पणाने गप्पा मारतो व त्यावरून ठरवतो की आमच्या ह्या सुविधेचा लाभ त्या व्यक्तीला देता येईल का नाही.
आमच्या नियमानुसार आम्ही तुमची दोघांची एकत्रित व वेगवेगळी मुलाखत घेऊ व त्यानंतरच निर्णय घेऊ. त्या साठी तुम्हाला इथे आमच्या स्वित्झरलॅंडच्या इस्पितळात यावे लागेल. दोन ते तीन दिवस इथे मुक्काम करावा ही लागेल. तुम्हा उभयतांची गैर सोय होणार नाही ह्याची आम्ही सर्वतोपरी काळजी घेऊच. एकदा निर्णय तुमच्या इच्छेनुसार झाला की आपल्या फोन वरील चर्चेत तुम्ही सांगितलेली तारीख व वेळ, तुमच्या वरील प्रक्रियेसाठी साधायचा प्रयत्न करूच.
तुम्ही कधी येताय ते कळवावे.
असे म्हणत संस्थेच्या निर्देशकाने खाली सही केली होती.
मेल वाचून अक्षत चे समाधान झाले व त्यांनी लगेचच पुढच्याच आठवड्यात म्हणाजे २० ऑक्टोबरला मुलाखतीची तारीख निश्चित केली, व त्याप्रमाणे लगेच मेल ही केला.
निश्चित दिनांकाच्या एक दिवस आधीच, इनामदार दांपत्ती एक्झिट इंटरनॅशनल ह्या संस्थेच्या अतिथी गृहात पोहचली.
सद्य परिस्थिती वर मात करण्यासाठी ओढावून घेतलेले निम्मे युद्ध तर ते जिंकले होते, त्याचे समाधानही त्यांच्या मुखावर स्पष्ट दिसत होते. दुसऱ्या दिवशी त्या उभयतांच्या आयुष्याच्या भवितव्याचा निर्णय करणाऱ्या मुलाखतीला त्यांना सामोरे जायचे होते. परीक्षा, इंटरव्ह्यू म्हणले की कुठल्याही वयात दडपण येतेच, अक्षत व मॅगीच्या उरी धड धड वाढू लागली होती.
स्वतःला कितीही अविचल दाखवत असले तरीही मनात थोडी तरी चलबिचलता होतीच. प्रयत्न करूनही दोघांना किती तरी वेळ झोपच लागली नाही, वादळवाऱ्यात धुळीचे लोट उंच उठावे तसे त्यांच्या मनात कुठे तरी खोल वर दडलेल्या भूतकाळातील घटना, दुर्घटना उचंबळून वर येऊ लागल्या होत्या. काय व कसे त्या प्रसंगांना, अनुभवांना प्रभावी रित्या मांडता येईल ह्याची मनातल्या मनात जुळवाजुळव चालू होती. बरीच रात्र उलटून गेल्यावर कधी तरी त्यांना झोप लागली.
आज दोघेही जरा लवकरच उठले होते, मॅगी आज भारतीय परिवेश परिधान करून प्रसन्न चित्ताने व्हील चेअर वर बसून मुलाखत कक्षा कडे अक्षत बरोबर, निश्चित वेळेच्या आधीच निघाली होती. तिचा उत्साह तिच्या शारीरिक हालचालीतून स्पष्ट जाणवत होता. परीक्षेची पूर्ण तयारी झालेल्या विद्यार्थ्या प्रमाणे, तितक्याच आत्मविश्वासाने मॅगी नियोजित कक्षात शिरली, किंचित अस्पष्ट स्वरात, पण प्रसन्न भावाने, चेहऱ्यावरील स्मितानेच सर्वांचे अभिवादन केले. कक्षात दोन मानसशास्त्रज्ञ, संस्थेचे दोन निर्देशक, एक लिप मूव्हमेंट रीडर, एक डॉक्टर व एक परिचारिका उपस्थित होतेच. मॅगी साठी पलंग व एक आराम खुर्ची ठेवली होती, ती परिचारिकेच्या व अक्षतच्या सहाय्याने आरामखुर्चीतच बसली. निर्देशकांनी अत्यंत विनम्र पणे अक्षतला कक्षाच्या बाहेरच थांबण्याची विनंती केली. वातावरण थोडे हलके फुलके करीत मॅगीला बोलते करण्यासाठी, तिने तिच्या बालपणींच्या आठवणीं पासून सुरुवात करावी असे सुचविले गेले.
मॅगी ने तिच्या ब्रिटेन मधील शालेय जीवनातील चार दोन आठवणी सांगत ती तिच्या हार्वर्ड मधील रम्य स्मृतींमधे कधी रमली हे तिचे तिला सुद्धा उमगले नाही. अक्षत तिला इथेच भेटला होता, तो प्रचंड बुद्धिमान होता, त्याचा बोलका व थट्टे खोर स्वभावच तर तिला भावला होता. त्याच्या सगळ्या हालचालीं मधे त्याची हुशारी झळकत होती. ती पुढे सांगू लागली की, "त्याच्या वागण्यातून त्याच्यातील माणुसकी डोकावायची, त्याची प्रगल्भता, त्याची ओघवती भाषा, सर्वच विषयां मधील त्याचे ज्ञान व सर्वांना मदत करण्याची त्याची प्रवृत्ती, ह्यामुळे तो कुठल्याही ग्रुप मधे असला तरी त्या ग्रुपचे नेतृत्व आपसूकच अक्षत कडे यायचे". किंचित लाजत मॅगी पुढे सांगू लागली की, "अक्षतच्या ह्याच गुणांमुळे मी त्याच्या कडे आकर्षित झाले, प्रेमात पडले. परस्परांना परस्परीच्या अंतरीची ओढ जाणवली, चित्ते स्थिरावली, मने विसावली, एकमेकांत गुंतू लागली, जवळीकी वाढू लागली, आणि त्याची परिणीती परिणयात झाली. भाषा, जात, धर्म, रंग भेद विसरून, ही मार्गारेट एके शुभ दिनी अक्षतची सहचारिणी झाली.
दरम्यान आम्हा दोघांना ब्रुसेल्स मधे आमच्या आवडीच्या अध्यापनाच्या क्षेत्रात जॉब मिळाला. खऱ्या अर्थाने आम्ही आमच्या गृहस्थ जीवनाला ब्रुसेल्स मधेच सुरूवात केली."
मॅगीच्या ओठांच्या हालचाली थांबल्या पण ती तिच्या तरुणपणीच्या मधुर स्मृतींमधे रमल्याचे डोळ्यातली चमक दर्शवत होती. पण अचानक शाम मेघांनी सूर्याला झाकोळून टाकावे व सर्वत्र काळी छाया पसरावी तसे तिच्या चेहऱ्यावरील भाव बदलत गेले. मानसोपचार तज्ञ तिच्या चेहऱ्यावरील हे बदलते भाव टिपत होतेच. थोड्या वेळाने ती त्याच रममाण अवस्थेत, शून्यात नजर रोखत स्वतःशीच पुटपुटल्यागत बोलू लागली , लिप रीडर तिच्या ओठांच्या हालचाली अचूक टिपत होताच. "तो खूप सुखाचा काळ होता तेव्हा घरातील भिंती, खिडक्या, पडदे, इतकेच काय तर सारेच जिन्नस मनमोकळेपणाने आमच्याशी बोलायचे, आमच्या गप्पात सहभागी व्हायचे, पण आता सगळी कडेच एक अवकळा पसरली आहे, तेच जिन्नस त्याच भिंती आता निशब्द झाल्या आहेत, ते पडदे देखील स्तब्ध झाले आहेत, सगळं घरच मलूल झालं आहे, अक्षतच्या प्रेमाचा ओलावा किंचित वाढला ही असेल पण त्यात तो उत्साह नाही, आनंद नाही, डोकावते ती फक्त माझी काळजी." मॅगी अजून त्याच अवस्थेत स्वतःशीच बोलत होती, "तारुण्यात, माणूस एकटा असतो तेव्हा त्याची सुखस्वप्न त्याच्या समवेत असतात पण म्हातारपणी किंवा एकाच्या अंता नंतर असणारा एकांत जीवघेणा असतो, भयाण असतो." स्थळ काळ वेळ ह्याचे भान विसरून मॅगी स्वतःच्याच विचारात इतकी गुंग झाली होती की मनात येणारे सर्वच विचार, आजच्या प्रसंगाला संबद्ध असो वा नसो, मॅगी स्वतःच्याच तंद्रीत अस्पष्टपणे काहीतरी उच्चारीत होती, पण सभोवताली असलेल्यांना ती माहिती नक्कीच उपयुक्त वाटत असणार कारण ते त्यातील शब्द न शब्द लिहून घेत होते.
शून्यात भरकटलेले मन परत थाऱ्यावर आणित थोड्या स्पष्ट उच्चारात ती सांगू लागली की, "अक्षतला ही आवडायचा माझा तो चुळबुळ्या स्वभाव, सतत चाललेली धावपळ, काहीतरी नवीन करण्याची धडपड. असे वाटते की एकदा तरी परत तसेच तरुण व्हावे, बिनधास्त, उत्फुल्ल, मनस्वी, ...... वाटते, आत्ताच्याच वयात, ह्याच शारीरिक अवस्थेत पाहिजे होती ती ऊर्जा, थबकलेल्या आयुष्याला पुढे नेण्या साठी, थिजलेल्या मनाला जागं करण्यासाठी." तिने त्या आठवणींना झळाळी दिली, काही क्षण त्या तारुण्यातील स्मृतीत रंगून गेली. काही काळ शब्द स्तब्ध होते, निशब्द निरवतेचे अधिराज्य निर्मित झाले होते. धूसर मंद प्रकाशात ती भूतकाळाचे धावते चलचित्र पाहण्यात गर्क होती.
शब्दांच्या धारा कोंडतल्या होत्या, मुकपणालाच बोलके पणाचा अर्थ आला होता. ह्या मनीचे त्या मनी सहज पोहचावे तसे मॅगीचे किती तरी अव्यक्त भाव देखील ते मानसशास्त्रज्ञ समजून घेत होते.
"तुमचे पूर्वायुष्य इतके सुखद असताना आता एवढ्या व्यथित का ?" डॉक्टरांच्या ह्या प्रश्नाने मॅगीची विचार शृंखला तुटली, मंदिरातील घंटानादाने गाभाऱ्यात योगसाधनेत तल्लीन असलेल्या योग्याची साधना भंग पावावी व तो खडबडून योगनिद्रेतून जागा व्हावा तसे ती तिच्या विचार चक्रातून बाहेर येत तिने अलगद डोळे उघडले व थिजलेल्या नजरेने डॉक्टरांकडे पाहिले.
डॉक्टरांना उद्देशून, शक्य तितक्या स्पष्ट आवाजात मॅगी सांगू लागली की, "सुमारे आठ वर्षांपूर्वी ह्या पार्किन्सन ने माझ्या सुखावर विरजण घातले, जणू अजगराचा विळखाच माझ्या भोवती बसला, सर्व वैद्यकीय प्रयत्नांवर मात करीत तो विळखा काळा बरोबर घट्टच होत गेला, आता प्राण कंठाशी येऊ लागले आहेत. नाही म्हणता, अक्षत माझी खूप सेवा करतो, शरीराला ह्याची गरज असली तरी मनाला खूप क्लेश होतात. नवऱ्याकडून किती सेवा करून घ्यायची , मला स्वतःचीच लाज वाटते, त्याचेही वय झालेच आहे ना, माझी त्याला काहीच मदत नाही. ८०व्या वर्षी त्यानेच सकाळ पासून राब राब राबावे, सकाळचा चहा नाश्ता, मग जेवण , दुपारचा चहा, रात्री परत काही तरी लागतेच ना... ह्या शिवाय माझे सगळेच बेड वर, माझा डायपर ही, शीss...", म्हणत तिने पुढचे शब्द गिळले, तोंड घट्ट मिटून घेतले, पण बाहेर पडणाऱ्या हुंदक्याने मनातील दुःख व्यक्त केलेच, "माझी मलाच किळस वाटते, मेल्याहून मेल्या सारखे होते".
जोराची वृष्टी होऊन गेल्यावर पागोळीतून पाण्याचा एक एक थेंब गळावा तसे एक एक विचार मॅगीच्या मनातून बाहेर पडत होते.
"कासव विपरीत काळात जसे स्वत:चे अंग आक्रसून घेतो तसेच माझ्या ह्या दुर्धर आजारात अक्षतने मित्र, क्लब, पार्ट्या पासून स्वत: ला विलग केले, त्याच्या दिनचर्येतून त्याला सुखी करणारे हे सर्व भागच त्याने काढून टाकले आहेत. अखंड होणारे वाचन, चमचमीत खाणे, निरंतर चालणाऱ्या त्याचा गप्पा, अशा सर्वातूनच तो विरक्त झाला आहे. त्याच्यातील हा बदल मला अत्यंत क्लेशदायी होतो."
त्याला सुद्धा कंटाळा येत असेलच ना, तो ही माणूसच आहे, नोकरीत सुद्धा आठवड्यातून दोन दिवस सुट्टी असते पण इथे तर गेल्या सात वर्षांत अक्षत ने एक दिवस सुद्धा माझ्या पासून लांब राहिल्याचे आठवत नाही, आता तर माझी हाक देखील तोंडा बाहेर फारशी येत नाही, पलंगावर बेल आहे पण वाजवायची ताकदच उरली नाही, आणि म्हणूनच तो सतत माझ्या अवती भवती घुटमळत असतो , माझी गैरसोय होऊ नये म्हणून, मला ताटकळावे लागू नाही म्हणून. मांजर आपल्या पिल्लांना जपते तशी तो माझी सतत काळजी घेत असतो."
तिच्या मनातील वेगाने बाहेर पडू इच्छिणाऱ्या विचारांना, ओठातून उमटणाऱ्या शब्दांचा अस्पष्टपणा, डोळ्यातील भावातूनही व्यक्त होण्यास जाणवलेली असमर्थता, शेवटी डोळ्याच्या कडांवर रेंगाळणाऱ्या व विचारांचा आवेग सहन न झाल्या मुळे गाला वरून ओघळणाऱ्या द्रव रुपात व्यक्त होऊ लागले होते.
बराच वेळ तिचे मूक शब्द व गालावरून ओघळणारे अश्रू बरेच काही बोलत होते. मॅगीच्या मनात सुरू असलेल्या विचारांचे कोलाहल तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट उमटत होते. एखाद्या ज्वालामुखीच्या उद्रेका पूर्वी, भूगर्भ शास्त्रज्ञ त्याच्यातील हालचालींचा, बाहेर पडू इच्छिणाऱ्या लाव्हा रसाच्या आवेगचा अंदाज बांधत असतात तसेच काहीच न बोलता मॅगीच्या मनातील खळबळीचा अंदाज तेथील मानसोपचार तज्ञ घेत होते.
मॅगीने प्रयत्नपूर्वक स्वतःचे मन शांत केले व ती पुढे सांगू लागली की, "माझी शर्ली, आमची बब्बड, खूप लाघवी, वडिलांची प्रगल्भता घेऊनच जन्माला आलेली, आमचा एकमेव आधार, आमचे जगण्याचे कारणच होती ती.
फुलां प्रमाणे पाकळी पाकळी ने ती उमलत गेली, एक एक पाकळी आणखी उघडायची फूल मोठ होत जायचे, ते फूल उमलताना बघायला खूपच मोहक होते. पापणी सुद्धा न लवता फुलाचे उमलणे पहात रहावे असे वाटायचे. फुल पूर्ण उमलून त्याला एक गोंडस रूप येते, मी ही अशीच त्या आनंदात रमले होते, आणि आणि नियातीनेच घाला घालावा, कोणी तरी ते माझे फूल चुरगाळून कुस्करून टाकावे , माझे ही अगदी तसेच झाले, नियतीशी कशी भांडणार होते मी, खचले, अगदी गर्भगळीत झाले, माझी जगण्याची उम्मेदच संपली."
"अक्षत पण खूप खचला होताच, पण आम्ही दोघेही आपल्या भावना एकमेकांपासून लपवत, एकमेकांसाठी उसने अवसान आणत आज इतकी वर्षे नॉर्मल असल्याचा देखावा करत होतो."
डॉक्टरांनी न राहवून विचारले की, "तिला असे नेमके झाले तरी काय होते?"
"सुमारे दोन अडीच वर्षांपूर्वीची घटना आहे, त्या सायंकाळी आम्ही खूप आनंदात होतो दुसऱ्याच दिवशी आमची बब्बड, तिची ट्रीप संपवून, जावई व दोन्ही नातवंडांसह येणार होती, फोन खणाणला, नक्की बब्बडचाच फोन असणार, दोघांच्या ही मनाने फोन कडे धाव घेतली, अक्षत धावतच गेला, प्रचंड उत्साहाने फोन उचलला, पण पलीकडून आमच्या बब्बडचा आवाज नव्हता हे मी अक्षतच्या चेहऱ्यावरील बदललेल्या भावावरूनच ओळखले, पण अक्षतच्या मुखावाटे एकही शब्द उच्चारला गेला नाही, तो मटकन खालीच बसला, फोन ही हातातून घरंगळला, भेदरलेल्या नजरेने तो निरर्थक इकडे तिकडे पाहू लागला , एव्हाना अक्षतच्या डोळ्यातून अश्रूंचे पाट वाहू लागले होते, तो खूप घाबरला होता. हे सर्व पाहून काही तरी भयंकर घडले असणार ह्याची मला कल्पना आली होती, तरी पण असे काही घडेल ह्याची पुसटशी शंका सुद्धा माझ्या मनी आली नव्हती. शर्लीच्या कारचा भिषण अपघात झाला होता व जागीच त्या चौघांचाही मृत्यू." ह्या वाक्या बरोबर सर्वत्र एक भयाण शांतता पसरली, जणू काळाची गतीच थांबली होती, कोणी काहीच बोलत नव्हते, बराच वेळ असलेली ती शांतता मोडत मॅगीच बोलू लागली की, "हे सर्व आमचे मन मानायला तयारच नव्हते. आमच्या भावनांचा ओघच खुंटला होता."
मॅगी आता स्वतःशीच बोलल्या प्रमाणे अधिकच अस्पष्ट स्वरात बोलत होती, "जेव्हा जेव्हा माणसाच्या आयुष्यात एक वादळ उठतं, वावटळ उठतं तेव्हा तेव्हा त्याचं मानसिक खच्चीकरण होतं, त्याचं मानसिक, वैचारिक, बौद्धिक अस्तित्वच संपुष्टात येतं, उरतो तो फक्त एक निरीच्छ उत्साहहीन हाडा मासाचा सांगाडा."
चर्चे मधे आलेली काही क्षणांची स्तब्धता मोडत ती पुढे सांगू लागली की, "अक्षतचा स्वभाव बडबड्या होता पण आमची शर्ली गेल्या पासून सर्वांशी गप्पा मारणारा, जगनमित्र, अक्षत, तेव्हा पासूनच खूप अबोल झाला आहे.
तो पूर्वी नेहमीच अपडेटेड असायचा पण गेल्या दोन वर्षात त्याने एक ही पुस्तक वाचले नाही, बाह्य जगताशी संपूर्ण संबंध तोडून तो विरक्त झाला. फक्त आणि फक्त माझ्याच वर त्याची दिनचर्या केंद्रित आहे."
काही क्षण शब्दांना दिलेला विराम मोडत ती पुढे सांगू लागली की, "आपणास पाठवलेल्या मेल मध्ये उल्लेख केलाच होता की, काही महिन्यांपूर्वी अक्षतला हृदयविकाराचा त्रास झाला होता. तेव्हा संयोगाने माझे डॉक्टर घरी आले होते म्हणून त्याला लगेच उपचार सुरू करता आले.
एखादे रात्री ह्याला परत हार्टअटॅक आला तर माझा काहीच उपयोग नाही, मी फोन करून डॉक्टरला बोलावू पण शकत नाही, मग काय मी त्याला.....," मॅगी ने क्षणाचा पॉझ घेतला, डोळ्यांच्या पापण्यांवर रेंगाळणाऱ्या त्या थेंबांस वाट मोकळी करुन देत पुढे बोलू लागली, "हृदय विकाराने तडफडत असताना बघत बसायचे." मॅगी परत क्षण भर बोलायची थांबली, एक आवंढा गिळला व पुढे सांगू लागली की, "माझे काही बरे वाईट झाले तर तो इतका गोंधळून जाईल की ....," एक उसासा सोडत, "त्याचे माझ्यावर आतोनात प्रेम आहे, त्याने कधी माझा शब्द खाली पडू दिला नाही, माझे असे रोज तीळ तीळ मरणे त्याला सहन होत नसणारच, हे मला माहित आहे, आणि जर का मी त्याच्या आधी गेले तर तो अगदी वेडा होईल, त्याला खाण्या पिण्याचीच काय तर कशा कशाची शुद्धच राहणार नाही."
काही वेळ पसरलेली शांतता मोडत मॅगी परत मनातील दाटलेल्या विचारांना वाट मोकळी करून देत अस्पष्ट शब्दात सांगू लागली की,
"अक्षतला आता हॉटेलातील अन्न मुळीच आवडत नाही व पचतही नाही, पूर्वी त्याच्या खाण्यापिण्याचे मी स्वतः बघायचे, पण आता त्याचे जेवणाचे खूप आबाळ होत आहेत, तो किती अशक्त झाला आहे, मला दिसतोय, मला ह्याचाच खूप त्रास होतो, मी त्याच्या साठी काहीच करू शकत नाही आणि स्वत:साठी काही करण्याची त्याला सवयच नाही. अशा माझ्या जगण्याचा काय उपयोग, निरुपयोगी, नुसती खायला काळ अन भुईला भार." तिने डोळे घट्ट मिटून घेतले, ओठ दाबून डोळ्यातून वाहणाऱ्या अश्रूंना व मुखा वाटे बाहेर पडणाऱ्या हुंदक्यांना तीने अडवण्याचा जराही प्रयत्न केला नाही.
निशब्दता थेट मनाचा ठाव घेऊन अंतरंगात प्रवेश करत होती. तिच्या निशब्द भावनांना शब्दरूप देऊन तटस्थ भूमिकेने ऐकणारे मानसशास्त्रज्ञ तिच्या मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न करत होते, ते देखील काही अंशी तिच्या बोलण्याने भारल्या गत ही झाले होते. अनेक वर्षांपासून तिच्या छातीत कोंडलेले वादळ आज तिच्या अस्पष्ट शब्दांतून व गालावरून ओघळणाऱ्या अश्रूंवाटे मोकळे होत होते. तिच्या मुखावाटे बाहेर पडणाऱ्या शब्दातून तेथील निर्जीव वस्तूंना देखील पाझर फुटला असता, इतकी आर्तता होती त्या अर्धवट उमटलेल्या शब्दात.
आज अक्षतची तशी औपचारिक मुलाखत नियोजित नव्हती म्हणून तो मॅगीच्या कक्षा बाहेर मोकळ्या जागेत निवांत बसला होता. खरं तर आज त्याच्यात, जुना, तरुणपणीचा अक्षत अंशतः संचारला होता. तो प्रसन्न चित्ताने बोलत होता व त्याच्या भोवती काही स्टाफ, डॉक्टर, मानसोपचार तज्ञ नुसतेच बसले नव्हते तर त्याच्या गप्पांमधे रस ही घेत होते, तो बोलायचं थांबल्यास त्याला परत बोलते ही करत होते. मागे जरा अंतरावर बसून एक तरुण, अक्षतच्या नकळत, अखंड काही तरी लिहून घेत होता. अक्षतने भिन्न भिन्न विषय हाताळले. खगोल शास्त्र किंवा गूढ विद्याना पासून ते सिने क्षेत्र किंवा ललित वाङ्मया पर्यंत, प्रत्येक विषयातील त्याचे सखोल ज्ञान पाहून तेथील डॉक्टर ही अचंभितच होते. अंततोगत्वा, नैराश्याच्या गर्ततेत खोलवर बुडालेल्या त्याच्या वयातील व्यक्तीच्या आवडीच्या विषया कडे तो वळला. 'मृत्यू' ह्या विषया वर तो बोलू लागला, "मृत्यू हेच शाश्वत, मृत्यू म्हणजे चैतन्यावर अचेतनतेचे अधिराज्य." तो एकटाच अखंड बोलत होता व भोवतालचे सगळेच डोळे विस्फारून त्याच्या कडे बघत, मनोमनी त्याच्या विद्वत्तेला सलाम करीत होते, कान देऊन ऐकत होते. तो सांगत होता की, मृत्यू बद्दल अनेक मान्यता आहेत, अनेक कल्पना आहेत.
तुमचा वैद्यकीय दृष्टिकोण असे परीभाषित करतो की ’शरीरान्तर्गत सर्व क्रिया बंद पडणे म्हणजे मृत्यू’, श्वासोश्वासा पासून ते मेंदूची क्रिया बंद होणे म्हणजेच मृत्यू.
धार्मिक दृष्टिकोन पाहता मृत्यू संबंधी प्रत्येक धर्मात भिन्न विचार आहेत.
भारतीय हिंदू संस्कृती प्रमाणे मेल्या नंतर श्राद्ध विधी करतात, त्यांनी त्या आत्म्यास सद्गती मिळते अशी मान्यता आहे. तो श्राद्ध विधी मी आमच्या दोघांसाठी आधीच, जिवंतपणीच केला आहे.
हिंदू धर्मातील पुनर्जन्म ह्या तत्वावर आम्हा दोघांचा संपूर्ण विश्वास आहे. ह्या जन्मीच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा आकांक्षा पुढच्या जन्मी आम्हाला पूर्ण करता येतील.
आध्यात्मिकदृष्ट्या विचार केला तर मानवी शरीरातून आत्मा निघून जाणे म्हणजे मृत्यू होणे, हे सर्वश्रुत आहे." इतके बोलून तो जरा थांबला, त्याच्या उत्साहाचा पारा सर्रर्र कन खाली आला होता, तो कातर आवाजात म्हणाला की, "आमच्या उभयतांच्या शरीरात अजून आत्मा असला तरी आमच्या जगण्यातील आत्मा केव्हाच निघून गेलाय." त्याच्या ह्या वाक्याने जणू मृत्यूचीच अवकळा तेथील वातावरणात पसरली, सगळी कडे स्मशान शांतता जाणवत होती. पुढे किती तरी वेळ कोणी काहीच बोलले नाही.
उरी दाटलेल्या वादळाला वाट मोकळी करून दिल्या मुळे मॅगीला आज खूप हलके वाटत होते, मन मोकळे झाल्या मुळे प्रसन्न होते खरे पण आज बरेच दिवसानंतर, खरं तर बरेच वर्षांनंतर इतके बोलल्या मुळे त्या दोघांचे ही शरीर शिणले होते. डिनर घेऊन त्यांना आवंटीत केलेल्या रूम मधील डबल बेड वर ते शांत पणे लवंडले होते, किती तरी वेळ दोघे एकमेकांशी एक अक्षर ही बोलले नाहीत, स्वतःच्याच विचारात गुंग होते. मॅगी, तिच्या मनात उठलेले वादळ आता पूर्णपणे शांत झाल्या मुळे, ती पलंगावर पडल्या पडल्या स्वतःच्याच साक्षीने त्यातील सुख अनुभवत होती. अक्षत देखील आज दिवस भरातील रंगलेल्या गप्पाष्टकांच्या सुखद अनुभूतीत गर्क होता. दोघांच्या ही चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
तिच्या दोन्ही पापण्या हळूच लवल्या, त्या हळुवार मिटणाऱ्या पापण्यातून व्यक्त होऊ पाहणाऱ्या अर्थाची उकल आता अक्षतला बरीच सरावाची झाली होती. तिच्या इच्छे खातर त्याने त्याची उशी तिच्या जवळ सरकवली, तिला जाणवणाऱ्या, त्याच्या श्वासाचा स्पर्श आज तिला खूप आश्वासक वाटत होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही आपापल्या कक्षात वेळे आधीच जाऊन स्थानापन्न झाले होते. आज त्यांच्या भवितव्याचा निर्णय होणार होता.
एक मानसोपचार तज्ञाने, ती कालच्या पेक्षा आज अधिक प्रसन्न दिसत आहे असे निदर्शनास आणून देता मॅगी द्वारा सस्मित त्या टिप्पणीचा स्वीकार केला.
विमान हवाई पट्टीवर उतरण्या आधी आकाशात चार दोन घिरट्या घालते व मग नियोजित स्थळी उतरते, काहीसे तसेच मॅगीच्या बोलण्यात दिसत होते.
"मी जन्मतः ब्रिटिश असूनही काही भारतीय धर्मीक ग्रंथ, रामायण, महाभारत, गीता, इतकेच काय तर काही पुराणे देखील वाचली आहेत, अक्षतशी त्यावर चर्चा पण केली, त्यातील विचार जाणले, शिकवण समजून घेण्याचा प्रयत्न ही केला. राम आणि सीता ह्यांच्या आयुष्यात वारंवार येणाऱ्या विपरीत परिस्थितीत खंबीर पणें सामोरे जाण्याचे बळ त्यांना दोघांनाही एकमेकांवरील विश्वासानेच दिले होते, आम्हा दोघांना देखील ह्याच परस्परांवरील विश्वासाने आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यास बळ मिळाले.
मला भारतीय संस्कृती चे खूप कौतुक वाटते, अप्रूप वाटते. माझा पुनर्जन्मावर विश्वास आहे, मी हिंदू मान्यतां प्रमाणे वड नाही पुजला पण त्या मागची भावना मला पटते, वड न पूजता देखील पुढचे सात जन्म अक्षतचीच साथ मिळावी हे मनापासून वाटते.
असे म्हणतात की श्रद्धा जर आपण जागी ठेवली तर सोसण्याची धार बोथट होते व आपल्याला सहनशक्ती बळावल्याची जाणीव होते. पण ही अशी अवस्था सर्वसामान्यांत फार काळ टिकून राहत नाही आणि मन व शरीर ह्यांच्यात द्वंद सुरू होते व बहुतांशी मनालाच हार स्विकारावी लागते. अहोरात्र पलंगावर पडून माझे नाईलाजाने का होईना पण अखंड चिंतन सुरू असते, अगदी अर्थशास्त्रा पासून विभिन्न विषय त्यात सामावलेले असतात, आता त्याचा काहीच उपयोग नाही हे माहीत असून देखील. पूर्वी वाचलेल्या पुस्तकांचे मनातल्या मनात निरर्थक विवेचन ही सुरू असते . बहुदा नको असलेल्या विचारां पासून सुटका मिळावी हा हेतू असू शकतो.
हरिदासाची कथा मूळ पदावर येत परत अक्षत वर येऊन स्थिरावली.
अक्षत खूपच हुशार आहे, त्याचे अनेक सन्मान झाले, त्याचे ज्ञान, त्याचे विचार नेहमीच स्विकार्य ठरले आहेत, अनेक ठिकाणी त्याचे यश वाखणाण्यात आले होते पण तो त्यामुळे हुरळून गेला नाही, आत्मप्रौढी त्याच्या वागण्यातून कधी झळकली नाही.
आमच्या बब्बडच्या वियोगाने मात्र अक्षतचे मन खच्ची केले, एकलकोंडेपणाच्या भिंती आता त्याने स्वतः भोवती उभारल्या आहेत, मनातील उत्साह व आनंदी वृत्तीचा त्याने मनातल्या मनात केव्हाच खून पाडला आहे. त्याच्या सगळ्या भावना आता माझ्या काळजीत एकवटल्या आहेत, मी त्याच्या जगण्याचे एकमात्र कारण शिल्लक आहे.
मी माझ्या आयुष्यात खूप तृप्त आहे व अनंताच्या प्रवासाला निघण्याची माझ्या मनाची पूर्ण तयारी झालेली आहे. त्या प्रदीर्घ प्रवासाला निघताना माझे मन अक्षत व्यतिरिक्त मागे कशातही गुंतणार नाही ह्याची मला पूर्ण खात्री आहे.
दुसऱ्या खोलीत डॉक्टर व मानसोपचारतज्ञ ह्यांच्या एका चमूने अक्षतच्या औपचारिक मुलाखतीस सुरुवात केली होती.
अक्षत ने मात्र कालच्याच अध्यात्माच्या विषयाची री पुढे ओढत बोलू लागला, "सनातन धर्माच्या तत्वज्ञानात मी असे वाचले होते की ब्रम्हाने केवळ एकट्या पुरुषाला जन्माला घातले होते, पण पुढे तो त्याच्याच एकटेपणाला कंटाळला व त्यानेच आपल्याच मधून एका व्यक्तीची निर्मिती केली, ती स्त्री होती. अक्षत म्हणत होता की, "मला नेहमी वाटते की जणू तो प्रथम पुरुष मी व ती प्रथम स्त्री म्हणजे माझी मॅगी. आम्ही आयुष्य भर एकमेकात इतके एकरूप होऊन जगलो, एकमेकांना कायम पूरकच होतो. आमच्यात भांडण, रुसवे फुगवे तर सोडाच साधी मतभिन्नता देखील फारशी कधी जाणवली नाही.
त्याचे शब्द भूतकाळातील मन क्षत करणाऱ्या दुःखद आठवणींवर हिंकाळत वास्तवाच्या समीप येऊ लागले होते.
अक्षत व्यथित अंत:करणाने सांगत होता की, "आमची लेक गेली तेव्हा पासून मला मॅगीचे डोळे सतत पाणावलेलेच दिसतात, तिच्या भावना तिचे लेकिवरील अमाप प्रेम, त्या विरहाग्नीत होरपळणारे तिचे मन, शब्दात व्यक्तच होऊ शकले नाही, त्या अव्यक्त भावना ह्या तिच्या सतत वाहणाऱ्या अश्रुंतूनच व्यक्त होत असाव्यात. शर्लि माझी पण अतिशय लाडकी होतीच पण मॅगीला आणखी त्रास होऊ नाही म्हणून माझ्या भावनांचे बांध मी घट्ट धरून ठेवले, तसेही पुरुषांना रडून आपले मन मोकळे करण्याची मोकळीक नसतेच. परिस्थितीने सर्व बाजूने मला खिंडीत गाठले आहे, मी किती वर्ष ही खिंड लढवणार? ह्या विचारांनी आता माझे उर फुटेल असे वाटते. आता माझी सहन शक्ती संपत चालली आहे. हे असे मनात उठलेले वादळ लपवून परत मॅगी समोर हसत मुखाने वावरायचे. आता अशक्य झाले आहे.
डोळ्याला डोळा लागत नाही, लेकीच्या "बाबा बाबा" म्हणून सतत हका ऐकू येतात, झोपेतून किती तरी वेळा दचकून जागा होतो मी, बरे झोपेतून दचकून उठण्यात आवाज झाला, ओरडलो, तर हीची झोप मोड होईल म्हणून झोपेत सुद्धा तोंड दाबून बुक्क्यांचा मार, आता किती सहन करायचा मी ?
शर्लीच्या गत स्मृतींचे अश्रू होऊन डोळ्यांच्या कडांजवळ साकळत होते पण त्यांना मोकळेपणाने बाहेर पडण्याची अनुमतीच नव्हती. हे बोलत असताना त्याच्या डबडबलेल्या डोळ्यातील अश्रू देखील अंतर्मुख झाले असावेत, ते बाहेर न पडता बहुदा नेहमीच्या सरावाने आतल्या आत कुठे व कसे विरून गेले ते कोणाला कळलेच नाही.
काही क्षण बोलायचे थांबून अक्षत ने स्वतःला सावरले व तो पुढे बोलू लागला की, "पूर्वी आम्ही ख्रिसमस पण साजरी करायचो तसेच दिवाळी पण तितक्याच उत्साहाने साजरी करायचो, त्यात आनंद मिळायचा , लेक जावई, नातवंडं यायची, खूप कष्ट पडले तरी ह्या सणांमध्ये एक वेगळाच आनंद असायचा , उत्साह मिळायचा, पुढच्या वर्षभर पुरेल इतके मनाला टॉनिक मिळायचे, पण आता हे सगळच संपलय.
का, कशासाठी जगतोय हेच कळत नाही. नैसर्गिक मृत्यूची वाट पहाण्या शिवाय आमच्या कडे काहीच उपाय उरला नव्हता, शेवटी त्यापेक्षा स्वतःला संपवायचा निर्णय घेतला, त्या साठी बेल्जियम सरकारची लेखी परवानगी देखील घेतली आहे. हा पळपुटे पणा नक्कीच नाही, हा पूर्ण विचारांती घेतलेला निर्णय आहे. खरे तर ह्या निर्णयात स्वत: पेक्षा दुसऱ्याचाच विचार जास्त आहे."
मनाची विकल अवस्था कशी असते ते अक्षतच्या हावभावातून, वागण्यातून जाणवत होती.
" आमच्या घरात एक विचित्र कोंदटलेपण पसरले आहे, निशब्दतेतून नको असलेलेच शब्द उमटत असतात, त्या निरव शांततेतून आमच्याच मनातील आक्रोश भयाण सूर बनून आम्हालाच भेडसावत असतात.
भिंती वरील तस्विरीतून शर्लीचे ते निखालस हसणे पाहिले की मॅगीचे मन संपूर्ण ढवळून निघायचे, मनी विरह वेदना अनावर व्हायच्या, मॅगीच्या डोळ्यांना तर तेव्हा अखंड गळतीच लागली होती. खऱ्या अर्थी आम्ही दोघेही आज मिती पर्यंत त्या धक्क्यातून न सावरताच सावरल्याचे सोंग घेऊन जगतो आहोत.
साथ देत होता तो फक्त एकटे पणा, एकाकी पणा. दोघे एकत्र असूनही त्या एकाकी पणातच जगतो आहोत.
दोघांपैकी एकाने आधी जावे व दुसऱ्यावर वियोगाचे दुर्दैव यावे हे दोघांनाही अवघड आहे, हा दुर्दैवाघात सहन करण्याची शक्ती आता आमच्या दोघांपैकी कोणातच उरलेली नाही. दिवस ही झरझर सरत नाहीत, काळाला गोगल गाईची गति प्राप्त झाली आहे."
त्याचे ओठ बोलण्या साठी विलगले पण ते न बोलताच स्थिरावले. संभाषण नको असलेल्या क्लेशदायी वळणावर जात असलेले पाहून अक्षतने बाहेर पडू पाहणारे शब्द गिळले. अक्षत, त्याच्या चेहऱ्यावरचे भाव कृत्रिमपणे बदलत व थोडा वेळ पसरलेली स्तब्धता मोडत तो बोलू लागला की, "डॉक्टर, माझी मॅगी खूप चांगली आहे, माझ्या सगळ्या यशात तिचा मोलाचा वाटा आहे, आजारपणा मुळे व त्या जीवघेण्या आघाता मुळे ती शरीराने व मनाने खूप खंगली आहे, खचली आहे, पूर्वीची मॅगी विलक्षण होती, चैतन्य होती. घरात तिची अखंड धावपळ सुरू असायची, घरातील प्रत्येक निर्जीव वस्तू वर तिचा मायेचा हात फिरला की ती वस्तू जणू तिच्याशी बोलू लागायची. आमच्या कडे येणारी सगळी मित्र मंडळी जशी आमच्या गप्पांमधे रमून जायची तशीच तिच्या अगत्याने भारावून जायची. तिच्यात खूप आगत्य व अकृत्रिम आपुलकी होती, तिला भौतिक विलासाची किंवा ऐहिक वैभवाची लालसा नव्हती, पण तसे म्हणता विरक्त पण नव्हती. तिचे नीटनेटके पण, घरातील सजावट ही अप्रतिम असायची." अक्षत क्षणभर अंतर्मुख होऊन भूतकाळात रमला.
इतक्यात संस्थेचे मोठे डायरेक्टर आले व त्यांनी घोषणा केली की, दुपारच्या भोजना नंतर आपण दोघांची एकत्रित मुलाखत घेऊ, तेव्हा सर्वजण श्रीमती इनामदार यांच्याच कक्षात भेटू."
एकत्रीत साक्षात्कारा साठी सगळे जमले होते, इनामदार युगुल ही उत्साहित व आशान्वित दिसत होते. निर्देशकां कडून काही औपचारिक घोषणां नंतर साक्षात्काराला सुरुवात झाली, खरं तर दोन दिवसांच्या संभाषणा मुळे साक्षात्कारातील औपचारिकता केव्हाच गळून पडली होती व त्याला आता अनौपचारिक गप्पांचे स्वरूप आले होते.
मॅगीचा बोलकेपणा तिच्या व्याधी वर मात करण्याचा प्रयत्न करीत होता, ती थोड्या अस्पष्ट उच्चारात बोलू लागली की, "मी त्याच्या कडे व तो माझ्या कडे पहात शब्दा विना संवादातून एकमेकांची दुःख वाटून घेत होतो. खरं तर दुःखं वाटून कमी होतात असं म्हणतात, पण आमच्या वर एवढा मोठा दुःखाचा डोंगरच कोसळला होता त्यात चार ढेकळं कमी जास्त झाल्याने त्या व्यथेचे ओझे असे काय कमी होणार होते. फक्त इतकेच झाले की मी त्याच्या साठी व तो माझ्या साठी आपली दुःखे लपवू लागलो, एका खोट्या हसऱ्या मुखवट्याच्या आड. आम्ही पूर्वी कधीच एकमेकांपासून काहीच लपवले नव्हते पण ते पाप ह्या आघाताने आमच्या कडून करून घेतले. एकार्थी ही प्रतरणाच झाली ना डॉक्टर? आमचे एकमेकांवर निस्वार्थ प्रेम आहे असा दावा करायचो, ते खरे ही होते पण ह्या एका पाठोपाठ येणाऱ्या संकटांनी, व्यथांनी आम्हाला अप्पलपोटी बनवले, व्यथा आम्ही एकदुसऱ्या पासून चोरायला, लपवायला लागलो, स्वार्थी बनलो.
अक्षत पुढे बोलू लागला की,"डॉक्टर आम्हाला आगा ना पिछा, उद्या कोणी संकट मोचन बनून येईल व आम्हाला जगण्याची नवीन उमेद देईल ह्याची तिळमात्र ही शक्यता नाही. आमचा उद्याचा काळ हा पूर्णपणे अंधकारमय आहे, तोच अंधकार आमच्या उघड्या डोळ्या समोर आज थैमान घालतोय, विचित्र हाव भाव करून आम्हाला खिजवतोय, तर कधी वाटते की तो तिमिर आम्हाला आकर्षित करतोय, आम्हाला ओढतोय, खेचतोय, त्याच्यातच आम्हा दोघांना विलीन होण्या साठी आव्हान करतोय.
डॉक्टर, संध्याकाळ होते तेव्हा आपण सर्वच थोडे मलूल होतो, बहुदा पुढे मोठी काळोखी रात्र आहे म्हणून. आयुष्याच्या संध्याकाळी अनेकांना तीमिराच्छादित काळरात्र दिसू लागते, मृत्यू ची चाहूल लागते, शिल्लक असलेली जगण्याची इच्छा त्यांना मृत्यूची भीती दाखवते.
आमचे थोडे वेगळे आहे, आम्ही मृत्यूला मुळीच घाबरत नाही. गेली काही वर्षे, क्षण दर क्षण आम्ही फक्त आणि फक्त मृत्यूच तर अनुभवत आहोत. प्रत्येक पळ आम्हाला मृत्यू आपल्या मिठीत घेतोय हे जाणवत असल्या मुळे त्या मरणाची आमच्या मनातील भीती केव्हाच मेली आहे."
रिले रेस प्रमाणे अक्षतचे तेच विचार आपल्या शब्दात मांडत मॅगी बोलू लागली की, "पुनर्जन्मा वर आमचा दोघांचा ही विश्वास आहे म्हणून वाटते की परत ताज्या दमाने, नवीन आयुष्याची सुरुवात करायची, पण भिडू मात्र तेच असावेत, त्यात मात्र जरा ही बदल नको."
तोच विषय पुढे नेत मॅगी सांगू लागली की,
"आम्हाला दोघांनाही मृत्यूचे भय मुळीच नाही, भीती आहे तर ती जगण्याची. तसे म्हणाल तर जगण्याचा कंटाळा ही आलेला नाही कारण आम्ही दोघे एकमेकांच्या सोबत आहोत , खरी भीती आहे ती भविष्यात येऊ पाहणाऱ्या एकटे पणाची, एक दुसऱ्या शिवाय विरहाग्नीत जळण्याची, ती धग आता सहन होईल असे वाटत नाही म्हणून हा युथेनेशियाचा, म्हणजेच इच्छामृत्यूचा खटाटोप. इच्छामृत्यूला आमच्या देशात म्हणजे बेल्जियम मधे कायदेशीर वैधता आहे, त्यासंबंधी तेथील सरकारचे संमती पत्र देखील आम्ही मिळवले आहे."
मॅगीचे मनाच्या खोलवर कप्प्यातून उस्फूर्तपणे येणारे विचार शांतपणे ऐकत असलेला अक्षत त्याच तिच्या विचारात आपली सहमती दर्शवत बोलू लागला की, "मृत्यू नियती आहे, परम सत्य आहे आम्हाला एकत्रित पणे त्या सत्याच्या समीप जाण्याची तीव्र इच्छा आहे, मृत्यूला प्रत्यक्ष अनुभवण्या साठी आमचे उभयतांचे मन व्याकुळ आहे.
आता फक्त तुमच्या निर्णयाचा इंतजार आहे, आम्ही खूप आशान्वित आहोत की तुमच्या निर्णयाचा कौल आमच्याच बाजूने मिळेल. पूर्वी जशी आम्ही आनंदाने हातात हात घेऊन आमच्या वैवाहिक आयुष्याला सुरुवात केली होती तशीच पुन्हा एकदा आम्हाला त्याच उत्साहात , हातात हात घेऊन विवाहाच्या पन्नासाव्या वर्षदिनी त्याच मुहूर्तावर, म्हणजे एकवीस मार्चला दहा वाजून तेरा मिनिटांनी, अनंताच्या महायात्रेला जाता यावे ही अंतःकरणा पासून आमची उभयतांची इच्छा आहे. आमचा विश्वास आहे की एकत्रित पणे सुरू होणाऱ्या ह्या अनंताच्या वाटेवरील प्रवासात आम्हाला पुढील जन्मी देखील एकमेकांचे सहचर्य लाभेल.
तुमच्या सार्को ह्या उपकरणाद्वारे परलोकीचा मार्ग प्रशस्त व्हावा असे वाटते कारण, सार्को ह्या उपकरणातून झालेला मृत्यू हा क्लेश विहिन असतो. त्या उपकरणात प्राणवायूचे प्रमाण कमी होत जाऊन प्राणघातक वायूंचे प्रमाण वाढल्या मुळे साठ सेकंदां पेक्षा कमी अवधीत, सुलभ मरण येते असे कळल्या मुळे आम्हाला हा मार्ग जास्त सुखद वाटला.
इतका प्रभावी व विद्वत्तापूर्ण साक्षात्कार एक्झिट इंटरनॅशनल च्या चमूने कधीच अनुभवला नव्हता. तेथील निर्देशकांचा अनुकूल निर्णय येताच इनामदार दांपत्तीच्या आनंदाश्रुंच्या महापुराने त्यांच्या अनंताच्या सहयात्रेच्या प्रवासाचा मार्ग स्वच्छ व सुकर केला.
*-*-*-*-*-*-*-*
लेखक : नितीन कुलकर्णी, पुणे
अतिशय सुंदर कथा! तात्विक विचार आणि कथानकाची उत्तम सांगड घातली आहे. इच्छामरण आणि पुनर्जन्म हे विशेष न लिहिलेले विषय. खरं तर, एकल फॅमिली मुळे पेरेंटल केअर हा विषय जवळ जवळ संपुष्टात आला आहे. अशावेळेस, व्याधिग्रस्त आई वडीलांना स्वित्झर्लंड या कारणावरून आवडले नाही तरच विशेष..
Congratulations and All the best for further authoring..!!
Yours Awaiting,
Mohan Borgaonkar